आता परदेशी उपद्रवी वनस्पतींना करू ‘चले जाव’
पुण्यातून किंवा हल्ली कुठल्याही शहरातून बाहेर पडताना किंवा आजूबाजूच्या माळरानावर केशरी, पिवळ्या रंगाची मोहक फुलं आपलं लक्ष वेधून घेतात. पुण्यातील वेताळ टेकडी, तळजाई आणि पाषाण टेकडीवर तसंच आजूबाजूच्या माळरानावर तर ही फुलं मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. ही मोहक, आकर्षक फुलं सगळ्यांनाच संमोहित करतात आणि खास या फुलांचा, फुलांसोबत आपला फोटो काढून घ्यायलाही अनेकजण थांबतात. ही फुलं आहेत कॉसमॉसची. ऑरेंज, यलो आणि सल्फर अशा रंगात ही फुलं दिसतात. ही सूर्यफुलाच्या कुळातली वनस्पती मूळची मेक्सिकोची. कॉसमॉसचा वाढीचा वेग अधिक आहे. शिवाय त्याला नैसर्गिक अन्न साखळीत कोणताही शत्रू नाही. त्यामुळे त्याच्या पानावर, फुलावर कोणत्याही प्रकारचा रोग न आल्याने कॉसमॉस बेसुमार वाढताना दिसतो. कमी पाण्यात, निकृष्ट जमिनीत कॉसमॉस वाढतो, बीजप्रसार थोड्या कालावधीत सर्वदूर होतो. त्यामुळे कॉसमॉसचे मोठे पट्टे तयार होतात. काही काही कॉसमॉसची उंची १० फुटापर्यंत वाढते. त्यामुळे इतर वनस्पतीत जागेसाठी, प्रकाशासाठी, अन्नासाठी कॉसमॉस स्पर्धा करतं. त्यामुळे त्या त्या भागातील स्थानिक वनस्पतींना वाढण्यास वाव मिळत नाही. अर्थातच यामुळे त्या भागाचे पर्यावरणीय स्वास्थ धोक्यात येते.
फोटो काढताना, फुलांचं कौतुक करताना ही फुलं कुठली, आपल्या पर्यावरणासाठी ती उपयुक्त आहेत का याचा विचार बहुधा कुणाच्याच मनात येत नसावा. पुण्यातल्या पर्यावरणप्रेमींच्या एका गटाने मात्र या फुलांचे दुष्परिणाम ओळखले. वनस्पती अभ्यासक डॉ.सचिन पुणेकर सांगत होते, “की निरिक्षणातून लक्षात आलं की भारतीय मधमाश्या तसेच परागीभवन करणारे इतर कीटक कॉसमॉसकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे निसर्गात इतर वाढणाऱ्या वनस्पतीचे परागीभवन कमी प्रमाणात होऊन त्यांची संख्या लक्षणीय कमी होऊ शकते. शहरातील ही परिस्थिती असतानाच अनेक हौशी पर्यटक, इतर पाळीव जनावरे यांच्यामुळे तसेच गाडीच्या टायरला लागून कॉसमॉस बिया गावाकडे व दुर्गम भागात जात आहेत. काही हौशी गिर्यारोहक त्याचे सिड बॉल करून कॉसमॉसचां प्रसार करत आहेत. शेताच्या बांधावर व गड किल्ल्यांवर देखील त्याची संख्या वाढताना दिसते. जनावरे अशी वनस्पती खाऊन आजारी पडण्याची शक्यता आहे. तृणभक्षी प्राण्यांना अशा अति वाढणाऱ्या वनस्पतीमुळे निसर्गतः अन्न मिळाले नाही तर ते शेतात येऊन शेतीचे नुकसान करतात. त्यामुळे एकूण दुग्ध व्यवसाय व शेतीवर आधारित शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू शकते. कॉसमॉसचा एकूण विचार करता त्याचे आर्थिक, सामजिक तसेच पर्यावरणीय असे भीषण परिणाम आहेत.”
पुण्यातल्या निसर्गप्रेमी मंडळींना असा अभ्यास केला. आणि अनेक सेवाभावी संस्था, निसर्गप्रेमी, पुणे महानगर पालिका पर्यावरण मंडळ यांनी एकत्र येऊन २१ ऑक्टोबरला ‘मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि)’ ही चळवळ सुरू केली. २०१६ पासूनच ही निसर्गप्रेमी मंडळी कॉसमॉस सारखंच प्रचंड प्रमाणात वाढणारं इतर तण, गाजर गवताचे देखील उच्चाटनाचे उपक्रम राबवत आहेत. त्या वनस्पतीचा फैलाव रोखण्यासाठी ती उगवलेली दिसताच तिथंच उपटून टाकणं हाच योग्य पर्याय आहे. तळजाई टेकडीवर एकूण ७० पर्यावरण प्रेमींनी तीन ट्रक एवढ्या कॉसमॉसचं उच्चाटन केलं. कॉसमॉसचं बी परिपक्व होण्याअगोदर हे काम होणं गरजेचं असल्याचं डॉ. सचिन पुणेकर सांगतात. उपसून काढलेले कॉसमॉस टेकडीवर असलेल्या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आले आहे. हा उपक्रम फक्त एकदाच करून चालणार नाही तर प्रत्येक वेळी थोड्या थोड्या गटांनी येऊन कॉसमॉसचे उच्चाटन करणं गरजेचं आहे.
‘कॉसमॉस म्हणजे पर्यावरणाला आलेला पीतज्वर आहे’, ‘हटवा तण वाचवा वन, हटवा तण वाढवा वन, हटवा तण वाढवा कृषीधन’, ‘तणमुक्त भारत स्वच्छ भारत’, ‘स्थानिक देशी वनस्पतींना वाव, उपद्रवी परदेशी वनस्पतींना चले जाव’ अशी घोषवाक्य देत ही चळवळ सुरू झाली आहे.
आपल्या गावात, टेकडीवर, गडांवर कुठेही कॉसमॉस वाढल्याचे दिसल्यास वेळीच गाव सहभागाने त्याचे उच्चाटन करणे गरजेचं आहे असं डॉ सचिन पुणेकर सांगतात. नागरिकांना, गावकऱ्यांना ही फुलं मोहक वाटतात. त्यामुळे त्याबद्दल पर्यावरणीय साक्षरता निर्माण करणं गरजेचं असल्याचं ते सांगतात. अनेक वर्षापासून ठाण मांडून असलेली ही वनस्पती हा एकच धोका नसून भारतीय जैवविविधतेला, शेती, पर्यावरणाला नजीकच्या काळात त्यामुळे मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळे कॉसमॉस सोबत फोटो काढताना आपण ह्या सगळ्या बाबींचा विचार नक्कीच करायला हवा.
– संतोष बोबडे, पुणे

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading