घाटावरचं कोकण

पाच माणसांनी घेर करून जरी मिठी मारली तरी मावणार नाही एवढा खोडाचा घेर असणारी वडाची तसेच कडुलिंब,बाभूळ, बहावा, काटेसावराची झाडे रस्त्याच्या दुतर्फा होती. गावात दोन पदरी रस्ता झाला आणि सगळी झाडे तोडण्यात आली. पाचवडपासून 8 किमी आणि सातारा शहरापासून 20 किमीवरचं हे आमचं बिभवी गाव. महाबळेश्वर- सातारा रोडला लागूनच गावाची हद्द सुरू होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव घनदाट जंगलांनी वेढलेले होते. अजूनही रात्री फार उशिरा रस्त्यावर गेल्यास बिबट्या दिसण्याच्या वार्ता अनेक गावकऱ्यांकडून ऐकायला येतात. शिवाजी महाराजांनी ज्या घनदाट जावळीच्या जंगलांचा वापर करून शाहिस्तेखानाचा पराभव केला त्याच जावळी तालुक्यातील हे गाव. यावरून आपल्याला तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अंदाज आला असेल. महाबळेश्वर, पाचगणी सारख्या धो धो पडणाऱ्या पावसाच्या क्षेत्रातच गाव येतं. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर दोन महिने गावात पावसाचा धुमाकूळ असतो. हिवाळ्यात थंडी अंगातून निघत नाही. उन्हाळ्यात ऊन अंगाला स्पर्श करत नाही. अशा नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या गावातील लोक स्वतःला कोकणीच संबोधतात. त्यामुळे पर्यटकांचा ओढा आलाच. पाऊस जास्त असल्याने गावात भात हे प्रमुख पीक. मोठी साळ असणारा दोडकी, रक्तवाढीसाठी काळी साळ, सुगंधासाठी आंबेमोहोर, पेजेसाठी चिमनसाल अशी असंख्य भाताची वाणं पूर्वी होत असतं. हरितक्रांती आली आणि सगळी वाणं नामशेष होत गेली. सध्या कावेरी, इंद्रायणी अशा संकरित आणि विकल्या जाणाऱ्या जाती घेतल्या जातात. हिवाळ्यात दगडी ज्वारी, भुईमूग, खपली गहू, काळा घेवडा, विविध प्रकारचे कडधान्य अशी विविध पीक घेतली जात होती. अजूनही काही शेतकरी घेतात मात्र संख्या कमी झाली आहे. शेती कुणी करत नाही. शेतकऱ्याला मुलाने शेती करावे असे वाटत नाही. त्यामुळे शेतात कष्ट करणारी शेवटची वृद्ध पिढी सगळीकडे दिसून येते. साधारण 2010 दरम्यान गावात विविध सरकारी प्रकल्प येऊ लागले. त्यात स्ट्रॉबेरी उगवणे, बुकेमध्ये वापरली जाणारी फुले उगवणे, गांडूळ खत, ऊस लागवड यावर सबसिडी मिळाल्याने पारंपरिक शेती मागे पडली. सुरुवातीला जमीन कसदार असल्याने उत्पादन मिळत गेले मात्र आता जमिनी ओसाड पडत आहे. सेंद्रिय निविष्ठा जागी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. अशा उत्पादनातून आलेले अन्न खाल्याने आरोग्यावर परिणाम झाले. गावात प्रत्येक घरात मधुमेह, रक्तदाब असणारी व्यक्ती सापडतेच.

गावाच्या बाजूला असणारी वेण्णा नदीवर धरण उभे राहिले. त्यामुळे बागायती शेतीस सुरुवात झाली. जमिनीला जास्त पाणी दिल्याने जमिनी क्षारपट झाल्या. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या. जमिनी नसल्याने व वाढत्या शहरीकरणामुळे तरुण वर्ग शहरात वसू लागला. गाव ओसाड पडू लागले. राहणीमान बदलले. स्पर्धा सुरू झाली. ज्या गावात 10 वर्षापूर्वी फक्त हातावर मोजता येतील इतक्या गाड्या होत्या त्याचं गावात यावर्षी यात्रेला चार चाकी गाड्यांसाठी वेगळी पार्किंग व्यवस्था करावी लागली. हवाबंद पदार्थ, सार्वजनिक उत्सव यात वापरले जाणारे प्लास्टिक गावच्या आवारात थान मांडून बसले आहे. नदीत कृत्रिम रित्या मस्त्यपालन सुरू झाले. चिलापी जातीचा माश्याला प्रचंड मागणी व खात्रीशीर उत्पादन यामुळे तोच मासा नदीत तगू लागला. हा मासा इतर माशांना आपले भक्ष्य बनवतो. परिणामी नदीची जैवविविधता नष्ट होऊन नदी जवळजवळ मृत बनली आहे. गावातील लोकांसाठी हा विकास आहे. मात्र मागील पाच वर्षाचा विचार करता गावाचे तापमान लक्षणीय वाढले आहे.

गावाची हद्द संपताच डोंगर सुरू होतो. बिभवी गावातीलच नव्हे तर संपूर्ण भागात पावसाळा झाला की सुकलेले गवत जाळले जाते. ससा, साळिंदर अशा प्राण्यांची शिकार करताना त्यांना लपायला जागा मिळू नये म्हणून ही व्यवस्था. पावसाळा संपला की गावच्या चारी बाजूने डोंगर जळताना व गावात धुराचा वास येताना नेहमीच दृश्य. पूर्वी संपूर्ण गावाला विहिरीचे स्वच्छ पाणी मिळत असे. मात्र वृक्षतोड, चुकीची शेती पद्धती अशा असंख्य कारणांमुळे पाण्याची पत बदलली आहे. याच वर्षी गावात पाणी शुद्ध करण्याचे खाजगी यंत्र बसवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीला पाणीपट्टी सोबतच शुद्ध पाणी मिळण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. हा विकास का? ज्या गावात दोन पदरी रस्त्याची गरज आहे अशा गावात रस्ता रुंदीकरण करून दीडशे वर्ष जुनी झाडे कापण्यात आली, कोणतेही नियम न वापरता गाडी चालवण्याची पद्धत व मोठा रस्ता यामुळे 10 किमी पट्ट्यात एका महिन्यात 25 वर्षाखालील 3 तरुणांचा जीव गेला. त्यामुळे कोणत्याही लहान मुलाला खाली सोडायला पालक धजत नाहीत. गावातील शेतजमीन दुकान आलिशान बंगले, हॉटेल,दारूची दुकाने,पेट्रोल पंपासाठी वापरली जात आहे. काँक्रीटचे जंगल तापमान वाढण्यास अजून मदत करते. जमिनीचे प्लॉट पाडून गावात गुंठामंत्री तयार होत आहेत. आधीच शेती होत नाही त्यात ही गत. हे सगळं घडत असलं तरी चांगले बदल करू पाहणारी मंडळी असतातच. त्यामुळेच गावातील काही मंडळी शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न करत आहेत. गावतील तरुण अक्षय वाघने गावात सेंद्रिय शेती व देशी तांदूळ वाण यावर लक्षणीय काम केले. त्यामुळे गावातील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळून देशी बियाणे लागवड करत आहेत. गावातील थोरांनी मिळून गावच्या एसटी स्थानकाजवळ असलेला पिपर्णीचा वृक्ष रुंदीकरणात कापून दिला नाही. गावातील मोठी लोकसंख्या अजूनही शेती सोडण्यास तयार नाही. गड्या आपला गावच बरा असं म्हणणारी तरुण पिढी रसवंती गृह, पशुपालन, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती अशा शाश्वत मार्गांची कास धरून विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे.

  • संतोष बोबडे, सातारा

Leave a Reply