तिच्या आयुष्याची डबल बेल (भाग चार)

….चार कानाखाली दिल्या, बस पोलीस स्टेशनला नेली – विधी पवार

अलिबागहून प्रवासी घेऊन मुंबईकडे येत होते. सायंकाळची वेळ. बस गच्च भरलेली. शेवटच्या बाकड्यावर खिडकीपाशी एक तरुणी बसली होती. बाकड्यावर बाकी सगळे पुरुष होते. गर्दी असल्याने मी तिकीट बुकिंग करण्यात मग्न. त्या तरूणी शेजारी बसलेला एक पुरुष तिला त्रास देऊ लागला. अंगचटीला येऊ लागला. अंगाला स्पर्श करू लागला. ही गरीब, भित्री. त्याच्या ते लक्षात आल्याने तो त्याचा फायदा घेत तिला आणखी त्रास देऊ लागला. नको नको ते बोलू लागला. बिचारी असहाय. थोड्यावेळाने कशीबशी तिथून उठली आणि माझ्याजवळ आली आणि झालेला प्रकार सांगितला. तिचे पती सायनला दवाखान्यात उपचार घेत होते आणि ही त्यांचा डबा घेऊन चालली होती. हा सारा प्रकार पाहून माझा संताप झाला. मी तिला घेऊन मागच्या सीटकडे गेले. त्याची गचांडी पकडली आणि दोन चार कानशिलात लगावून दिल्या. ते पाहून बाकीचे प्रवासी ‘काय झालं?’ म्हणून चौकशी करू लागले. ‘हा माणूस या महिलेला त्रास देत आहे आणि ती त्याला ओळखत पण नाही.’ हे सांगताच त्यातल्या दोन तीन जणांनीही याला चोप दिला. मग गाडी जवळच्या पोलीस स्टेशनला घेतली. भीतीने तरुणीने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. तिथल्या पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. महिला पोलीसही मदतीला आल्या. पोलिसी खाक्या पाहिल्यावर मग तो माणूस चूक कबूल करू लागला, गयावया करू लागला. या साऱ्यात रात्रीचे ८ वाजले. उशीर होत असल्याने प्रवाशी बस पुढे नेण्यासाठी आग्रह करू लागले. तिथल्या पोलिसांना मी लवकर तक्रार दाखल करून घेण्याबद्दल विनंती केली. त्यावर त्यांनी काळजी करू नका असं म्हणत दिलासा दिला. ‘यांची जबान घावी लागेल, थोडा वेळ लागेल, तुम्ही बस घेऊन पुढे जा, आम्ही यांना दुसऱ्या बसने पाठवू’ असं सांगितलं. महिला पोलीसांनीही निश्चिंत व्हा असं सांगितल्याने मी बस घेऊन मार्गस्थ झाले. तिथून निघताना आम्ही दोघींनी एकमेकींचे मोबाईल नंबर घेतले. रीतसर तक्रार दाखल होऊन मग ती तरुणी दुसऱ्या बसमधून रात्री उशिरा दवाखान्यात सुखरूप पोहोचली. तुमच्यामुळे आज निभावलं, फार घाबरून गेले होते असं म्हणत ती आभार मानू लागली. तू माझ्या लहान बहिणी सारखी आहेस, काहीही वाटलं तर फोन कर असे सांगत मी तिला दिलासा दिला. हा अनुभव कथन केला आहे मुंबईच्या विधी पवार या महिला वाहकाने.

विधी मुंबई सेन्ट्रल आगारात गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईहून अलिबाग, सातारा, पुणे, महाड, त्रंबकेश्वर अशा निरनिराळ्या मार्गांवर विधीने ड्युटी केली आहे. आजही तिचे काम तितक्याच धडाडीने चालू आहे. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या विधीला खरंतर पोलिस व्हायचं होतं पण त्याच दरम्यान एसटीची जाहिरात बघितल्याने तिने तिकडे अर्ज केला. सुदैवाने लेखी, मौखिक परीक्षेत ती उत्तीर्ण झाली आणि प्रशिक्षण घेण्यास गेली. प्रशिक्षणासाठी त्या ५ जणी होत्या. त्यावेळी तिकिटाचे मशीन नवीनच आले होते. त्यामुळे त्यावर तिकीट कसे काढायचे, दर कसे आकारायचे अशा सर्व लहान सहान गोष्टी त्यांना समजावून सांगण्यात आल्या. त्यानंतर नेमणूक पत्र मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. पहिलीच ड्युटी मुंबई ते अलिबाग अशी होती. विधीला बस लागण्याचा त्रास त्यामुळे कसे होणार या धास्तीने तिच्या पोटात गोळा आला होता. ती सांगते, मी बसच्या पायऱ्यांच्या पाया पडले. पहिला दिवस आहे, मला काही त्रास नको होऊ दे म्हणून देवाला प्रार्थना केली. कारण मला त्रास झाला तर प्रवासी काय म्हणतील, तिकीट कसे काढणार असे सारे प्रश्न होते. सुदैवाने ती फेरी उत्तम पार पडली. त्या दिवशी नाही आणि पुढेही कधी तिला बसचा त्रास झाला नाही. आज १३ वर्ष झाली. खूप शिकायला मिळाले. नवनवीन कडू गोड अनुभव आले. प्रवास चालूच आहे. तो कायम सुखरूप व्हावा अशी प्रार्थना ती करते. विधीचं माहेर अंधेरी तर सासर दादरच. विधीचे वडील रिक्षाचालक, आई गृहिणी, एक लहान भाऊ, सासरे, पती खाजगी कंपनीत कार्यरत. आपली मुलगी, सून चांगलं काम करते म्हणून या साऱ्यांना तिचा अभिमान वाटतो. घरी सुखरूप पोहोचल्याचा फोन येत नाही तोवर आईची काळजी मात्र थांबत नाही अशी तक्रार करतानाच दुसरीकडे आपल्याबद्दल आई इतरांना ‘माझी मुलगी धाडसी आहे, प्रसंग आला तर दोन लगावून देईन’ असे सांगते हे ही अभिमानाने सांगते.

अपघात, भर रस्त्यात बस बंद पडणे, प्रवाशांचा त्रास या गोष्टी विधीनेही अनेकदा अनुभवल्या. कधीतरी दारुडे प्रवासी बसमध्ये चढतात, गोंधळ घालतात. विधी शक्यतो शांततेने ही परिस्थिती हाताळते. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा मात्र ती गाडी सरळ पोलीस स्टेशनला घेते. एवढ्या वर्षाच्या अनुभवात २ ते ३ फेऱ्यांमध्ये अशी वेळ आल्याचे विधी सांगते. सातारा, पुणे, अलिबाग या मार्गावर रात्री अपरात्री बस बंद पडण्याच्या घटनाही तिने अनुभवल्या. मात्र गाडी दुरुस्त होण्याची परिस्थिती नसेल तर वरिष्ठांना सांगून दुसऱ्या बसने निघून येता येत असल्याने तिने मुंबई गाठली आहे. अशा प्रसंगी महिला वाहक आणि सोबत असणारी कॅश या दोन गोष्टी लक्षात घेऊन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ नियोजन करतात. अपघाताच्या अनुभवाबाबत ती म्हणते, एकदा अलिबागहून येत असताना आमच्या बस ड्रायव्हरची चुकी नसताना अपघात झाला. टेम्पोवाल्याने धक्का दिला होता. रात्रीची वेळ. आमचा बस ड्रायव्हर टेम्पोचा पाठलाग करत धावत गेला. टेम्पो चालकाला त्याच्या केबिनमध्ये घुसून पकडून ठेवले. तोपर्यंत पोलीसही आले होते. आमचा ड्रायव्हर टेम्पोवाल्यामागे गेला असलायचे सांगून मी पोलिसांना सावध केले. ते तत्काळ दुचाकीवर गेले. टेम्पोवाल्यापर्यंत पोहोचले आणि दोघांनाही घेऊन आले. आजूबाजूला अंधार असल्याने काहीही होऊ शकले असते. चूक नसताना बस ड्रायव्हरला मारहाण पण झाली असती. पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल झाली. मग मी दुसऱ्या गाडीने मुंबईला आले. त्यावेळी रात्रीचा १ वाजला होता. इतक्या रात्री ट्रेन बंद झाल्याने घरी जाणे शक्य नव्हते. म्हणून आमच्या डेपोच्या रेस्टरूम मध्येच रात्रभर थांबले. सकाळी पुन्हा अलिबाग ड्युटी घेऊन, ती संपवून सायंकाळी घरी गेले. असेही दिवस येतात अधूनमधून असे विधीने सहजतेने सांगितले तरी त्यातील गांभीर्य लक्षात आल्याशिवाय रहात नाही. असे प्रसंग अचानक येतात. बरेचदा महिला वाहकांकडे जास्तीचे कपडे, अंथरायला, पांघरायला असे काही नसते. पण बस आमची लक्ष्मी असल्याने ओढणीचे पांघरूण, हाताची उशी करून आम्ही वेळ मारून नेतो असे अनेक महिला वाहक सहजतेने सांगतात.

  • भाग्यश्री मुळे, नाशिक.  

Leave a Reply