आमची दप्तरमुक्त शाळा

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कापसी गावात आजही साधी एसटीसुद्धा येत नाही. इथले बहुतांश ग्रामस्थ छोटे शेतकरी किंवा शेतमजूर. पण याच गावात आहे सोलापूर जिल्ह्यातील पहिली १०० टक्के टॅब शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापसी. या टॅबक्रांतीने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी केलेलं आहे. ही शाळा डिजिटल करण्याची प्रेरणा मला मिळाली ती ठाण्यातील पष्टेपाडा जि.प. टॅब शाळेचे प्रणेते संदीप गुंड सरांकडून. सोलापुरात शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या तंत्रस्नेही कार्यशाळेतील त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर, सोलापुरातील शाळा सुद्धा १०० टक्के टॅबयुक्त करायची, असा निश्चयच मी केला. 

कापसीमध्ये मी गावकऱ्यांना पष्टेपाडा शाळेतील विद्यार्थी कसे टॅब वापरतात हे दाखवलं, आपल्या सोलापुरातील डिसले सर स्काईपच्या माध्यमातून दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधतात, हेही सांगितलं. लोक अतिशय औत्सुक्याने हे सगळं ऐकत होते. मी त्यांना समजावीत होतो, “आपण जरी महानगरांपासून दूर असलो तरी तंत्रज्ञान ही जगाशी संपर्क साधण्याची खिडकी आहे. आपण विकासापासून दूर असलो तरी नव्या पिढीसाठी तंत्रज्ञानावर हुकुमत मिळविणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता जर पोटाला चिमटा काढून या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही मदत केलीत, तर त्यांचं आयुष्य नक्कीच अधिक सुखकर होईल आणि भविष्य उज्ज्वल होईल.” अर्थात हे सगळं सांगण्यासाठी मी गावाच्या वारंवार फेऱ्या केल्या.


पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन मला जाणवत होता. दरम्यान मी तिथं शिक्षक असलेल्या लांडे दांपत्यालाही तंत्रज्ञानाची तोंडओळख करून द्यायला सुरूवात केली. त्यांना स्मार्टफोन घ्यायला लावला, व्हॉटसअॅप सुरू करून दिलं, माझ्या मोबाईलमधली सगळी शैक्षणिक अॅप्सही त्यांना दिली. त्या अॅप्सच्या आधारे ते शाळेत विद्यार्थ्यांना शिकवू लागले. विद्यार्थ्यांनाही फळा- खडू आणि वही- पुस्तकापेक्षा ही ऑडिओ- व्हिज्युअल अॅपद्वारे शिकणं, जास्त आनंदाचं वाटू लागलं. दरम्यान माझा ग्रामस्थांशी संवाद सुरूच होता, या सगळ्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की २०१७  च्या शैक्षणिक वर्षासाठी पाच पालक त्यांच्या मुलांना टॅब घेऊन देण्यासाठी तयार झाले.
२०१७ मध्ये या पाच मुलांचे शिक्षण टॅबच्या माध्यमातून सुरू झालं. शिक्षकांच्या मदतीने मी या मुलांच्या टॅबमध्ये इ- बालभारती या वेबसाईटवरून त्यांच्या इयत्तांनुसार पाठपुस्तकांच्या पीडीएफ डाऊनलोड करून दिल्या, अनेक शैक्षणिक गेम्स आणि सॉफ्टवेअर डाऊनलोड करून दिले. टॅबचा वापर कशा पद्धतीने करायचा याचं मार्गदर्शन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना करण्यासाठी मी सातत्याने कापसीला येत होतो. या टॅबवर शैक्षणिक खेळातून, गाणी ऐकत, व्हिडिओ पाहत शिकणं विद्यार्थ्यांना आवडू लागलं. वहीवर पेनाने लिहिण्यापेक्षा टॅबवर बोटाने अक्षरं गिरविण्यात मुलांना मजा वाटू लागली. त्यांना आता वह्या- पुस्तकांची गरजच वाटेना. कारण त्यांच्या टॅबमध्ये पुस्तकंही होती आणि वह्यांची तर गरजच नव्हती. त्यामुळे या पाच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी झालं.
पाच मुलांनी शाळेत आणलेल्या टॅबचे इतर विद्यार्थ्यांनाही आकर्षण वाटू लागलं. तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढतोय, हे जेव्हा पालकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी देखील टॅबखरेदीची तयारी दाखविली. संपूर्ण शाळेतील २५ विद्यार्थ्यांनी टॅब घेतले आणि सप्टेंबर २०१७ पर्यंत कापसी शाळा १०० टक्के टॅबयुक्त झाली.
संपर्क: ९४२३०८१०६७