चार घास सुखाचे…

जिल्हा सातारा. माण तालुक्यातील म्हसवड. साधारण ३५ हजार लोकसंख्येचं गाव. इथल्या ‘निर्भीड फौंडेशन’ आणि ‘कला फ्रेंड्स’ या संस्थांचा उपक्रम म्हणजे ‘चार घास सुखाचे’. निर्भीड फौंडेशनचे डॉ. चेतन गलांडे म्हणतात, “भारतातील एकूण धान्य उत्पन्नाच्या एक तृतीयांश अन्न वाया जातं आणि तरीही लाखो लोक रोज उपाशी झोपतात. बऱ्याच लोकांना वाटतं की हे फक्त शहरापुरते मर्यादित आहे. काही सेवाभावी संस्था बेंगळूरू, दिल्ली, मुंबई, जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये अन्नदान तसेच समारंभामध्ये जादाचे राहिलेले अन्न गरीब भुकेल्या लोकांना पुरवण्यासाठी काम करतात. पण छोटी शहरे आणि गावं यामध्ये अन्न वाया जात नाही का? लोक उपाशी झोपत नाहीत का? असं अनेक प्रश्न मला पडत होते. नव्हे, वास्तव समोर दिसत होतं. कारण गावामध्ये भीक पण मागता येत नाही लाज आडवी येते! कित्येक वृद्ध, म्हातारे लोक ज्यांची मुले मोठ्या हुद्द्यावर शहरात काम करतात त्यांच्या जेवणाची पंचाईत झालेली असते. ‘आई जेवण घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही’ अशी त्यांची अवस्था झालेली असते. विविध कारणांमुळे आता इथंही वृद्ध, म्हाताऱ्या लोकांची संख्या वाढते आहे.

अर्थातच त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्नही आ वासून उभा आहे”. डॉ गलांडे यांना या सगळ्या परिस्थितीने विचार करायला भाग पाडलं. कला फ्रेंड्स संस्थेच्या दत्ता गोंजारी यांच्याशी चर्चा झाली. आणि ‘चार घास सुखाचे’ या उपक्रमाने आकार घेतला. 
म्हसवडच्या एसटी बस स्थानकापासून चार-पाच मिनिटांच्या अंतरावर चार घास सुखाचे हे केंद्र आहे. सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत येणाऱ्या प्रत्येक गरजू, भुकेल्या व्यक्तीला केवळ पाच रुपये आकारून जेवण दिलं जातं. एखादी व्यक्ती तेवढेही पैसे देऊ शकत नसेल तर अर्थातच तिला मोफत. गेले अडीच-तीन महिने एकही दिवस सुट्टी न घेता हा उपक्रम सुरु आहे. रोज साधारण ५० लोकांचं जेवण इथं बनवलं जातं. या केंद्राचं काम बघणारा सारंग लोंढे सांगतो की, “एक पथ्य आम्ही पाळलं आहे, दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तींना आम्ही कटाक्षाने इथं जेवण देत नाही”. 

या योजनेत रोज एका अन्नदात्याच्या मदतीने अन्नदान केले जाते. केंद्रावर लावलेल्या बोर्डवर ‘आजचा अन्नदाता’ नावाने त्याचा गौरव केला जातो. काही लोक फूल ना फुलाची पाकळी म्हणून कुवतीप्रमाणे धान्य, भाज्या, थंड पाणी दान स्वरुपात देतात. 

डॉ. चेतन म्हणतात, “चार घास सुखाचे या नावाप्रमाणेच, पंचपक्वान जेवण न देता पोटभर होईल असं दोन चपात्या व भाजी दिली जाते. ज्यामुळे गरजू लोक त्या वेळेमध्ये येऊन जेवण घेतात. सध्या दोन महिला स्वयंपाक करतात. त्यासाठी त्यांना मानधनही दिलं जातं. त्यांना भाजीपाला व धान्य पुरवण्याचे काम संस्थेचे सभासद करतात. शिजवलेले अन्न केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं कामही हे सभासद करतात. त्याचे आम्ही वेळापत्रक बनवले आहे.”


डॉ. चेतन सांगतात, “आमच्या नंतर आता सातारा शहर, कोल्हापूर शहर येथे असे उपक्रम चालू झाले आहेत”.
निर्भीडची स्थापना २००९ झाली असली तरी गेल्या वर्षभरापासून त्यांनी सामाजिक कामाला जोरदार सुरुवात केली आहे. या वर्षभरात त्यांनी जिल्हा परिषद शाळा पुळकोटी येथे ११ कॉम्प्यूटरची डिजिटल क्लासरूम चालू केली आहे. तसेच विविध गावांमध्ये रोग निदान शिबीर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये दंतचिकित्सा शिबीर, जंत निर्मुलन व पोलिओ लसीकरण, महिला सक्षमीकरण यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सारंग सांगतो की, “रोजच्या जेवणाचा खर्च साधारण १३०० ते १४०० रुपये खर्च येतो. महिन्याचे अंदाजे निम्मे दिवस आम्हाला अन्नदाते उपलब्ध होतात. वाढदिवस, जयंती, वर्षश्राध्द त्या दिवसाचा अन्नदानाचा खर्च करतात. उरलेल्या दिवसाचा खर्च डॉ. चेतन गलांडे स्वत: करतात.