आमचं पर्यावरणस्नेही घर
शुभांगी जोशी, पंढरपूर
आमच्या घराचं बांधकाम 2006 मध्ये सुरू असताना अनेक जण आश्चर्य व्यक्त करत होते. काही जण म्हणायचे हे टिकणार नाही. अगदी बांधकाम कंत्राटदारसुद्धा साशंक होते. कारण आमचं अख्खं घर विटांवर उभं आहे. घरात फक्त एकाच ठिकाणी लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात आला आहे. घराच्या छताला कुठंही सपाट स्लॅब नाही, तर विटांचे घुमट आहेत. घराच्या भिंतींना आतल्या बाजूनं प्लास्टर केलं आहे, पण बाहेर कुठंही प्लास्टर केलं नाही. आता सर्व मित्र आणि पाहुणे मंडळी आमच्या घराचं कौतुक करतात. पण सुरवातीला हे सर्व गोंधळात पडलेले. मी मूळची कोकणातली असल्यामुळं, मला खरंतर चिऱ्याचं घर बांधायचं होतं. चिऱ्याला दमट हवामान लागतं. पण आमच्या पंढरपूरच्या 45 अंश तापमानात चिऱ्याचा भूगा झाला असता. त्यामुळे मग तो हट्ट सोडून दिला.
आमच्या जवळपासच्या भागात दोन-तीन जुनी घरं पडली होती. त्यांच्या मोठमोठ्या शिळा अशाच पडून होत्या. त्या शिळांचा वापर आम्ही पायामध्ये केला. इथल्या स्थानिक काळ्या मातीच्या विटांचा वापर बांधकामात केला. बांधकामात नेहमीसारखं एकावर एक विट रचली नाही. तर दोन विटा उभ्या आणि एक विट आडवी अशा पद्धतीनं विटा रचल्या. यामुळं हवेची पोकळी निर्माण होवून बाहेरच्या तापमानापेक्षा घराच्या आतलं तापमान 3-4 अंश कमी असतं. बाहेर भाजणारं ऊन असलं तरी आमच्या घराच्या आत छान गारवा असतो. दारं आणि खिडक्यांसाठी चौकट बसवली नाही. जुन्या पद्धतीनुसार दोन खिळ्यांवर दारं बसवली आहेत. घराच्या मध्यभागी मोकळा चौक आहे. चौकावर छत नसल्यामुळं पाऊस, थंडी आणि चांदण्याचा आम्ही छान आनंद घरातूनच घेऊ शकतो. या चौकाच्या जमिनीला चारही बाजूनी उतार दिला आहे. इथं पडणार पावसाचं पाणी थेट बोअरवेलला जातं. चौकाच्या चारही बाजूनं पडवी किंवा ओसरी आहे. पडवीला कोबा ठेवला आहे. हवं तिथं मांडी घालून आरामात बसून काहीही करा. या पडवीच्या सभोवताली हॉल आणि इतर खोल्या आहेत. या पडवींमुळंही उष्णता भिंतीवर थेट आदळत नाहीत. याचा फायदाही मोकळा वारा फिरण्यात आणि तापमान कमी होण्यात होतो. मधला चौक तर आमच्या घराचा प्राण आहे एवढ्या गोष्टी आम्ही इथं करत असतो. संपूर्ण घराला घुमटाकर छत आहेत. बांधकामाच्यावेळी सर्वात आधी हॉल, बेडरुम, स्वयंपाकघराच्या भिंती बांधल्या. मग या खोल्यांच्या भिंतींच्या मापानं फर्मा बनवून विटांचे घुमट खालीच बनवले. हे विटांचे तयार घुमट भिंतींवर चढवले. घुमटाच्या केंद्रस्थानी असणारा दगड यात महत्वाचा आहे. त्याच्यावर घुमटाचा तोल अवलंबून आहे. हे घुमट चांगले मजबूत आहेत. बांधकाम मजूर आणि कंत्राटदाराला या घुमटांची खात्री नव्हती. त्यावर 9-10 जण उभं राहिल्यावर घुमटांची मजबूती बघून, तेही आश्चर्यचकीत झाले. लोडबेअरिंगच्या तंत्रावर हे घर उभारलं आहे. घराच्या प्रवेशदारातल्या घुमटाला लहान झरोके आहेत. यामुळं घरात छान प्रकाश येतो. मोकळा वारा आणि भरपूर प्रकाशामुळं वीजबील कमी येतं. पावसाच्या पाण्याची साठवणूक करत असल्यामुळं पाण्याची गरजही भागवली जाते. घराच्या सभोवतालच्या बागेत घरातलं सांडपाणी फिरवलं आहे.
हे सर्व वाचल्यावर असं वाटू शकेल की हे सर्व खूप खर्चिक आहे. पण आरसीसी पद्धतीच्या बांधकामापेक्षा आम्हांला खूप कमी बांधकाम खर्च आला. कारण लोखंडी सळ्या (स्टिल), वाळू, सिमेंट यांचा अगदी कमी उपयोग केला. आरसीसी पद्धतीत या सर्व बांधकाम साहित्यावरच जास्त खर्च होतो. फक्त कामगार आणि कंत्राटदारांना हे सर्व समजून सांगण्यात आमचा बऱ्यापैकी वेळ गेला. आमच्या भागातलं अशा प्रकारचं हे पहिलंच बांधकाम असल्यानं ही अडचण आली.
हे सर्व करताना वेळ लागला, पण आम्ही जिद्द सोडली नाही. आणि त्याचा खूप सुंदर अनुभव आता आम्ही उपभोगत आहोत.
Sadhana Thippanakaje

Leave a Reply