पोलिसांच्या शिट्टीला मिळाला मास्क

गीता गणपत धनवडे अकरा वर्षांची सहावीत शिकणारी मुलगी. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या उळेवाडी गावची रहिवासी. सध्या ती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, पुणे या शाळेत शिकते आहे. याच गीताने तयार केलेल्या एका आगळ्या शिट्टीची ही गोष्ट. आळंदीत राहणाऱ्या तिच्या पोलीस काकांना कोरोना झाला होता. ते बरे झाले आणि गीता त्यांना भेटायला गेली. त्यावेळी काकांच्या ड्रेसला लावलेल्या शिट्टीशी गीताची बहीण खेळत होती. तिला कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीने काकांनी तिला शिट्टी वाजवण्यास मनाई केली. शिट्टीमुळे कोरोनाचा संसर्ग कसा होतो? यावर गीता विचार करू लागली आणि त्यासंबंधी आपल्याला काही करता येईल का?असा विचार तिच्या मनात घोळू लागला.

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी माणसाला जशी मास्कची गरज आहे तसं सुरक्षा कवच या शिट्टीला तयार करण्यासाठी ती प्रयत्न करू लागली. यावर पोलीस व्हिसल विथ सेफ्टी एन्क्लोजर प्रोटेक्शन फ्रॉम कोव्हिड व्हायरस असा प्रकल्प तिने तयार केला. (Police whistle with safety enclosure protection from COVID 19 Virus) या प्रकल्पासाठी तिला शाळेतील शिक्षिका मंजिरी पाटील, रसिका लिमये यांनी मार्गदर्शन केलं. याच प्रोजेक्टची विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असून हे विज्ञान प्रदर्शन मार्च महिन्यात होणार आहे. एक स्टील डबी, हूक, शिट्टी आणि शिट्टी बांधायची दोरी एवढंच तिचं साहित्य. डबीच्या झाकणाला तिने एक भोक पाडलं. यात शिट्टीचा समोरचा भाग घट्ट बसवला. नंतर व्हायरस प्रोटेक्शन बॉक्सला म्हणजेच डबीला तिने पोलिसांच्या शर्टला अडकवली जाणारी दोरी बांधून टाकली. आणि तयार झाली व्हायरस प्रोटेक्शन व्हिसल. आता पोलिसांना शिट्टी वाजवायची तर शिट्टीचं केवळ हूक पकडावं लागेल. पूर्ण शिट्टी हाताळावी लागणार नाही आणि शिट्टीला कसलाही हात लागायची शक्यताही नाही.

गीताने केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला हा प्रोजेक्ट ऑनलाईन सादर केला. या प्रयोगाची दखल घेऊन केंद्र सरकारने इन्स्पायर्ड अँवार्डअंतर्गत विज्ञान प्रदर्शनासाठी तिच्या प्रकल्पाची निवड झाली आहे. तसंच तिच्या या प्रोजेक्टसाठी शासनाकडून दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देखील तिच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. ही जमा झालेली शिष्यवृत्ती या संशोधनावर खर्च करणार असल्याचं तिच्या वडलांनी सांगितलं. तिच्या या अनोख्या संशोधनाबद्दल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तिचे कौतुक केलं आहे

– अमोल वाघमारे, दक्षिण सोलापूर, सोलापूर

Leave a Reply