दुष्काळातही मिळाला हिरवा चारा

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील टेंभुणीं या गावातील गणेश भरगंडे हे शेती व्यावसायिक. अगदी कमी खर्च व कमी पाणी लागणारा हायड्रोपॉनिक म्हणजे हिरवा मका चारा प्रकल्प शेतकरी भरगंडे यांनी यशस्वी करून दाखवला आहे. दुष्काळातही जनावरांसाठी हा प्रकल्प इथल्या शेतक-यांना वरदान ठरला आहे. यातून दहा दिवसात सकस चारा तयार होऊ शकतो. 
एका गुंठ्यामध्ये सेडनेट जाळी तयार करून त्यामध्ये त्यांनी ऐंशी फायबर ट्रे ठेवले. एका ट्रे मध्ये दोन ते तीन किलो भिजवलेला मका टाकला. दहा दिवसात त्यापासून दहा किलो पर्यंत सकस चारा तयार झाला. हे पाहिल्यानंतर पन्नास ते साठ शेतक-यांनी भरगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चारा प्रकल्प तयार केले. २००७ साली त्यांच्याकडे फक्त एक जर्शी गाय होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी चार गायी विकत घेतल्या. आता त्यांच्याकडे पंचवीस गायी आहेत. दुग्ध व्यवसायापासून त्यांना दररोज एक हजार रूपये नफा मिळतो अगदी कमी कष्टात. 


भरगंडे हे वेगवेगळ्या व आधुनिक पध्दतीने चारा तयार करणारे शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी दुसरा एक प्रकल्प राबवला आहे. अँजोले म्हणजे समुद्री शेवाळे, यापासून जनावरांचे प्रोटीन युक्त खुराक मिळते. यामुळे जनावराचे आरोग्य चांगले राहते. दहा बाय पाच फूट आकाराच्या वाफ्यात पाणी सोडले आहे. वरती शेडनेट जाळी मारली आहे. एका वाफ्यातील अँजोला काढल्यानंतर त्यात थोडे ठेवले जाते. पुन्हा दहा दिवसात त्याची वाढ होत राहते. एक किलो अँजोला पासून परत दहा दिवसात पाच किलो तयार होते. त्यातून ते जनावरांना दररोज एक किलो प्रमाणे अँजोला कल्चर खुराक म्हणून देतात. अँजोला जनावरांना दिल्याने बाजारातील खुराक विकत घ्यावे लागत नाही.


जनावरांना वर्षभर पुरेल अशी मुरघास साठवण ते करून ठेवतात. त्यासाठीही त्यांनी आधुनिक पद्धत वापरली आहे. पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात असतो. मुरघास करण्यासाठी हा हिरवा चारा थोडा सुकवला जातो. त्यानंतर त्याच्यावर बुरशी नाशक औषध, युरिया, फॉस्फेट, मीठ याच द्रावण तयार करून फवारले जाते. जमिनीच्या खड्यात किंवा प्लास्टिक आवरणात हवाबंद ठेवला जातो. ज्यावेळी या चा-याची गरज भासेल त्यावेळेस जनावरांना हा चारा दिला जातो. या आधुनिक चारा प्रकल्पामुळे वेळेत बचत होते.

मनुष्यबळ कमी लागते व खर्च कमी होतो. त्यामुळे त्यांना दुग्ध व्यवसायात चांगला नफा मिळू लागला आहे. त्यांचे चारा प्रकल्प पाहण्यासाठी पंचक्रोशीतून शेतकरी भेट देतात. काही वेळा शेतक-यांच्या शेतात जाऊन कशा ते मार्गदर्शन करतात. एका गाई पासून आज त्यांच्याकडे पंचवीस चांगल्या प्रतिच्या जर्शी गायी तयार झाल्या आहेत. त्यांनी मुक्त गोठा ही संकल्पना राबवली असल्याने जनावरे सांभाळण्यासाठी त्यांना कुठलेच कष्ट घ्यावे लागत नाहीत. दूध काढण्यासाठी अत्याधुनिक मशिनचा वापर केला जातो. त्यांच्या प्रकल्पाला सोलापूर जिल्ह्याचे तात्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जिल्हा कृषी अधिकारी बिराजदार, तहसिलदार रमेश शेंडगे, प्रांताधिकारी मनिषा कुंभार यांनी भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले.