दोघं एकमेकांची दखल घेऊ लागले…
“मैं अंजू नहीं मंजू हूं” म्हणत श्रीदेवी बलमा शक्ती कपूरच्या पेकाटात एक लाथ घालते. हा प्रसंग आहे, श्रीदेवीच्या चालबाझ पिक्चरमधला. अंजू आणि मंजू ह्या जुळ्या बहिणी, अर्थात आयडेंटिकल ट्विन्स. त्यांचं लहानपणी एकमेकांपासून बिछडणं, त्यांचं जुळं असणं, त्यांना आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना माहित नसणं, जुळ्यांतलं एकाचं वागणं एकदम नम्र, आज्ञाधारक असणं तर दुसऱ्याचं एकदम आक्रमक असणं. नम्र असणाऱ्या एकाचं सिनेमाच्या पहिल्या भागात लोकांकडून थपडा खाणं तर दुसऱ्या भागात दोघांची अदलाबदल होऊन गोंधळ होणं आणि पिक्चरच्या शेवटी उलगडा होऊन जुळ्यांनी एकत्र येणं. सीता और गीता, राम और शाम, जुडवा कुठल्याही जुळ्यांवर आधारित पिक्चरचा एकच फॉर्म्युला. कारण ह्या पिक्चर्सची जी “गोंधळ” थीम आहे ती अशा आयडेंटिकल ट्विन्स शिवाय शक्य नाही. पण जुळे हा प्रकार आयडेंटिकलवर थांबत नाही ना!
हिंदी पिक्चरची प्रचंड फॅन असलेल्या मी, जुळयांच्या पिक्चरमधली गंमत पाहून लहानपणी (मनात) जाहीर करून टाकलं होतं की मला जुडवा होणार. कायनात ने मेरी सुनली, लेकिन partially. ऑगस्ट 2020 ला कळलं की माझ्या पोटात जुळी आहेत आणि 19 एप्रिल 2021 ला ऑस्कर-इंदिरा ह्या nonidentical जुळ्यांचा जन्म झाला. ते दोघे एकमेकांसारखे अजिबात नाहीत आणि दिसतही नाहीत. इंदिरा प्रचंड स्वतंत्र वृत्तीची आहे, तर ऑस्कर “माझी सेवा करा” आहे, इंदिरा प्रचंड धडपडी आहे तर ऑस्कर सुशेगात असतो. तिला तिची इच्छा नसताना आंजारलेलं, गोंजारलेलं आवडत नाही तर ऑस्कर सगळ्यांचा टेडी बेयर आहे. अश्या अनेक गोष्टींत दोघे वेगळेच नाहीत तर परस्परविरोधी आहेत. जुळे म्हणून एकाच वेळी, एकाच ठिकाणी 9 महिन्यांचा मुक्काम वगळता त्यांच्यात काहीच साम्य नाही. त्यामुळे ज्या “जुळ्यांच्या थीम” मुळे मला जुळी हवी होती, त्या थीमचा ‘थ’ देखील इथं नाही. आणि जुळ्यांना वाढवण्यासाठी जी कसरत लागते ती मात्र आहेच. दोघांच्या सगळ्या बाबतीत दोन तऱ्हा असल्या तरी काही बाबतीत दोघं एक होतात आणि माझ्या नाकी नऊ आणतात. रडणे आणि भूक लागणे. एक रडायला लागला की दुसरीही भोकाड पसरते. ह्याचा कॉन्व्हर्स चालत नाही, एक शांत झाली की दुसरा रडायचं थांबेलच असं नाही. एकाला भूक लागली की त्याच्याकडे वाटीत काहीतरी घेऊन पोहोचायचा अवकाश, दुसरी दत्त म्हणून उभी राहते.
तरी आता बरंच बरं आहे. पण ब्रेस्टफीडिंग करताना खूप धांदल उडायची. मला कधी टॅन्डम फिडिंग म्हणजेच एकाचवेळी दोघांना पाजणे ही क्रिया जमली नाही. त्यामुळे एकाचं पिऊन झालं की मगच दुसरीला पाजवायला घेता यायचं. बाळांना पाजवणे ही क्रिया बाळांसाठी पोटभरी असेल पण आईसाठी मनभरी असते. अंगावर पिणारं बाळ, पिण्याच्या प्रक्रियेच्या सुरुवातीला अगदी अधाश्यासारखं पितं. जसजसं पोट भरतं तसतसा पिण्याचा वेग, आवेग मंदावतो. मग हळूहळू इकडे तिकडे बघणे, पुन्हा पिणे, आईच्या हातावर, छातीवर हलक्या हातांनी थपडा देणे (जणू काय दूध आवडलं म्हणून तिला शाबासकी देणे) हे सगळं प्रचंड लोभस असतं. हे जितका वेळ चालतं तितका वेळ आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं गोड आणि भलमोठठं स्माईल असतं. माझ्या पहिल्या बाळाच्या वेळीस हे सगळं अनुभवलं होतं. पण ऑस्कर, इंदिराला पाजवताना हा अनुभव फारसा आला नाही. उलट ताणच होता. कारण इंदिराला पाजवताना सगळं लक्ष ऑस्करच्या भुकेल्या रडण्याकडे असायचं. कधी तिचं पिऊन होतंय आणि मी त्याला घेतेय असं होऊन जायचं. एकाच खोलीत दोघे असताना त्याला पाजवताना, तिचं रडणं थांबावं म्हणून कधी हातातल्या बांगड्या, पायातलं पैंजण नाचवून तिला शांत करायचा प्रयत्न केलाय. पण तरीही दोघांना ब्रेस्टफीडिंग करू शकले ह्याचं समाधान आहेच.
आता दोघे १६ महिन्यांचे झालेत. अजूनही एकमेकांबरोबर खेळत नाहीत (त्याला वेळ लागतोच म्हणा) पण एकमेकांची दखलही घेत नाहीत असं वाटतं. इंदिरा कधी कधी ऑस्करच्या अंगावर धप्पकन बसते (ते ती आमच्याबरोबरही करते), त्याच्या हातातला, अर्धवट तोंडात गेलेला खाऊ काढून पळवते, मी त्याला मांडीवर घेतलं की येऊन त्याला हाताने ढकलते. ऑस्कर तिच्या वाटेला जात नाही पण अगदीच झालं की तिच्या हाताला, पायाला जे मिळेल त्याला धरून कडकडून चावतो. दोघे कधी एकमेकांबरोबर खेळणार, कधी त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार, आम्ही प्रतीक्षेत आहोत. तीन आठवड्यांपासून ऑस्कर इंदिरा डेकेयरला जायला लागलेत. आणि ह्या आठवड्यात घरचे आम्ही सगळेच आळीपाळीने आजारी पडलो. इंदिरा नेमकी वीकएंडला आजारी होती, तेव्हा डेकेयर बंद असतं. सोमवार, मंगळवारी ऑस्कर आजारी होता. त्यामुळे इंदिराला एकटीलाच डेकेयरमध्ये सोडलं. दोन दिवस ती सारखं “उचलून घे उचलून घे” करत होती असं तिच्या टिचरने सांगितलं. म्हटलं तिला आदले दिवस बरं नसल्यामुळे झालं असेल. बुधवारी ऑस्कर, इंदिरा दोघांना डेकेयरमध्ये सोडलं. दोघांना घरी परत नेण्याच्या वेळी इंदिरा “आज छान खेळत होती, “घे घे” अजिबात करत नव्हती” असा फीडबॅक मिळाला. आज ऑस्करही होता ना, टिचरने शेवटी हसत पिल्लू सोडलं. “दोघे एकमेकांची दखल घेतात तर”, ह्या विचाराने गार वाटलं.
जुळयांपाठी प्रचंड ऊर्जा खर्च होते. पण गंमत म्हणजे खर्च करण्यासाठी लागणारी
ऊर्जाही त्यांच्याचकडून मिळते. आणि त्यांच्यापाठी पुरुनही उरते.
– तेजल राऊत, हॅनोव्हर, जर्मनी

Leave a Reply