मॅरेथॉनचं गाव- साताऱ्याची नवी ओळख

सात डोंगरांच्या कुशीत दडलेलं, नैसर्गिक वरदान लाभलेलं – सातारा. छत्रपतींची राजधानी म्हणून लौकिक, एकेकाळचा सहकार चळवळीचा बालेकिल्ला असलेली ही भूमी आता मॅरेथॉनचे गाव म्हणून जगभरात ओळखली जाऊ लागली आहे. 
दक्षिण आफ्रिकेतली ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ जगातील सर्वाधिक जुन्या स्पर्धांपैकी एक. तिच्या वेगळेपणामुळे जगात प्रसिद्ध. ही स्पर्धा नेहमीसारखी रस्त्यावरुन किंवा सपाट भूभागावरुन धावण्याची नाही. ही आहे हिल मॅरेथॉन. म्हणजेच उंच पसरलेल्या डोंगररांगावर असलेल्या उंचसखल रस्त्यावरुन धावणे. यामुळेच जगभरातल्या स्पर्धकांसाठी ती आव्हानात्मक ठरते. 

सातार्‍यातले डॉक्टर संदीप काटे यांना २०११ मध्ये या स्पर्धेविषयी कळलं. पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ १९२१ पासून डर्बनमध्ये ही ८९ किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन भरवली जाते. आजपर्यंत सुमारे ३० लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धकांचा कस पाहणाऱ्या ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’बाबत कळल्यावर डॉक्टर संदीप काटे भारून गेले. यातूनच प्रेरणा घेऊन साताऱ्यात आपण अशी मॅरेथॉन घेऊ शकतो का याची चाचपणी ते करू लागले. २०१२ मध्ये यवतेश्‍वरच्या घाटात त्यांचा शोध संपला. सातारा शहरही काही प्रमाणात, काही अंशी डर्बनप्रमाणेच आहे. यवतेश्‍वर डोंगरावरच्या रस्त्यावर असणारा उंचसखलपणा, ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’सारखं असणारं भौगोलिक वातावरण सगळं काही मॅरेथॉनच्या आयोजनासाठी अनुकूल असल्याचं काटे यांना त्यांच्या अभ्यासात आढळलं . मॅरेथॉनच्या आयोजनाची त्यांची कल्पना सहकाऱ्यांनीही उचलून धरली. 
काही समविचारी व्यक्तींच्या साथीनं काटे यांनी सातारा हिल हाफ मॅरेथॉन कमिटी स्थापन करुन स्पर्धेची जय्यत तयारी केली. ७ ऑक्टोबर २०१२ ला पोलीस कवायत मैदान ते यवतेश्‍वर घाटातून प्रकृती रिझॉर्टपर्यंत हाफ मॅरेथॉनचा ट्रॅक करण्यात आला. या स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षी विदेशी-देशी व स्थानिक अशा ३ ते ४ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. देशातली ही पहिली हिल मॅरेथॉन ठरली. हळूहळू स्पर्धेची महती पसरू लागली . दरवर्षी हजारो लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ लागले. डोंगरावर धावण्याच्या स्पर्धेत ( सिंगल माउंटन ) सर्वाधिक लोक सहभागी होण्याचा विक्रम या स्पर्धेच्या नावावर आहे. त्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अशा प्रकारची जगातील ही दुसरी मॅरेथॉन असून आज जगभरात तिचा लौकिक पसरला आहे. सातारा हिल हाफ मॅरेथॉन कमिटी दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे मातीतील खेळ. हल्ली मोबाईल-टीव्हीच्या जमान्यात लहान मुलं मातीतील खेळ विसरली आहेत. हे ओळखून सातारा हिल हाफ मॅरेथॉन असोसिएशन मातीतील खेळांचा उपक्रम दरवर्षी शाहू स्टेडियममध्ये आयोजते.
याखेरीज इतरही काही स्पर्धां भरतात. त्यांच्या आयोजनात महिलांचा पुढाकार आहे. राजवी हेळगेकर यांची एल.ओ. एस.ओ. एम., तसंच चंद्रलेखा घाडगे यांची आयकॉनिक ऑरा वूमेन्स रन या मॅरेथॉन स्पर्धाही काही वर्षांपासून सातार्‍यात चांगलंच बाळसं धरू लागल्या आहेत. महिलावर्गातून यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 
सातार्‍यावर निसर्गानं मुक्तहस्ते उधळण केली आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कास- यवतेश्‍वर, बामणोली या ठिकाणी भेट देतात. सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या निमित्तानं पर्यटनही होतं . त्यामुळे स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. यामुळे आता मॅरेथॉनचं गाव अशी नवी ओळख साताऱ्याला मिळाली आहे.

भरतात. त्यांच्या आयोजनात महिलांचा पुढाकार आहे. राजवी हेळगेकर यांची एल.ओ. एस.ओ. एम., तसंच चंद्रलेखा घाडगे यांची आयकॉनिक ऑरा वूमेन्स रन या मॅरेथॉन स्पर्धाही काही वर्षांपासून सातार्‍यात चांगलंच बाळसं धरू लागल्या आहेत. महिलावर्गातून यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 
सातार्‍यावर निसर्गानं मुक्तहस्ते उधळण केली आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कास- यवतेश्‍वर, बामणोली या ठिकाणी भेट देतात. सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या निमित्तानं पर्यटनही होतं . त्यामुळे स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. यामुळे आता मॅरेथॉनचं गाव अशी नवी ओळख साताऱ्याला मिळाली आहे.