सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातलं तांबवे गाव. इथले अतुल आणि अमोल पाटील बंधू. दोघेही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर. अतुल पुण्यातल्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये प्रॉडक्शन विभागात तर अमोल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक.
अमोल यांचं कॉलेज ४० किलोमीटर लांब. लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणी, पेट्रोलचे वाढते भाव… लांब कॉलेजला जाणे परवडत नव्हते. काय करता येईल उपाय शोधत असतानाच स्वतः ई सायकल करण्याची कल्पना सुचली. ई सायकल कशी तयार करतात, त्याचा अभ्यास दोन्ही भावांनी सुरू केला. गुगल, यूट्युबचा वापर केला. त्यासाठी लागणारे साहित्य जमा केले. सायकल तयार करण्यासाठी जवळपास दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागला. त्यानंतर सातारच्या रस्त्यांवर दोन महिने चाचणी.
या ई सायकलीला पॅडल, एक्सलेटर, १५ अँफिअरची पोर्टेबल बॅटरी बसवण्यात आली आहे. चार्जिंग संपल्यानंतर पॅडल मारूनही सायकल चालवता येते. यासोबतच पॅडल आणि मोटारीचा एकाच वेळी वापर करून सायकलचा वेग वाढवू शकतो. ही सायकल एकदा चार्ज केली की शंभर किलोमीटर अंतर सहज कापू शकते, असं अतुल आणि अमोल सांगतात. सायकलच्या हँडलवर डिस्प्ले बसवण्यात आला आहे. त्यामुळे सायकलचा स्पीड आणि चार्जिंग किती शिल्लक आहे हे समजतं. पाटील बंधूंनी सायकलला ‘ऊर्जा’ नाव दिलं आहे.
सायकलला मागणी येत असल्यानं गेल्याच महिन्यापासून तिचं उत्पादन सुरू केलं आहे. सायकलचा ताशी वेग २५ किलोमीटर. बॅटरी चार्ज करण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी. यासाठी केवळ पाच रुपयांचा खर्च येतो. ५ रुपयात १०० किमी पर्यंत सायकल धावू शकते असे अतुल पाटील यांनी सांगितले.
– विनोद चव्हाण
Related