अवघड सोपे झाले हो!!

गणिताचं नाव काढलं की भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. कॅलक्युलेटरशिवाय आकडेमोड करायची म्हटलं, तर मग घामच फुटतो. गणिताचा पाया हा शाळकरी वयातच पक्का होऊ शकतो, या विश्वासानं आम्ही सांगलीतील दहिवडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी Ajay Kale- Tech Guru या नावानं एक यूट्यूब चॅनल सुरु केलंय.दहिवडीच्या शाळेत मी २०१६ मध्ये तर पाटील सर २०१४ मध्ये रूजू झाले. पण आमची ओळख २००९ पासूनची. शिक्षण विभागातर्फे पहिलीच्या अभ्यासक्रमासाठीचे प्रशिक्षण घ्यायला मी आणि एन डी पाटील सर गेलो होतो. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, “घरात पडलेली गाडगी- मडकी, चाक, मातीनं मळलेले कपडे पाहून कुंभाराचं घर सहज ओळखू येतं. शिक्षकाचं घर असं वेगळं ओळखता येतं का? त्यासाठी काय करावं लागेल?”


   या प्रश्नानं आम्हाला विचारप्रवृत्त केलं. शिक्षक म्हणून आपण आपलं ज्ञान अद्ययावत ठेवायला हवं, वेगवेगळ्या विषयांची किमान शंभरेक पुस्तके, उत्तमोत्तम मासिकं आणि काळाची गरज बनलेला कॉम्प्युटरही आपल्याकडे हवा, याची जाणीव आम्हाला झाली.आम्ही दोघांनी स्वकमाईतून दोन लॅपटॉप खरेदी केले. त्यासाठी आम्हाला सुमारे 70 हजारांचा खर्च त्या वेळी आला. आम्ही मुद्दाम डेस्कटॉप कॉम्प्युटरऐवजी लॅपटॉपची निवड केली, कारण लॅपटॉप सहज उचलून कुठेही नेता येतो आणि तो चार्जिंग असेल तर वीजपुरवठ्याशिवायही चालतो.

सुरुवातीला आम्ही दोघं आपापल्या शाळेत या लॅपटॉपचा वापर करून प्रचलित असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या सीडी दाखवायचो. पण त्यापेक्षा वेगवेगळ्या विषयावरचं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मुलांना जास्त आवडतं हे लक्षात आलं. उदा. इतिहासातील पन्हाळगडास वेढा आणि बाजीप्रभूंचा पराक्रम. 
एन डी पाटील सर म्हणजे गणित सोपे करून शिकविणारा जादूगार, अशी त्यांच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांची भावना असते. पाटील सरांचं सुमारे १७ वर्षांचं ज्ञान आणि गणित सोपं करण्याची हातोटी आपल्या शाळेपुरती मर्यादित ठेवणं, मला योग्य वाटेना. मला तंत्रज्ञानाची खूप आवड आहे, या माध्यमातून काही करता येईल का, याचा विचार मी करू लागलो.

मग स्मार्टफोनच्या साहाय्यानं मी पाटील सरांच्या गणिताच्या छोट्या- छोट्या कलृप्त्यांचं चित्रीकरण करायला लागलो. हे व्हिडिओ आमच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून प्रोजेक्टरवर मुलांना दाखवू लागलो. हा प्रयोग मुलांना फारच आवडला. पारंपरिक पद्धतीनं वह्या- पुस्तकं वापरण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले हे व्हिडिओ पाहून गणिताचा तो घटक समजून घेण्यात मुलं रंगून जायची. 
आमचा हा प्रयोग गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांना फार आवडला. हा प्रयोग दहिवडी शाळेपुरता मर्यादित ठेवण्यापेक्षा इतर शाळांपर्यंतही कसा पोहोचवता येईल याचा विचार करा, असा सल्ला त्यांनी दिला आणि त्यातूनच आकाराला आलं आमचं – Ajay Kale- Tech Guru चॅनल.
टेकगुरू या यूट्यूब चॅनलवर गणितासंदर्भात कोणत्या क्लृप्त्या पाहायला मिळतील हे जाणून घेण्यासाठी क्लीक करा: https://bit.ly/2CouzIR