एक धागा सुखाचा…

माजलगाव येथील शुभांगी आणि गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील प्रदीप पाठक यांचं 2000 साली लग्न झालं. प्रदीप यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय. त्यामुळे कुटुंब बीडमध्ये स्थिरावलं. दोन वर्षांनी मुलीचा जन्म झाला आणि शुभांगी, प्रदीप सुखावले. आता प्रदीप यांना घराच्या बांधकामाचे वेध लागले. 2002 साली त्यांनी बॅंकेतून कर्ज घेतलं. घराचं काम सुरू झालं. लग्नानंतरची पाच वर्ष छान गेली. आणि एक दिवस प्रदीप यांना ब्रेनट्युमर असल्याचं निदान झालं. दवाखान्याची चक्रं सुरू झाली. पण प्रदीप यांची तब्येत सुधारण्याची लक्षणं दिसेनात. ऑपरेशनच्या अगोदरच ते कोमात गेले. काही दिवस हॉस्पीटलमध्ये घालवल्यानंतर शुभांगीताई त्यांना घरी घेऊन आल्या. प्रदीप कोमात, मुलगी लहान हा काळ शुभांगीताईंची परीक्षा बघणारा ठरला. तब्बल दोन वर्षांनी प्रदीप कोमातून बाहेर आले. आता बरे होतील असं वाटत असतानाच 31 डिसेंबर 2008 ला प्रदीप यांचं निधन झालं. पतीने बघितलेलं घराचं स्वप्न त्यांच्या जाण्यानंतर पूर्ण झालं. घरं मिळालं. शुभांगी मुलीला घेऊन सहा महिने नव्या घरात राहिल्याही. पण, पतीच्या आजारपणाच्या तीन वर्षांच्या काळात कर्जाचं व्याज वाढत गेलं. ही रक्कम वेळेत भरणं काही शक्य झालं नाही. शेवटी बॅंकेकडून नोटीस आली आणि 2009 साली घराचा लिलाव झाला. बॅंकेचं देणं दिलं गेलं आणि उर्वरीत रक्कम शुभांगी, तिच्या सासूबाई आणि मुलगी प्राजक्ता अशी तीन हिश्श्यात वाटली गेली. या मिळालेल्या पैशांत पुढच्या एक वर्षाचा खर्च शुभांगी यांनी भागवला.
तेव्हा त्यांची मुलगी दुसरीत शिकत होती. पतीच्या हिश्शाची चार एकर सुध्दा शेती सासरकडून त्यांना मिळाली नाही. घरही दिराने स्वत:च्या नावावर करून घेतलं. अशा परिस्थितीत प्राजक्ताचं शिक्षण, पालन पोषण कसं करावं, कसं जगावं असा प्रश्न उभा राहिला. मुलीला शिकवण्यासाठी आता आपणच राहायचं हे शुभांगी यांनी ठरवलं. शुभांगी यांच्या आई भामाबाई भगवानराव देशमुख यांनी लेकीला मदत करायचं ठरवलं. त्यांनी शुभांगी यांनी शिलाई मशीन दिली. त्यांनी एक महिना शिवणक्लास लावला. सर्व प्रशिक्षण घेत ड्रेस, ब्लाऊज, फॉलपिको अशी शिलाईची कामं त्या करू लागल्या. या शिलाईकामातूनच त्यांचा संसार चालू लागला.


घर चालू लागलं आणि प्राजक्ताचं शिक्षणही. प्राजक्तानेही दहावीनंतर लातूरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तीन वर्ष तंत्रनिकेतनचे शिक्षण घेत ९० टक्के गुण मिळवले. याच गुणावर पुण्याच्या जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनीयरींग हडपसरमध्ये तिला इंजिनियरींगसाठी प्रवेश मिळाला. त्याच सुमारास कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये २०२०-२१ मध्ये मुलीच्या कॉलेजची पहिल्या वर्षीची ६५ हजार रूपयांची फी कशी भरायची असा प्रश्न उभा राहिला. हे शुभांगी यांच्या मैत्रिणींना कळलं. त्यांच्या सरस्वती ब्रम्हतेज या व्हॉटसअॅप ग्रुपमधील प्रत्येकीने पाच हजार रूपये या प्रमाणे ६५ हजार गोळा करून त्यांना दिले. पहिल्या वर्षीची फी जमली तरी दुसऱ्या वर्षीसाठी मात्र शुभांगी यांनी शिलाई मशीनवर रात्रंदिवस काम करत ६५ हजार रूपये जमवले. आता शेवटच्या वर्षात मुलीची फी कशी भरणार हा प्रश्न आईला सतावत आहे. पतीच्या मृत्यूनंतर खचून न जाता शुंभागी यांनी जिद्दीने संसार सावरला. मुलगी इंजिनियर व्हावी हे स्वप्न उराशी बाळगलं आहे. शुभांगी यांनी आजवर दु:खंच अनुभवलं आहे. आता मुलगी इंजिनियर होणार असल्याने हा एक सुखाचा धागा त्या अनुभवणार आहेत.

  • दिनेश लिंबेकर, बीड

Leave a Reply