खडकाळ जमिनीने वाढवलं ड्रॅगनफ्रुट
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी. इथले शिक्षक असलेले शेतकरी विश्वनाथ शेकडे यांचे सहा एकर शेती आहे. जमीन अगदी खडकाळ. त्यातून पाणी टंचाईचं संकट तर नेहमीचंच. कधी पाण्याचा सुकाळ तर कधी एकदम दुष्काळ. त्यामुळे शेतीत नेहमीच परवडेल अशी स्थिती नसते. त्यामुळे शेतीत वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग केले तरच शेती उत्पादन भरवशाचे ठरते. विश्वनाथ शेकडे यांना खडकाळ, हलक्या स्वरूपाच्या जमिनीमुळे कोणतं पीक घ्यावं हा प्रश्न नेहमीच पडायचा.
शेकडे हे एका खाजगी शाळेत शिक्षक आहेत. शिक्षकी पेशामुळे वाचन होतं होतंच. असंच एकदा काही वाचत असताना सरांना ड्रॅगनफ्रुट बदल माहिती समजली. उत्सुकता चाळवली गेली आणि त्यांनी अधिक माहिती घ्यायला सुरूवात केली. विविध ठिकाणच्या ड्रॅगन फ्रुट बागांना भेटी दिल्या. सगळं बघून ड्रॅगनफ्रुटचा अभ्यास करून त्यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये पावणे दोन एकरात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. दोन वर्षांपासून त्यांना त्यातून उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली. ड्रॅगन फ्रुट विविध आजारावर उपयुक्त असल्यने त्याला मागणी असते. साधारण जुलै ते नोव्हेंबर हा या फळांचा हंगाम असतो. कमी देखभालीचं आणि कमी पाण्यात येणारं हे फळ असल्याने त्याला मनुष्यबळही तसं कमी लागतं. त्यामुळेच या फळाची लागवडीसाठी निवड केल्याचं त्यांनी सांगितलं. तोडणी झालेली फळे नगर, नाशिक येथील व्यापाऱ्यांना विकली जातात. बाजाराच्या मागणीनुसार भाव मिळतो. आतापर्यंत एकरी तीन साडे लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळालं असल्याचं सर सांगतात.
– राजेश राऊत, बीड

Leave a Reply