गीता सावळे. नाशिकच्या खोखो प्रशिक्षक. त्यांनी मुलींसाठी खास संरक्षक पोशाख तयार केला आहे, खोखो खेळात मुलींसाठी अशाप्रकारे विचार आणि कृती करणाऱ्या देशातील त्या पहिल्याच प्रशिक्षक. खेळताना भान राहत नाही. जिंकायची इर्षा इतकी असते की छोट्यामोठ्या दुखल्याखुपल्याचे त्यावेळी काही वाटत नाही. पण काही वर्षांनी याचे गंभीर दुखापतीपासून ते वंध्यत्वापर्यंत मोठे परिणाम होऊ शकतात.
‘’खेळताना मुलगामुलगी वेगळा विचार नसतो. ‘’ गीताताई सांगत होत्या. ‘’मुलींच्या खेळात वेग, आक्रमकता वाढत आहे. ओटीपोटीला, छातीला इजा झाली तरी खेळताना त्याकडे दुर्लक्ष होतेच. खेळ संपल्यावर, दुखापतीची जाणीव होते. शिवाय महिला प्रशिक्षक असेल तर मुली दुखापतीबाबत बोलतात तरी पण पुरुष प्रशिक्षक असेल तर त्या लाजत, घाबरत वेदना, लपवतात. अंगावर काढतात. काही काळाने याचे परिणाम जाणवू लागतात.’’
मुलींचे संरक्षण करू शकेल, अशा पोषाखाची कल्पना सुचल्यावर त्या सर्वप्रथम स्त्रीरोग तज्ञ डॉ. अभय सुखात्मे यांना भेटल्या. त्यांनाही पोशाखाची आवश्यकता समजली. कसे करावे, त्यात काय असावे याची प्राथमिक चर्चा झाल्यावर गीताताईंनी, उमेश आठवले, कैलास ठाकरे, मंदार देशमुख आणि साई स्पोर्टचे अनंत जोशी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यात आणखी काही गोष्टींचा विचार झाला. त्यातून वजनाला हलके, वापरायला सोयीस्कर असा पोशाख तयार झाला. यात समोरच्या भागात फोमचा वापर केला आहे. यामुळे इजा होण्याचे प्रमाण कमी होते. सुरुवातीला एक पोशाख बनवायला ८०० रुपये खर्च आला. जास्त प्रमाणात केल्यावर तो खर्च ६५० पर्यंत गेला. त्याचा निर्मितीखर्च अजून कमी कसा करता येईल याचा विचार आणि काम सध्या चालू आहे.
पोशाख तयार झाल्यावर मागील वर्षी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खोखोच्या स्पर्धांमध्ये ते महिला खेळाडूंना मोफत घालायला देण्यात आले. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद आला. सूचनाही आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही हे कीट दाखवण्यात आले. त्यांना ते खूप आवडले. पवार चॅरिटेबल टेबल ट्रस्टतर्फे मदतीचे वचनही दिले.
गीताताईंचे खेळावर आणि खेळाडूंवर मनापासून प्रेम आहे. आदिवासी खेळाडू मुलींना दत्तक घेणे, त्यांची काळजी घेणे, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणे, त्यांना आवडते. खेळाबरोबर खेळाडूंनाही जपले पाहिजे,असे त्यांना वाटते.
-भाग्यश्री मुळे, नाशिक
Related