प्रगतीची सायकल

सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या व्होळे गावातल्या साक्षी महावीर चोपडेला आता पुढल्या वर्षी वरवडे इथल्या माध्यमिक शाळेत जाता येणार आहे. अरण गावातल्यासाक्षी विष्णु काळेची शाळा अडीच किलोमीटरवर. दुष्काळामुळे घरची स्थिती बेताची. आता तिला रोज शाळेत जाता येणार आहे आणि वेळ वाचल्यामुळे अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे. या दोघींसह माढा तालुक्यातल्या २५० मुलींच्या जीवनात आता बदलाची आशा करायला हरकत नाही.


महिला सक्षमीकरणात शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा टप्पा. ग्रामीण भागात मात्र आजही अनेक मुलींना शिक्षणासाठी अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणारेही आहेतच. सोलापूर जिल्ह्यातल्या निमगाव इथल्या माढा वेलफेअर फाऊंडेशननं परवा ग्रामीण भागातल्या २५० मुलींना सायकली दिल्या. माढा तालुक्यातल्या मोडनिंब इथं हा कार्यक्रम झाला.

“ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्यार्थिनींसाठी घर ते शाळा प्रवास फारच खडतर, प्रगतीतला अडसर.”सचिव युवराज शिंदे सांगतात.”सायकलचा मुलींना उपयोग होतो आणि त्याचा परिणाम गुणवत्तावाढीवर होत असल्याचं अशा काही प्रयोगातून दिसून आलं आहे.” शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, शासकीय यंत्रणा, शिक्षक, पालक, मुली यांच्याशी संस्थेने चर्चा केली. मुलभूत सर्वेक्षण, माहिती संकलन, देणगीदारांच्या भेटी, सामजिक दायित्वांतर्गत देणगी देणाऱ्या कंपन्यांसमोर सादरीकरण. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनराज शिंदे यांच्यासह २५ कार्यकर्ते १५ महिने यासाठी प्रयत्न करत होते.