नांगरली नदी, पेरलं पाणी, बहरलं रान

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका, सातपुड्या डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेला. त्यामुळे या भागात वाहणाऱ्या नदी नाल्याच्या पाण्याला प्रचंड वेग असतो. ज्या वेगानं पाणी येतं त्याच वेगानं ते वाहून जातं. अर्थातच जमिनीत पाणी मुरत नाही. या समस्यांचे भीषण रूप तालुक्यातील परिवर्धा गावाने १९९७ मध्ये अनुभवलं. दुष्काळ, पाणी टंचाई त्यात जमिनीतील पाणी पातळी प्रचंड खालावलेली. या परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आलं. एक मुखाने, एक दिलाने गावाची पाणी समस्या सोडविण्याचा संकल्प केला गेला आणि लोकवर्गणी जमा करून संपूर्ण वाकी नदी नांगरून टाकण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांनी २००५ मध्ये अश्याच रूपात नदी नांगरून टाकली आणि भूजलपातळी वाढवली. यंदा या शेतकऱ्यांनी संपूर्ण दोन किलोमीटर नदीच्या प्रवाहात ठिकठिकाणी नदी कोरून बांध बनवले. तब्बल दोन किलोमीटर अंतरात सहा बांध तयार करून, साचलेल्या पाण्यामुळे या भागातील भूजलपातळी चांगलीच वर आली आहे.

वाकी नदीला पुनर्जीवित करून तिच्या पाझरांना जिवंत करणं हे यातलं मुख्य काम. त्यासाठी परिवर्धा गावाने एक समिती स्थापन केली. कलसाडी, तऱ्हाडी, काथर्दे, पाडळदा आणि परिवर्धा गावातून प्रति कूपनलिका अशी ठराविक रक्कम गोळा करण्यात आली. त्यातून जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने नदी कोरून बांध बांधण्यात आले. हे करत असताना सरकारी निधीची, यंत्रणेची कुठलंही मदत घेण्यात आली नाही. या गावकऱ्यांनी नदी नांगरल्याने आणि तिच्यावर रेतीचे बांध उभारल्याने तब्बल आठ गावांना प्रत्यक्ष फायदा होते आहे.

ज्या गावांनी मदत दिली नाही अशी गावंही या शेतकऱ्यांच्या भगीरथ प्रयत्नांची फळ चाखत आहेत. आज घडीला या भागात बाराही महिने शेती हिरवीगार दिसते. या भागात ऊस, केळी, पपई, गहू, कापूस, हरभरे, अशी एक ना अनेक पिकं घेतली जात आहेत. या जलसंधारणाच्या कामामुळे भूजल पातळी तर वाढलीच मात्र वाढलेल्या पाण्याने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावला आहे. या भागातील तीन हजार एकर शेती या कामामुळे ओलिताखाली आहे. गाव करी ते राव काय करी, ही म्हण परिवर्धा आणि त्यांना साथ देणाऱ्या शेतकऱ्यांनी तंतोतंत खरी ठरवली आहे.