डॉक्टर गावाचं हक्काचं माणूस होतात तेव्हा!
डॉ. संतोष अशोकराव देशमुख वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रूग्णालय सेलू इथं कार्यरत. सुरूवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र पोहरादेवी, ता मानोरा, जिल्हा वाशीम इथं नियुक्ती. त्याआधी सात वर्ष अस्थायी वैद्यकीय अधिकारी म्हणून ग्रामीण रुग्णालय, मानोरा इथं कार्यरत. मानोरा हा वाशिममधला आदिवासीबहुल तालुका, त्यामुळे भरपूर आदिवासी आणि जास्त प्रमाण आहे ते बंजारा समाजाचं. पुसद आणि यवतमाळला लागून हा तालुका आहे. डॉक्टर सांगतात, “इथं मला चांगला अनुभव आला. पहिल्यांदा ग्रामीण रुग्णालयात अस्थायी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम सुरू केलं तेव्हा थोडं गैरसोयीचं वाटत होतं. पण मग मीच ठरवलं की आपण इथं चांगलं काम करून दाखवायचं.”
डॉक्टर मूळचे परभणी तालुक्यातील पेडगावचे. त्यामुळे सुरूवातीला मानोऱ्याची परिस्थिती पाहून इथं कसं काम करणार असा विचाराने ते अस्वस्थ झाले होते. पण मग पेशंट सोबत संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचा नर्व्हसनेस कमी होत गेला. तिथं डॉक्टर दोन पद्धतींनी काम करायचे. पेशंट ज्या आजारासाठी यायचे त्यावर औषधोपचार ते करायचे. दुसरं त्यांच्या लक्षात आलं की फक्त एवढंच करून चालणार नाही, आजार होऊच नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठीही आपल्याला प्रयत्न करायला हवेत. मग एखाद्या पेशंटवर उपचार पूर्ण झाले की त्याला तो आजार कसा झाला, का झाला, तो परत होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, काय उपाययोजना करायची हे आदिवासी लोकांना समजावून सांगू लागले. तिथं संसर्गजन्य आजार जास्त होते. त्यामध्ये डायरिया, मलेरियाचे खूप रूग्ण तिथं आढळून यायचे. जे रूग्ण यायचे ते थेट बेशुद्ध अवस्थेतले आणले जायचे.
आदिवासी, बंजाराबहुल भागात काम करून लोकांना आपलंसं करणारे डॉ. संतोष देशमुख
डॉक्टर म्हणतात, “आता गेल्या दहा वर्षात तिथं भरपूर सुधारणा झाल्या आहेत. आधी रस्ते नव्हेत. आता रस्ते झालेत. तेव्हा प्रसूतीसाठी महिलांना बाजेवरून आणलं जायचं. कारण वाटेत पावसाळ्यात ओढा वगैरे लागायचा तो ओलांडून चालत येणं काही शक्य नसायचं. डॉक्टर तिथंच गावात हेडक्वार्टरला राहायचे त्यामुळे ते पूर्णवेळ कामावर राहू शकायचे. नंतर 2009 साली प्राथमिक आरोग्य केंद्र पोहरादेवी इथं त्यांना कायम नोकरीत घेण्यात आलं. तोवर ग्रामीण रुग्णालयात त्यांनी सात वर्ष काम केलं होतं. पोहरादेवी हे ठिकाण म्हणजे बंजारा समाजाची काशी. इथं सेवालाल महाराजांचं मोठं मंदिर आहे. आणि भारताच्या सर्व भागातून बंजारा समाजाचे लोक रामनवमीला, नवरात्रात तसंच यात्रेच्या काळात इथं जमतात. आजूबाजूला सगळा डोंगर भाग आहे.
डॉक्टर म्हणाले, “दोन-तीन वेळा मीही यात्रेच्या काळात इथं गेलो. तेव्हा लक्षात आलं की इथं डायरियाची साथ येते. जुलाब होतायत, म्हणजे सलाईन असाच तिथं समज होता. एकदा अशीच साथ आली, आम्हाला लगेच बोलावणं आलं. मी टीम घेऊन तिथं पोहोचलो. लोक अक्षरशः एका मंदिराच्या हॉलमध्ये एका बाजूला स्त्रियांची रांग तर दुसरीकडे पुरूषांची रांग लावून झोपले. होते. दोन्ही बाजूंना मस्त दोरी वगैरे बांधून सलाईन अडकायची सोय करून झाली होती. जवळपास 200 स्त्रिया आणि पुरूषही तितक्याच संख्येने असतील तिथं. रात्री दोनची वेळ असेल. माझी टीम तिथं पोचली होती. हे सगळं बघून मला हसायला आलं आणि न राहवून मी मोठ्यानं हसलो. सगळे कुतुहलाने, आश्चर्याने तर काहीजण रागाने पाहायला लागले. हे सगळं कशाला लावलं असं विचारलं. सरपंचांना बोलवायला सांगितलं. झोपलेल्या सगळ्यांना उठवायला लावलं आणि सांगितलं असं सगळ्यांना थेट सलाईन नाही लावणार. मी प्रत्येकाला तपासेन आणि गरज असेल त्यांना औषधोपचार किंवा सलाईन लावलं जाईल. मग सगळ्यांना आधी पायपाय धुवून यायला सांगितलं. नळ असलेली पाण्याची टाकी आणायला लावली. साबण लावून चोळून सगळ्यांना हातपाय धुवायला लावले. त्यासाठी तिथं एक आरोग्य कर्मचारीच उभा केला. सगळ्यांचे हातपाय धुवून झाल्यावर त्यांना तपासलं आणि ज्यांना गोळ्या-औषधं चालतील अशांना त्यांनी तोंडी घ्यायला औषधं दिली. एवढ्या मोठ्या संख्येने जे जमले होते त्यातल्या फक्त दोघांना सलाईनची गरज पडली. पण तिथं आजवर तीच पद्धत पडली होती की जुलाब झाले की लगेच सलाईनच लावायचं.”
महिला आणि बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते
पुढे डॉक्टर त्या भागात भरपूर फिरले. अनेक पेशंट त्यांनी तपासले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं औषधापेक्षा प्रतिबंधक उपायांची गरज जास्त आहे. तिथल्या शेंदोणा गावात सर्व आदिवासी राहतात. त्या गावात गेल्यावर डॉक्टरांनी एकदा सर्वांना हात धुवायचं प्रात्यक्षिक दाखवलं. उमरी आणि पोहरादेवी इथंही ते अंगणवाडीत त्यांची व्हिजिट असायची त्या दिवशी आशा आणि अंगणवाडी सेविकांना आणि गावकऱ्यांनाही बोलावून घ्यायचे. तिथंही त्यांना हात धुण्याचं प्रात्यक्षिक दिलं जायचं. कारण जुलाबाची साथ आटोक्यात आणायची असेल तर खूप प्रयत्न करायला लागायचे. त्यापेक्षा ही साथ येऊच नये, यासाठीचा महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय म्हणजे, हातांची स्वच्छता. म्हणून त्यांनी अंगणवाडीतल्या लहान लहान मुलांनाच ते हात नीट कसे धुवायचे यात तरबेज करायचं ठरवलं. त्यामुळे व्हायचं काय की, मुलांनी सांगितलेलं आई-वडील ऐकायचे. असं करत करतच तिथली ही जुलाब-उलटीची साथच गायब झाली. यावर उपाय काय होता तर- साधाच, हात स्वच्छ धुण्याचा. अर्थातच बाकीचे व्हायरल आजारही भरपूर कमी झाले.
डॉक्टर त्या काळात तिथं कॅम्पही घ्यायचे. महाराष्ट्र सरकारचा मानव मिशनचा कॅम्पही तेव्हा व्हायचा. दर बुधवारी गरोदर मातांची तपासणी शिबिर असायचं. पोहरादेवीत तेव्हा कुणी प्रसूतीसाठी येत नव्हतं. मग तिथं प्रसूतीवेळी डॉक्टर उपस्थित राहायला लागले. हळूहळू नॉर्मल डिलिव्हरीचा ट्रेंड तिथं सुरू झाला. नंतर तिथल्या लोकांचं सहकार्यही त्यांना मिळायला लागलं. डॉक्टरांची बोलायची पद्धत, शिवाय त्यांचं समाजात लोकांमध्ये मिसळून जाणं हे सगळंच लोक अनुभवत होते. त्यांचे काही कार्यक्रम, सण-समारंभ अशा सगळ्या गोष्टीत डॉक्टर आवर्जून उपस्थित राहायचे आणि शक्य होईल तिथं त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही करायचे.
डॉक्टरांना एकदा आमसभेला उपस्थित राहता आलं. तेव्हा मानोरा-कारंजाचे राजेंद्र पाटनी हे आमदार होते. त्यावेळी डॉक्टरांनी आरोग्य केंद्रात पेशंटला बसायला जागा नाही, प्यायला पाणी नाही असे काही प्रश्न मांडले. प्रशासनातले असूनही आमच्या गावाचेच प्रश्न मांडल्याबद्द्ल तेव्हा गावकऱ्यांना खूप आनंद झाला. पुढे प्राथमिक आरोग्य केंद्राचे हे प्रश्नही मिटले. पण मानोऱ्यातील तालुका रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न तसाच असल्याचं डॉक्टर सांगतात.
पोहरादेवीला वर्षातून पाच-सहा वेळा यात्रा भरायची. त्यावेळी कलेक्टर, सीईओ, लोकप्रतिनिधी अशा सगळ्यांच्या दोन-तीन मिटिंग व्हायच्याच. एका मिटिंगला डीएचओ शेगावकर साहेबांनी डॉ. देशमुख यांनाच तिथला आरोग्याचा प्रश्न मिटिंगमध्ये मांडायला सांगितला. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, “यात्रेच्या आधी आणि ती सुरू झाल्यावर मला काहीच प्रश्न नाही. पण यात्रा संपते तेव्हा खरा प्रश्न होतो.” तेव्हा त्यांनी विचारलं की, “हे कसं काय?” डॉक्टर सांगत होते, “यात्रेनंतर घाण होते. घाण होते ती अन्नाची नीट विल्हेवाट न लावल्याने. तिथं बोकड वगैरे कापले गेलेले असतात शिवाय भात असतो. हे सगळं एकत्र होत जातं त्यातून बॅक्टेरिया तयार होतात. आणि त्यातूनच लोकांना वेगवेगळे संसर्ग होतात.” हे सांगितल्यावर अधिकाऱ्यांना त्यातलं गांभीर्य लक्षात आलं. ते म्हणाले, आता यावर उपायही तुम्हीच सुचवा, काय करता येईल? डॉक्टरांनी सुचवलं की जिथं कचरा तयार होतो तिथंच त्याचं विलगीकरण करून विल्हेवाट लावता यायला हवी. साधारण पाच किमी परिसरात ही यात्रा भरते. मग कलेक्टर साहेबांनी वाशिमहून तिथं घंटा गाड्या बोलावल्या. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय केली. कचरा तयार होतो तिथं या घंटा गाड्या उभ्या राहिल्या आणि नंतर कचऱ्याचा प्रश्न मिटला. डॉक्टरांच्या या सूचनेमुळे तिथं यात्रेचं योग्य पद्धतीने नियोजन झालं आणि तेव्हापासून मग हीच प्रथा तिथं सुरू झाली.
वाशिम जिल्ह्यातल्या बंजाराबहुल पोहरादेवीत उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉ. संतोष देशमुखांना एका सहकाऱ्याने सुचवलं की, “तुमचं क्लिनिकल नॉलेज चांगलं आहे तर पुढची परीक्षा द्या म्हणजे कायम नोकरीत नेमणूक होईल. त्यानुसार सरांनी नोकरी करतानाच पदव्युत्तर पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुढे परभणीला वूमन हॉस्पिटलला त्यांची नेमणूक झाली. ग्रामीण रुग्णालयानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र पोहरादेवी आणि तिथून वूमन हॉस्पिटल, परभणी असा त्यांचा प्रवास झाला. ऑबस्ट्रेस्टिक्स आणि गायनॅकॉलॉजी असे दोन्ही पेशंट ते पाहायचे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या माता आपल्या बालकांसह
डॉक्टर सांगतात की, “तेव्हा लक्षात आलं की आदिवासी भागापेक्षाही विदर्भ, मराठवाड्यात स्त्रियांना बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. विदर्भापेक्षाही मराठवाड्यातली परिस्थिती त्यांना खालावलेली वाटली. त्यामुळे इथं स्त्रियांच्या आरोग्याविषयी बोललं तरी लोकं कान टवकारून पाहायचे, की हा माणूस या विषयावर बोलतोय आणि तेही स्त्रियांशी!!” मग यावर सरांनीच एक तोडगा काढला. गरोदर माता आणि प्रसूतीपश्चात माता यांचे प्रश्न आणि बाकी गायनॅकोलॉजीमधले काही प्रश्न यांना ते उत्तरं द्यायचे. प्रत्येक वॉर्ड वेगळा असला तरी ज्या वॉर्डात डॉक्टर असतील, त्यानुसार तिथल्या प्रश्नांवर ते सामुहिक मार्गदर्शन करायचे. कारण वॉर्डमध्ये पेशंट, त्यांचे नातेवाईक असे मिळून किमान 25-30 तरी लोक असायचे. तिथं मग प्रसूतीदरम्यान घ्यायची काळजी, प्रसूतीदरम्यान काय करायला हवा, प्रसूतीनंतर घ्यायची काळजी याविषयी ते सांगायचे. इथंही प्रसूतीनंतर वापरण्यात येणारे पॅड स्वच्छ, चांगले हवेत. पॅड वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर हात स्वच्छ धुवायला हवेत हे ते आवर्जून सांगायचे.
डॉक्टर म्हणतात, “इथंही हात स्वच्छ धुणं महत्त्वाचं ठरतं. कोरोनासाठी जसं हात स्वच्छ धुणं लागू होतं तसंच ते बाकी आजारात किंवा एरवीही लागू होतं. हात नाकातोंडाला लावण्यापूर्वी, लावल्यानंतर तसेच ते जननेंद्रियाला लागण्यापूर्वी आणि नंतरही धुतले गेले पाहिजेत. कुठल्याही आजारचे पहिले वाहक हातच ठरतात.” स्त्रिया प्रसूतीसाठी कळा घेताना खालच्या अंगाने घेतात त्या कशा घ्यायच्या, म्हणजे म्हातारपणी मायांग बाहेर येणार नाही किंवा मूळव्याधीचा त्रास होणार नाही हेही डॉक्टर समजावून सांगतात. हे सगळं ऐकता ऐकता हळूहळू लोकांच्याच लक्षात आलं की, या माणसाचा हे सगळं सांगण्यामागचा हेतू चांगला आहे, सामाजिक आहे. पहिला महिना सरांसाठी कठिण ठरला तरी नंतर त्या भागात सगळे डॉक्टरांना ओळखू लागले. स्त्रिया सुरूवातीला लाजतात, बोलत नाहीत असं असलं तरी नंतर नंतर त्या डॉक्टरांकडे त्यांची समस्या घेऊन यायला लागल्या.
वूमन हॉस्पिटलनंतर डॉक्टरांची बदली झाली ती सेलूला. आता उपजिल्हा रुग्णालय सेलू इथं येऊनही सरांना चार वर्ष झाली आहेत. तरीही डॉक्टरांनी वूमन हॉस्पिटलमधली त्यांची सिझर वगैरेसारखी ऑपरेशन्स सुरूच ठेवली.
डॉक्टरांनी जास्त काळ काम केलं ते ग्रामीण भागात मानोरा आणि पोहरादेवी इथं. तिथं बंजारा समाजाची वस्ती जास्त प्रमाणात. डॉक्टर सांगतात, “मानोरा इथं असताना कामावरून आलं तरी तिथं त्यांनी छोटं क्लिनिक सुरू ठेवलं होतं. ते म्हणतात, मला दुसरं काही व्यसन नव्हतं. मग पेशंट बघायचे, पुढचा अभ्यास करायचा, वाचायचं हेच व्यसन. मग सतत लोकांमध्ये असायचे. त्यातून जनसंपर्क चांगला वाढला.” त्यामुळे सात वर्षांच्या मानोऱ्यातल्या काळात त्यांना पोहरादेवीचे लोकही ओळखू लागले होते. डॉक्टर त्या त्या समाजाच्या चाली रीतींमध्ये भाग घ्यायचे, कार्यक्रम असतील तर तिथंही हजेरी लावायचे. त्यामुळे तिथंही भाषेची अडचण आली नाही. बंजारा समाजाची भाषा फार अवघड वाटली नाही. किंवा ग्रामीण मराठीत बोललं तरी त्यांना ते कळायचं. त्यांचं बंजाराही डॉक्टरांना कळायचं.
डॉक्टर मानोऱ्यात नोकरीत रूजू झाले तेव्हा तिथं दोन डॉक्टर होते. “मंगरूळपीर तालुक्याला पण डॉक्टर होते. गावात डॉक्टर नव्हते. मग आम्ही मानोऱ्याहून दोघं डॉक्टर 7-7 दिवस तिथं जायचो. असं साधारण महिना दीड महिना आम्ही केलं. डॉक्टर 2002 मध्ये तिथं रुजू झाले होते. ते सांगतात, तिथं साधा बल्ब लावायचा तरी आमच्याकडे पैसे नसायचे. आता बऱ्याच सोयी झाल्या आहेत. 2005 मध्ये एनआरएचएम आलं आणि त्याची आम्हाला खूपच मदत झाली. दवाखान्यात लागणाऱे सामान आणि सोयीसुविधेसाठी आम्हाला हक्काचे पैसे मिळू लागले. मानोऱ्याहून वाशिम 60 तर अकोला 90 किमीवर होतं. त्यामुळे ही दोन्ही ठिकाणं आमच्यासाठी सोयीची नव्हती. आमचा एखादा पेशंट तिथं पाठवायचा तर ते सहज शक्य नव्हतं. यवतमाळही 90 किमी तर पुसद 60 किमी. एकदा एक पेशंट आला, तो बेशुद्ध होता. कारली म्हणून गाव होतं मानोऱ्यापासून साधारण 10 किमीवर. तिथून ते त्याला घेऊन आले होते. दोन दिवस ताप येऊन ते बेशुद्ध झाला होता. मग गावातले लोक त्याला घेऊन आले होते पण, त्यांना त्याला परत न्यायचं होतं. कारण आता बेशुद्ध आहे तर काही व्हायचं नाही आणि तो जाईलच असं त्यांना वाटत होतं. त्यांनी पेशंटला आणलं होतं तेव्हा मी म्हणालो, तुम्हाला तो जगणार नाही असंच वाटतंय ना? मी प्रयत्न तरी करून बघतो. असं म्हणत डॉक्टरांनी तपासण्या करून घेतल्या. तर सेलेब्रल मलेरियाचं निदान झालं. त्याला आयसीयुचे उपचार लागले असते. ते आम्ही बाहेरच सुरू केले. आणि सांगायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी तो पेशंट उठून बसला. आजही तो जिवंत आहे. तेव्हापासून ते मानोरा गावच माझ्याकडे यायला लागलं. काहीही सल्ला हवा असेल, ऑपरेशन असेल तरी आधी ते लोक मला भेटायला लागले. आणि मानोरा माझं दुसरं घरंच झालं. सात वर्ष ग्रामीण रुग्णालय आणि नंतर सात वर्ष पोहरादेवीला अशी चौदा वर्ष मी त्या भागात राहिलो होतो.”
डॉक्टर सांगतात, “पगारासाठी मी काम केलंच नाही कधी. मला सेवेची संधी मिळतेय असाच विचार सतत मनात असायचा. त्यामुळेच आजही तिथल्या लोकांचे मला फोन येतात. माझी आठवण काढली जाते. त्यांना आरोग्यविषयक योग्य गोष्टी सांगणे हे मी सतत करायचो.” यामुळेच असेल कदाचित पण तिथं असताना त्यांना काही सामाजिक प्रश्नही कळायचे. लोकच ते त्यांच्यापर्यंत घेऊन यायचे. एक उदाहरण ते सांगतात, एक मुलीसाठी स्थळं बघणं सुरू होतं. जे स्थळ आलं होतं त्या मुलाने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मग अशा ठिकाणी मुलगी द्यायची का नाही असा प्रश्न होता. मग हा प्रश्नही डॉक्टरांकडेच आला. ते म्हणतात, “तिथं आजारावर उपचार करणारे डॉक्टर जसे आम्ही होतो तसेच त्यांच्यासाठी कधी सायकॉलॉजिस्ट असायचो तर कधी मानसिक आधार देणारे हितचिंतकही असायचो. वरचा प्रश्न त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मुलीच्या पालकांना सांगितलं, की दोन प्रश्न तुम्ही त्या होणाऱ्या जावयाला विचारा- की सुसाईडचा प्रयत्न का केला आणि परत तुम्ही असं करणार नाही याची काय गॅरंटी? या दोन प्रश्नांची समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळाली तर मुलगी द्या. मग ते म्हणाले की मुलगीही तेच म्हणते आहे. आणि ती काही या लग्नासाठी खुश नाही. मग डॉक्टर म्हणाले की मुलीची इच्छा नाही तर मग प्रश्नच नाही. त्याऐवजी एखादा गरीब पण निर्व्यसनी मुलगा बघा” असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं.
डॉक्टर शेवटी म्हणतात, “कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं योग्य इन्फ्रास्ट्रक्चर हवं. कोविडच्या काळात मी पोहरादेवी, मानोऱ्याला नव्हतो. पण तिथून मला अक्षरशः 25-30 फोन आले की डॉक्टर तुम्ही आत्ता इथं हवे होतात. कारण तिथल्या लोकांना तिथं काहीच मदत मिळाली नाही आणि थेट तिथून 30-40 किमीवर असलेल्या कारंजा किंवा मंगरूळपीरला दाखल व्हावं लागलं. मी खरंतर वेगळं काहीच केलं नव्हतं. प्रशासनाने ठरवून दिलेलं कामच मी करत होतो पण ते प्रामाणिकपणे आणि तोच प्रामाणिकपणा लोकांना भावला.” त्यामुळेच ड़ॉ. देशमुखांची बदली होऊनही पोहरादेवीचे लोक आणि जुने पेशंट आजही डॉक्टरांची आठवण काढतात, त्यांचा हक्काने फोनवरून सल्ला घेतात.
लेखन: वर्षा जोशी- आठवले, संपादक, नवी उमेद, पुणे

Leave a Reply