नंदुरबारचे राजपूत

नंदुरबार जिल्ह्यातला राजपूत समाज महाराणा प्रताप जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतो. व्यसनांच्या आहारी जाऊन ही जयंती साजरी करणारे युवक आज विविध विधायक उपक्रमांद्वारे महाराणा प्रताप यांना अभिवादन करू लागलेत. कसा घडला हा बदल?
नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाविषयी बोललं-लिहिलं जातंच. आणि ते गरजेचंदेखील आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात इतर मागासलेल्या जातींमध्ये एक जात आहे राजपूत. राजपूत म्हटलं की, इतिहास आठवतो आणि डोळ्यासमोर राजे, महाल, समृद्धी या गोष्टी येतात. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. या समाजात विधवा झालेल्या स्त्रीला दुसरा विवाह करू दिला जात नाही. या स्त्रियांना नेहमी सासरच्या कुटुंबावर अवलंबून राहावं लागतं. त्या स्त्रीच्या मुलाबाळांनाही दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. या समाजात शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी आहे. राजपूत स्त्रिया आजही रूढी-परंपरांना जखडलेल्या आहेत. याच परंपरांच्या बेडयांनी स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं आहे.

हे सगळं बदलण्याच्या इच्छेने, २०१६ सालापासून दिग्विजय, भूषण, कल्पेश राजपूत, सुनील गिरासे आणि त्यांच्या मित्रांनी सुधारणा चळवळ हाती घेतली. सुरवातीला गावोगावी जाऊन समाजातील युवकांना आरक्षणाचं महत्व पटवून देत त्याचा फायदा शिक्षणाद्वारे कसा घेता येईल याच प्रबोधन केलं. विधवा स्त्रियांना संजय गांधी निराधार योजनेद्वारे मानधन सुरु होण्यात मदत केली. त्यांच्या पाल्यांसाठी मोफत पुस्तकवाटप केलं. राजपूत समाजात माहितीचा अभाव असल्याने सरकारी योजनांच्या फायद्यांपासून दूर राहिलेले युवक. त्यांना माहिती द्यायला सुरूवात केली. 

दिग्विजय राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी राणा प्रताप जयंतीनिमित्त एके वर्षी रक्तदान शिबिर आयोजलं. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षीची महाराणा प्रताप जयंती वृक्षलागवड, मोफत पुस्तकवाटप या कार्यक्रमांनी साजरी झाली. वाटपातली पुस्तकं सोशल मीडियावरच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मिळाली होती. राजपूत समाजात शिक्षणाचं प्रमाण वाढावं, या समाजाचंदेखील देशविकासात योगदान व्हावं म्हणून युवकांसाठी स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबिरं भरवली जाऊ लागली, IAS अधिकाऱ्यांना या शिबिरात मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलं जाऊ लागलं. 
ही चळवळ करणारे युवक सरकारी किंवा खाजगी नोकरदार असल्याने स्वकमाईतूनच ही कामं करत आहेत. आज या चळवळीत असंख्य युवक सामील झाले आहेत. आणि या मागास समाजाने सुधारणेच्या रस्त्यावर चालायला सुरूवात केल्याचं दिसत आहे. 


संपर्क: दिग्विजय राजपूत 8275590230 / सुनील गिरासे 9822168568 / 
भूषण राजपूत 9922295621