स्टील आणि सिमेंटचा वापर अगदी कमी पण तरीही मजबूत, पक्कं घर बांधता येतं. असं तुम्हांला सांगितलं तर कसं काय शक्य आहे असा प्रश्न पडेल ना. तर हे खरंच शक्य आहे आणि आपल्या आजूबाजूच्या उपलब्ध सामानाचा वापर करून असं घर बांधता येतं. काय आहे ही पद्धती समजून घेऊयात.

आपल्याकडं पूर्वापार चालत आलेल्या बांधकामपद्धतीचा अभ्यास करून तिचा आधुनिक जीवनशैलीसोबत मेळ घालून ‘लो कॉस्ट’ घरं बांधता येतात. साधारण स्थानिक वातावरण आणि पंचक्रोशीत उपलब्ध असणारं साहित्य हा या बांधकामपद्धतीचा पाया आहे. साहजिकच स्थानिक कौशल्य आणि मजुरांना कामही मिळतं. बांधकाम साहित्य स्थानिक नसलं की ते बाहेरून आणावं लागतं. यात पैसे जास्त खर्च होतात. वातावरणाचा विचार करून स्थानिक सामान वापरल्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे स्थानिक पर्यावरण जपणं हाही असतोच. ही घरं बांधताना नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा आणि खेळती हवा यांचा घरातला वावर यालाही महत्व दिलं जातं. स्थानिक पातळीवर विटा, दगड किंवा माती जे काही मुबलक उपलब्ध आहे, त्याचा समावेश या बांधकामात होतो. साधं उदाहरण म्हणजे कोकणातल्या जुन्या घरांमध्ये चिऱ्याचा वापर, मराठवाड्यात धाब्याची घरं. हल्ली जगभरात बांधकामांना ‘ग्रीन सर्टिफिकेट’ देऊन लोकांना भुलवण्याचे प्रकार केले जातात. त्या त्या देशातली ‘ग्रीन मानक संस्था’ काचा आणि इतर बांधकाम साहित्याला ग्रीन सर्टिफिकेट देते. मजेशीर बाब म्हणजे असा ग्रीन सर्टिफिकेटवाला एअर कंडिशनरही मिळतो. या ‘ग्रीन सर्टिफाईड साहित्या’चा वापर करून बनवलेल्या बांधकामांना ‘ग्रीन’चा दर्जा मिळतो. पण भारतासारख्या उष्ण हवामानाच्या देशात संपूर्ण काचेची असणारी उंच इमारत ‘ग्रीन’ कशी असू शकते हे मजेशीरच आहे.
नागपूरमधली शाश्वत वस्तू कोकणात शाश्वत असू शकत नाही. त्यामुळंच पारंपरिक बांधकाम पद्धत आणि आधुनिक जीवनशैलीचा मेळ असणाऱ्या या पद्धतीत गावागावातल्या बांधकामसाहित्यात आणि तंत्रज्ञानात फरक दिसून येतो. पण वातावरणाला अनुसरून नियोजन ही बाब मात्र सामायिक असते. एखाद्या उष्ण प्रदेशात घर डिझाईन करताना उष्णतेपासून संरक्षण या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. याकरता छोट्या खिडक्या ठेवाव्यात. जेणेकरून ऊन थेट आत येऊन आतल्या भिंती तापणार नाहीत. त्याच्या पुढं व्हरांडे किंवा थोडं अंतर ठेवून दोन भिंती (कॅविटी वॉल) बांधून उष्णतेला आत येण्यापासून रोखता येईल. ते घर तापतंय म्हणून ग्रीन सर्टिफिकेटच्या गोष्टी वापरून, एअरकंडिशनर वापरून त्याला थंड नाही करता येत. उजेड आणि खेळती हवा या गोष्टींचा विचार करून बांधकाम डिझाईन केलं जातं. यामुळं कृत्रिम लाईटचा वापर कमीत कमी करावा लागतो. खेळत्या हवेमुळं पंख्याचा वापर कमी होतो. परिणामी वीजेचं बील कमी येतं. आर्थिक बाबींचा विचार करता या गोष्टी फायद्याच्या ठरणाऱ्या आहेत. आपल्या इथल्या जुन्या बांधकामपद्धती स्थानिक वातावरणाला अनुसरूनच आहेत. एखाद्या भागात या पद्धतीनं घर बांधण्यापूर्वी, स्थानिक जुन्या घरांचा थोडा बारकाईनं अभ्यास करावा. भिंती कशा बांधल्यात, काय साहित्य आहे, घराची अंतर्गत रचना कशी आहे हे पाहावं.
भारतात लॉरी बेकर यांनी ही पद्धत सुरू केली. महात्मा गांधींनी देशबांधवांना परवडतील अशी सहजसोपी आणि मजबूत घर बांधण्याबद्दल लॉरी बेकर यांना विचारलं. बेकर यांनी हे आव्हानं स्वीकारून त्यावर अभ्यास सुरू केला. केरळला आपली कर्मभूमी बनवून त्यांनी तिथं या पद्धतीनं अनेक घरं आणि आस्थापनांच्या इमारती उभारल्या. पुण्यातल्या राहुल रावत यांनी 1993-94 मध्ये अण्णा हजारे यांची संस्था आणि हडकोच्या कामापासून महाराष्ट्रात या पद्धतीनं बांधकाम करायला सुरूवात केली. ही घरं दिसायलाही सुंदर आणि राहायलाही अतिशय आरामदायी, सोयीस्कर असतात. पुढच्या भागात अशाच घरात राहणाऱ्या व्यक्तीचा अनुभव जाणून घेऊयात.
– साधना तिप्पनाकजे
Related