दिवाळीत पाडव्याला मेंढ्यांचे लग्न लावण्याची परंपरा
बदलत्या काळाबरोबर प्रत्येक समाजाच्या पूर्वापार परंपरांमध्ये काही प्रमाणात बदल होत असतात. स्थळ, काळ आणि परिस्थितीला अनुसरूनच हे सण – उत्सव साजरे केले जातात. मात्र अजूनही काही समाजांत पारंपरिक पद्धतीने सण साजरे केले जातात. मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकणाऱ्या आणि महिनोन्महिने आपल्या गावापासून, घरापासून दूर असणाऱ्या धनगर समाजात दिवाळीचा सण आगळ्या – वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी मेंढपाळ आपला मुक्काम पडेल त्या शेतात, रानमाळावर एक नर व मादी अशा मेंढ्यांना अंघोळ घालतात. त्यांच्यासाठी लोकरीचे तीन गोफ तयार करून पाडव्याच्या पहाटे या मेंढ्यांचे लग्न लावलं जातं. धनगरांचा पुजारी असलेला वीरकर मेंढ्यांच्या लेंड्यांच्या पाच लक्ष्मी करून त्यापुढे नवीन खराटा आणि काठी ठेवून पूजा करतो. त्यावर्षी जन्मलेल्या नर – मादी मेंढ्यांच्या जोडीच्या गळ्यात झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. हळकुंड बांधलेला गोफ मादीच्या तर पानसुपारीचा गोफ नराच्या गळ्यात बांधला जातो. एक गोफ मालकाच्या हाती असतो. या वेळी कळपातील मोठा एडका आणि मेंढ्यांच्या राखणदार कुत्र्याचीही पूजा करण्यात येते. धनगर बांधव तुणतुणे, डफ वाजवून खंडोबाची आरती करतात आणि मंगलाष्टके म्हणून मेंढ्याचे लग्न लावण्यात येते. यानिमित्ताने या प्राण्यांना पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो. या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे कुत्रा हा मेंढरांची राखण करतो म्हणून त्याची, संरक्षण करणारी म्हणून काठीची तसेच स्वच्छता ठेवतो म्हणून खराट्याची पूजा केली जाते.
लग्नाच्या विधीसाठी धनगरांकडून पुजारी वीरकराला धान्य, पानसुपारी, अकरा रुपये देऊन तर बाहेरून आलेल्या वीरकरांचा मेंढी देऊन सन्मान केला जातो. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांत ही प्रथा पहायला मिळते. काळाच्या ओघात अशा अनेक जुन्या परंपरा लोप पावत असताना धनगर समाज बांधव मात्र दरवर्षी आवर्जून दिवाळीत मेंढ्यांचे लग्न लावून ही परंपरा जपत आहे. तसंच मराठवाड्यात वर्षभर गुरांचा सांभाळ करणाऱ्या गुराखी बांधवांकडून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते.
– बाळासाहेब काळे, परभणी

Leave a Reply