दक्ष राहिली अंगणवाडीसेविका विवाहात अडकण्यापासून सुटली बालिका..

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील एक गाव. पांडुरंग कुटुंबासह रोजमजुरी करून गुजराण करतात. त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं. लहान मुलगीही वयात आलीच होती. घरात लग्नाचा मंडप पडणार आहे तर मोठीसोबतच लहानीचेही हात पिवळे करण्याची तयारी सुरू झाली. घाटंजी तालुक्यातील एका खेड्यातील तरूणाने लहान ग्रीष्मास(नाव बदलले आहे) पसंत केलं. दोन्ही मुली एकाच दिवशी बोहल्यावर चढणार म्हणून घरात आनंद होता. लग्नाच्या पत्रिका न छापता नातेवाईक व गावकऱ्यांना ३ एप्रिलला होणाऱ्या या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आलं. गावातील अंगणवाडीसेविकेला ग्रीष्मा अल्पवयीन असल्याचं माहीत होतं. तिने पांडूरंगरावांची भेट घेतली. ती सज्ञान होईपर्यंत लग्न करू नका असं समजावलं. पंरतु ग्रीष्माच्या कुटुंबियांनी चुकीची माहिती भरून काढलेलं आधार ओळखपत्र दाखविलं. त्यात ग्रीष्माचा जन्म २००० साली झाल्याची नोंद होती. तर अंगणवाडीसेविकेच्या दप्तरातील नोंदीनुसार ३ एप्रिल रोजी ग्रीष्माचे वय १६ वर्ष ६ महिने इतकं होतं. तरीही कुटुंबियांनी लहान मुलीचा विवाह करण्याचा घाट घातला. 


बुधवारी ३ एप्रिल रोजी सकाळीच ‘चाईल्ड लाईन १०९८’ या हेल्पलाईनवर मुंबई येथे एक निनावी कॉल आला. मारेगाव नजीक एका गावात अल्पवयीन मुलीचा सकाळी १० वाजता विवाह होणार असल्याची ‘टिप’ पलीकडून मिळाली. यवतमाळ येथील चाईल्ड लाईनच्या केंद्र समन्वयक अर्पणा गुजर यांना ही माहिती देण्यात आली. त्यांनी महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले यांना कळविलं. इंगोले यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्काळ त्या गावी पाठवलं. महिला व बालविकास विभागाचे परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे, बाल संरक्षण कक्षाचे विसुरडे यांच्यासह चाईल्ड लाईनच्या अर्पणा गुजर, शीतल काटपल्लीवार, दिलीप दाभाडकर तत्काळ गावात पोहचलं. गावात बालविवाह होत असल्याची माहिती मारेगाव तहसीलदार, पोलीस ठाण्यात दिली. हा चमू गावात पोचला तेव्हा दोघींच्याही लग्नाची तयारी झाली होती. ग्रीष्मा आणि तिची मोठी बहीण दोघीही नटून थटून बोहल्यावर चढण्यासाठी तयार होत्या. मोठीचा नियोजित वर मंडपात दाखल झाला होता. ग्रीष्माच्या वराची प्रतीक्षा सुरू होती. मात्र मंडपात अचानक चाईल्ड लाईन, महिला बालविकास विभागाचे अधिकारी, पोलीस पोहचल्याने खळबळ उडाली. नातेवाईकांनी प्रारंभी हा बालविवाह नसून ग्रीष्मा सज्ञान असल्याचंच ठासून सांगितलं. मात्र अंगणवाडीचं रेकॉर्ड तपासलं तेव्हा ग्रीष्मा अल्पवयीन असल्याचं सिद्ध झालं. हा बालविवाह लावून दिल्यास उपस्थित सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत ग्रीष्माच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांची सभा घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतूदी, ग्रामसभेने गावात बालविवाह होऊ न देण्यासाठी घ्यावयाचे वचन आदी माहिती दिली. त्यावेळी ग्रीष्माच्या वडिलांनी आपल्याला या कायद्याची माहितीच नव्हती, असं सांगितलं. गावातही यापूर्वी अशी जनजागृती झाली नसल्याची बाब यानिमित्ताने पुढं आली. अखेर ग्रीष्मा सज्ञान होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असं वचन तिच्या पालकांनी दिलं. ग्रीष्माच्या नियोजित वरास व त्याच्या कुटुंबियास ती अल्पवयीन असल्याने हा विवाह होणार नसल्याचा निरोप पाठविण्यात आला. त्यामुळे हे वऱ्हाडी लग्न मंडपात न येताच माघारी फिरले.
या घटनेत अल्पवयीन मुलीचा विवाह रद्द केल्याने कोणावरही कारवाई झाली नाही. या घटनाक्रमानंतर ग्रीष्माच्या मोठ्या बहिणीचा विवाह दुपारी ३ वाजता पार पडला. मात्र चर्चा रंगली ती वधूच्या तयारीत लग्नमंडपात आपल्या मोठ्या बहिणीमागे निरागसपणे फिरणाऱ्या अल्पवयीन ग्रीष्माचीच!