संदीपच्या जिद्दीची गोष्ट

कोल्हापूर पासून ७० किमीवरचं पाल, तालुका भुदरगड. इथल्या संदीप नामदेव गुरवची ही गोष्ट. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच. शेती जेमतेम अर्धा एकर. अर्थातच त्यावर भागत नाही. मग त्याला पर्याय म्हणून संदीपच्या आई-वडिलांनी दूध व्यवसाय सुरू केला. भुदरगड तसा जंगली भाग. काहीही घ्यायचं तर त्यासाठी कोल्हापूर गाठावं लागत. आठवी पर्यंतचं शिक्षण संदीपने प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर पाल इथं कसंबसं पूर्ण केलं. परंतु त्यानंतर त्याला जाणवलं की हालाखीच्या परिस्थितीमुळे आपल्याला शिक्षण घेता येणार नाही. एकूणच सगळ्या परिस्थितीची जाणीव संदीपला लवकर झाली. अर्थात याचं पर्यवसान झालं ते मात्र चुकीच्या गोष्टीत. त्यानं शाळा सोडली आणि थेट सांगली गाठली.

तिथं एका हॉटेलमध्ये त्याला वेटरचं काम मिळालं. ते करतानाही तो सतत परिस्थितीचा विचार करत राहायचा. दोन वर्षं हॉटेलमध्ये काम केल्यानंतर आयुष्यात काही करायचं तर शिकावं लागेल हे त्याला आता समजलं होतं. आणि… संदीप शाळेकडे वळला. त्याने पुन्हा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या शिक्षणाला सुरुवात केली. दहावी झाली.
आता पुढं काय? त्याच्या पुढं सगळ्यात मोठा प्रश्न होता. गावी गेलो तर आई वडिलांसोबत शेतीच करावी लागणार. आता संदीप गारगोटीला आला. आणि तिथल्या महाविद्यालयातून त्याने १२ वीची परीक्षा दिली. ७०% मिळवून तो उत्तीर्ण झाला. आता संदीपलाही शिकायची आवड निर्माण झाली होती. पदवीही मिळाली. पुढं काय हा प्रश्न पुन्हा उभा राहिला. परीक्षा द्यायच्या आणि शासकीय अधिकारी व्हायचं असा निश्चयच त्यानं केला. आणि अभ्यासाला सुरुवात झाली. क्लास लावण्याची परिस्थिती नाही आणि मोठ्या शहरातल्या परीक्षा केंद्रात जाणंही शक्य नाही. मग घरीच राहूनच अभ्यास करायचा त्याने निर्णय घेतला. आणि लगेच त्याने अभ्यासाला सुरुवातही देखील केली. 
गणित आणि इंग्रजी हे विषय त्याला अवघड वाटत होते. त्यासाठी गारगोटीतील यश क्लासेस आणि ध्येयसाधना क्लासेस येथे मार्गदर्शन घेतले. हे करत असतानाच शारीरिक तंदुरुस्तीसाठी श्री शाहू प्रबोधिनी भुदरगड तालुक्यातील कोनवडे इथं मार्गदर्शन घेतलं. २०१३ पासून संदीपने राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली होती. सलग दोन प्रयत्नात अपयश आलं. तरी न खचता त्यानं अभ्यास सुरू ठेवला. तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश आलं. आणि पोलिस उपनिरिक्षकपदाच्या परिक्षेत तो राज्यात सहावा आणि तर इतर मागासवर्ग प्रवर्गात पहिला आला. 
अपयशानं खचून जाणारी, हार मानणारी मुलं खूप आहेत. पण परिस्थिती कशीही असो ती कशी हाताळायची, तिच्यावर मात कशी करायची हे देखील संदीपने दाखवून दिलं आहे. पुढील वाटचालीसाठी संदीपला शुभेच्छा!