गणपतीची शाडूची मूर्ती आणता का…
शाडू माती पर्यावरणपूरक नसल्यानं त्यावर पर्याय म्हणून  गेल्या वर्षीपासून पुण्यातल्या ‘इको एक्झिस्ट’ संस्थेनं  शाडू  ‘ मातीच्या पुनरावर्तन ! ‘ करण्याची योजना आखली. मनीषा गुटमन यांनी वर्ष २००६ मध्ये  संस्थेची स्थापना केली.  तेव्हापासूनच निसर्गपूरक गणेशमूर्ती घडवण्याची  संकल्पना  डोक्यात होती.  तेव्हा लाल मातीच्या  मूर्ती घडवल्या. पण दिवसेंदिवस शाडूचा वाढता वापर पाहून गेल्या वर्षी त्यांनी प्रयोग केला. विसर्जन केलेल्या मूर्तीची शाडू माती लोकांना सुकवून ठेवायला सांगितली. नंतर माती फोडून बारीक करून ती चाळून घेतली. त्याच मातीची यावर्षी सुबक मूर्ती घडवली. यावर्षी  ‘मातीच्या पुनरावर्तन ! ‘ उपक्रमांतर्गत त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे.  “शाडूच्या माती मूर्तीचं घरीच विसर्जन करा, माती वाळवून ती संस्थेला पाठवा, पुढच्या वर्षीसाठी  सुंदर मूर्ती तयार होऊ शकतील.”
पृथ्वीवर माणूस एकटा राहत नसून लाखो प्रजातींपैकी  माणूस ही  एक प्रजाती आहे. एका प्रजातीला जगण्यासाठी दुसऱ्या प्रजातीवर अवलंबून राहण्याची गरज असतेच. याच सहजीवनातून पृथ्वीवर असंख्य प्रजाती नांदत आहेत. परंतु हे सहजीवन नुसते सहजीवन नसून पर्यावरणीय सहजीवन आहे. म्हणूनच संस्थेचं नाव इको एक्झिस्ट (पर्यावरणीय सहजीवन) ठेवलं.
 पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती आणि  त्यासाठी काम करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला त्याचा योग्य मोबदला हा यामागचा उद्देश.  निसर्गात पूर्णपणे विघटन होणारी, त्यामुळे  कोणत्याही नैसर्गिक घटकाला  अपाय न होणारी.
 मनीषा यांनी कल्पवृक्ष पर्यावरण अँक्शन ग्रुपसोबत काम केलं आहे. कल्पवृक्षच्या  सुनिता राव आणि मनीषा यांनी मिळून नैसर्गिक होळी रंग हे पहिलं  उत्पादन तयार केलं.  इको एक्झिस्ट संस्थेचा होळीच्या रंगाचा फॉर्म्युला अवलंबत वनस्त्री संस्थेतील महिलांनी रंग तयार केले.  त्याला  चांगला प्रतिसाद मिळाला. २००७ मध्ये  ललिता गुप्ता यांनी संस्थेसोबत  कोणत्याही अपेक्षेशिवाय सहा वर्ष काम करण्याचं  ठरवलं. २०१३ मध्ये मनीषा, ललिता गुप्ता, नताली लिक यांनी मिळून इको एक्झिस्ट इंटरप्राईजची सुरुवात केली. संस्थेनं तयार केलेल्या  उत्पादनांना बाजार मिळवून देण्यासाठी. मग  २०१७ मध्ये इको  एक्झिस्ट  फाउंडेशनची सुरुवात. पूर्णपणे सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेली संस्था.
मनीषा सांगतात,”कोणत्याही उत्पादनांना जर योग्य हमीभाव मिळाला नाही तर ती  बंद पडतात.  त्यावर अवलंबून व्यक्तींचा रोजगार बंद होतो. निसर्गपूरक गणेशमूर्ती , मूर्तीसाठी कापसाच्या माळा, शाल, तोरण, जुने  कपडे, पडदे, बेडशीट वापरून कापडी पिशव्या, शेणाचे दिवे अशी विविध उत्पादनं. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना यासाठी  प्रशिक्षण दिलं जातं.  आपली जीवनशैली निसर्गपूरक करण्यासाठी संस्था  व्याख्यानमाला, वृक्षारोपण , सेंद्रिय शेती, प्राणी संगोपन असे विविध उपक्रम राबवते.  निसर्गाप्रती जागरूकता निर्माण होऊन, निसर्गाचे संवर्धन, संरक्षण व्हावं हे  संस्थेचं  ध्येय आहे.
‘मातीच्या पुनरावर्तन!’  उपक्रमाला  अनेक भागातून  प्रतिसाद मिळत आहे.   त्या त्या जिल्ह्यातील मूर्ती स्थानिक पातळीवर पुनरावर्तन करण्याची संस्थेची योजना सुरू आहे.
– संतोष बोबडे

Leave a Reply