जीवन इतना प्यारा है…

“मला स्तनाचा कॅन्सर असल्याचं कळालं आणि जळगावमध्येच मी उपचार घेऊ लागले. ऑपरेशन वगैरे झालं. तेव्हा माझ्याच कॉलनीत या आजाराच्या ४-५ पेशंट कळल्या. कॅन्सरचं निदान झालं की, साहजिकच सगळ्यांना खचायला होतं. डॉक्टरही म्हणतात की, ६० टक्के आमची औषधं काम करतील पण उरलेली ४० टक्के तुमची स्वतःची हिंमत आणि सकारात्मकता इथं कामी येते. याच काळात रेवती ठिपसे या मैत्रिणीशी माझी या विषयावर चर्चा चालायची. या काळात स्त्रियांना असलेली आधाराची गरज जाणवत होती. आमच्या चर्चेतून ७ एप्रिल २००८ मध्ये माझ्याच घरी ‘आम्ही मैत्रिणी’ हा ग्रुप तयार झाला”, जळगावच्या उषा शर्मा सांगत होत्या. ‘आम्ही मैत्रिणी कॅन्सर सपोर्ट ग्रुप’च्या त्या संस्थापक सदस्य. 


या ग्रुपमध्ये चेअरमन, सेक्रेटरी असं काहीही पद नाही. जवळपास ४२ जणी या ग्रुपच्या सदस्य आहेत. ग्रुपच्या आणखी एक संस्थापक रेवती ठिपसे. त्यांना १९९८ मध्ये रक्ताच्या कॅन्सरचं निदान झालं. तो बरा झाला आणि काही वर्षांनी स्तनाचा कॅन्सर झाला. त्या सांगतात, “मी बरी झाले. आणि त्याविषयी मी समुपदेशनही सुरु केलं. पण नंतर नंतर असं जवळच्या खूप व्यक्तींना कॅन्सर झाल्याचं ऐकू येऊ लागलं. तेव्हा आता हे प्रमाण वाढतं आहे हे लक्षात आलं. आणि ग्रुपच्या माध्यमातून काम करायचं ठरवलं.” 
या ग्रुपचं हे दहावं वर्ष. आता या ग्रुपला दोन स्त्री रोग तज्ञ, एक आहारतज्ञ आणि एक कॅन्सर सर्जन लागेल ती मदतही करत आहेत. रेवती म्हणाल्या, “या ग्रुपमधून आम्ही आता जळगाव जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यांमध्ये पोहोचलो आहोत. तिथंही आम्ही भजनामधून कॅन्सरविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत”. 


या ग्रुपकडून समुपदेशन मिळालेल्या काहीजणी आता ग्रुपचं काम जोमाने पुढं नेऊ लागल्या आहेत. त्यातल्याच एक आहेत, सुलभा कुलकर्णी. त्यांना कॅन्सर झाला तेव्हा याच ग्रुपनं त्यांना आधार दिला. त्या म्हणतात, “या काळातला ग्रुपचा आलेला चांगला अनुभव आणि माझा कॅन्सर या सगळ्यावर मला नंतर लिहावंसं वाटलं. आणि ‘कॅन्सरला आन्सर’ हे माझं एक पुस्तक प्रसिद्ध झालं. माझा आजार बरा झाला आणि मीही स्वतःला या ग्रुपशी जोडून घेतलं. 
हा ग्रुप कौन्सिलिंग तर करतोच. शिवाय आहार काय हवा हे सांगतो. आजार झाल्यावर आपण औषधोपचार करतोच. पण तो होऊच नये म्हणून आधी कोणती काळजी घ्यायची, स्तनाची घरच्याघरी कशी तपासणी करायची हेही सांगतो. एखादीला कॅन्सर झाला तर तिला डॉक्टरांची नावं असलेली यादी, गरज असेल तिला एका केमोथेरपीसाठी आर्थिक मदतही दिली जाते.

रेवती म्हणतात, “आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलं आहे. त्यामुळे केमोथेरपी घेताना डोक्यावरचे केस जाऊ नयेत म्हणूनही इंजेक्शन्स, औषधं दिली जातात. गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून मुलींना १० व्या वर्षानंतरच किंवा लग्नाआधी कॅन्सर सर्व्हिक्स प्रिव्हेन्शन लस देता येते. हे सगळं करता येऊ शकतंच. पण कुठल्याही परिस्थितीत खचून जायचं नाही. हे मात्र आपणच मनाशी ठरवायचं”. ग्रुपमधल्या माणिक मुठे या मैत्रिणीच्या ओळी खूप काही सांगतात – 
यार, यहां डरना मना है
जीवन इतना प्यारा है
बचेंगे और भी लडेंगे
यही हमारा नारा है