शाळा म्हटलं की डोळ्यासमोर येत ते चार भिंतीच्या आड भरलेले वर्ग… त्यांच्या भिंतीवर लावलेले रंगबेरंगी तक्ते …परिट घडीच्या कपड्यातील शिक्षक आणि खूप सारी वह्या – पुस्तके आणि निरंतर चाललेला अभ्यास. आजवरच्या या संकल्पनेला छेद देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘क्षणोक्षणी शिक्षण’ ही अनोखी संकल्पना सिन्नर तालुक्यातील युवा मित्रच्या मनीषा मालपाठक यांनी ‘विक एंड स्कुल’ च्या माध्यमातून प्रत्यक्षात आणली आहे. अवघ्या तीन वर्षाच्या प्रवासात १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारांनी रंग भरत शाळेला वेगळा आयाम दिला आहे.

‘विक एंड स्कुल’ नावाप्रमाणे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी भरणारी शाळा. १२ ते १५ वयोगटातील ३० विद्यार्थ्यासाठी हे वर्ग चालवले जातात. अभ्यास आणि रट्टा ही साचेबद्ध चौकट ओलांडत मुलांना अभ्यासासोबत श्रमाचे महत्व समजावे, स्वत:च्या जबाबदारीचे भान यावे, याद्वारे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा या शाळेचा मुख्य उद्देश. यासाठी विविध सत्राची आखणी करतांना अभ्यासक्रमाची आखीव –रेखीव मांडणी शाळेने नाकारली. कोणत्याही विषयाचा पाया मजबूत व्हावा, त्याचे पूर्णत: आकलन व्हावे यासाठी ‘ एक आठवडा – एक विषय ‘ हा शाळेचा अलिखित नियम. विद्यार्थ्याच्या सृजनतेला वाव मिळावा, याकरीता ऋतू आणि निसर्गचक्रानुसार विषयांची मांडणी करण्यात आलेली आहे. छंद व कलागुणांना वाव देण्यासाठी हस्तकला, चित्रकला,मातीकाम, टाकाऊतून टिकाऊ या कला माध्यमांचा अंर्तभाव करण्यात आला. साहित्य म्हणजे काय ते समजावे यासाठी कवितेची माहिती, तिची लयबद्धता, वाचनाची रीत, त्यात येणार आशय कसा असावा याविषयी मार्गदशन करतांनाच मुलांना लिहिते करण्यासाठी साहित्यिक,कवी, लेखकांनाही निमंत्रित केले जाते. याच पद्धतीने संगीत विषयक ज्ञानात भर पडावी म्हणून विविध प्रकारची वाद्ये कशी वाजवायची, वेगवेगळ्या वाद्यांची खासियत, त्या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी खास वर्ग भरविण्यात येतो. वेगवेगळ्या विषयांसाठी अशाच कल्पना शोधल्या जातात आणि त्याचा अवलंबही केला जातो.

मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी इंग्रजी भाषेत संभाषण, संगणकीय ज्ञान याकडेही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सार्वजनिक जीवनातील महत्वपूर्ण ठिकाणांची ओळख ही आणखी एक वेगळी खासीयत. तालुक्याच्या ठिकाणी असणारे पोलीस ठाणे, वित्त संस्था, पोस्ट कार्यालय या ठिकाणी भेटी देतानाच स्मशानाविषयी असणारी अनामिक भीती दूर करण्यासाठी थेट अमरधाममध्येही सफर घडविली जाते.
पारंपारिक शिक्षणाच्या चौकटीला बाजूला सारत शाळेने मुलांची गोंधळ मस्ती गृहीत धरली आहे. त्यांच्या चुकांना शारीरिक अथवा मानसिक त्रास देत शिक्षा करण्याऐवजी शाळेने त्यांना त्याची जाणीव करून देण्यास महत्व दिले आहे. यासाठी ‘माझी ही चूक झाली … मी ती करणार नाही’ हे तत्व मुले स्वत:च सांभाळतात. नियोजित अभ्यास पूर्ण करत असतांना मुलांची परीक्षा होते. अंतिम परीक्षेत मुलांना स्वावलंबनाने आणि दुसऱ्यांच्या मदतीने काय कामे करता येतात याची यादी करण्यास सांगण्यात येते. विद्यार्थ्याचे आत्मपरिक्षण त्यांचा निकाल असतो. मग तुम्ही येताय ना या शाळेत?
सर्वच मुलांना असं पठडीबाहेरच शिक्षण मिळायला हवं असं तुम्हालाही वाटत ना? त्यासाठी तुम्ही काय करू शकता?