शाळा सुटली, पाटी कायमची फुटली…
परीक्षांचा हंगाम सुरु आहे. मुलांमध्ये लगबग सुरु आहे. कोणते प्रश्न येणार? पेपर कसा जाणार? काही मुले शेवटच्या टप्प्यात उजळणीवर भर देताहेत. परंतु, बीड तालुक्यातील कुर्ला येथील प्रेरणा झिटे, मांजरसुंबा परिसरातील सुदर्शन तंजपवार ही दोन शाळकरी बालकं कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांवर ऊसतोडणीत गुंतली आहेत.
‘मला शिकायचे आहे, पण सद्या आमच्या कुटुंबावर कर्ज आहे. माई, आबा दोघे राब-राब राबताहेत. गावी कुणी नाही. मग मीही आलो कारखान्यावर. दोन पैसे मिळतात, घरच्यांना मदत होतेयं. हे वर्ष गेलं आता पुढच्या वर्षी बघू जमतयं का शाळेत जायला!’ सुदर्शन सांगत होता. प्रेरणाचीही अशीचं कथा. ‘मला शाळेत जायला आवडतं. शिकून सवरून मोठं व्हावसं वाटतं. आमचे बाबा कारखान्यावर ट्रॅक्टर घेऊन जातात. आई, भावंडं आहेत. गावी जवळचं कुणीच नाई. मग कुणाकडे थांबू. त्यांना काळजी वाटते. त्यामुळे यंदा शाळा सुटली.’ असे ती सांगते.
सुदर्शन आणि प्रेरणा ही दोन प्रातिनिधिकं उदाहरणं. बीड जिल्ह्यातील विविध भागातून शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा पध्दतीने गोड उसाच्या शिक्षण हिरावणाऱ्या कडू चक्रात भरडली गेलीतं. राज्यात ऊसतोड मजूरांची सर्वाधिक संख्या असणारा जिल्हा असल्याने या मालिकेत प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील माहितीचा आपण आढावा घेतोयं. राज्य शासनाने ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून कामगारांनी नोंदणी तर सुरु केली आहे. परंतु, प्रशासन कामगारांपर्यंत पोहोचण्यात कमी पडल्याने संपूर्ण राज्यभरातून केवळ दीड लाख कामगारांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. एकट्या बीड जिल्ह्यातूनच साडेपाच ते सात लाखांदरम्यान कामगारांचे स्थलांतर होते. राज्यातील साखर कारखान्यांनी १५ ऑक्टोबर २०२२ रोजी यंदाचा गाळप हंगाम सुरु केलेलां. गाळप सुरु होऊन शंभर दिवस लोटले असून बीड येथील जिल्हा शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ८ हजार विद्यार्थी पालकांसोबत स्थलांतरित झालेले आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलास दर्जेदार शिक्षण देणे शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक आहे. राज्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांचे सातत्याने स्थलांतर सुरू असते. असे विद्यार्थी राज्यातील कोणत्याही भागात गेले तरी त्यांना तेथील शाळेत प्रवेश मिळावा व शिक्षण पुढे सुरू राहावे, यासाठी शासनाने अशा विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड दिले जाते. सन २०१५ मध्ये शिक्षण सचिव नंदकुमार, वंदना कृष्णा, आयुक्त विशाल सोळंकी यांनी शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी करण्यासाठी याबाबतचा निर्णय जारी केला होता. दरम्यान, शिक्षण हमी कार्डात स्थलांतरित विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती व मूळ गावातील मुख्याध्यापकांचे संपर्क क्रमांक या कार्डवर असतात. जेव्हा ही मुले पालकांसोबत स्थलांतरित होऊन मुले कारखान्यावर तसेच इतर रोजगार स्थळी जातील तेव्हा त्यांना त्या भागातील शाळेत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हमी कार्डची सुविधा आहे. परंतु, बीड जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या केवळ साडेचार हजार विद्यार्थ्यांनाच शिक्षण हमी कार्डाची उपलब्धता होऊ शकली. शिक्षण हमी कार्ड मिळाले म्हणजेच ही सर्वच्या सर्व मुले शाळेत गेली असेही होत नाही. कारण अनेक कारखान्यांच्या परिसरात कमी अंतरावर शाळा उपलब्ध नाहीत. जास्त अंतर असल्याने पालक कारखान्यांवरही मुलांना पाठवण्यास धजावत नाहीत. प्रेरणा झिटे हिच्याबाबतीत हेच झाले. तिचे पालक कोल्हापूर जिल्ह्यातील एका कारखान्यावर वास्तव्यास आहेत. मुलीला गावाकडे कुणापाशी ठेवणे शक्य नसल्याने नाईलाजाने पालकांनी तिला सोबत नेले. पालक दिवसभर ट्रॅक्टर घेऊन ऊसाची वाहतूक करण्यात व्यस्त असतात. यादरम्यान प्रेरणा पालावर राहते. ती राहत असलेल्या पालापासून शाळा दोन किमी अंतराहून अधिक दूर आहे. त्यात कारखाना परिसरात मोठी वर्दळ. परिणामी ईच्छा असून तिथल्या शाळेतही जाणे तिच्यासाठी दुष्कर बनले. इयत्ता नववीतील या हुशार मुलीवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली. कोल्हापूर येथील अवनी संस्थेने जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांच्या परिसरात विशेष सर्वेक्षण केले. यामध्ये शून्य ते १८ वयोगटातील बीड जिल्ह्यातील १ हजार ९०५ विद्यार्थी याठिकाणी आढळून आले. यातील ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ११ कारखान्यांवर जर दोन हजार विद्यार्थी असतील तर राज्यासह राज्याबाहेरील कारखान्यांवर स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किमी मोठी असू शकते? याचा अंदाज न वर्तवलेला बरा…
शिक्षण विभाग जरी ८ हजार मुले स्थलांतरित झाल्याचे सांगत असले तरी वास्तविक संख्या आणखी मोठी असणार आहे. सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे सांगतात, ‘देशात शिक्षण हक्क कायदा लागू आहे. पालकांचे स्थलांतर झाले तरी मुलांचे शिक्षण सुरळीत राहावे, ही प्रशासनाची, समाजाची जबाबदारी आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील लहानग्यांच्या स्थलांतराकडे पाहता अतिशय चिंताजनक चित्र दिसून येते. पूर्वी साखर शाळा होत्या. मात्र, आता त्याही दिसत नाहीत. कारखाना परिसरात शाळा, स्वच्छतागृह, पोषण आहार वितरण अशा सुविधा अत्यंत आवश्यक आहेत. त्या मिळणार नसतील तर उद्याच्या पिढीला आपण कुठे नेतो आहोत? असा प्रश्न पडतो.’
वसतिगृह नव्हे केवळ भोजनालय…
रोजगारासाठी होणारे कामगारांचे स्थलांतर हे आर्थिक, सामाजिक स्थित्यंतरे आणणारे असते शिवाय या कामगारांच्या पाल्यांसमोर नवी संकटं, नवी आव्हानं आणणारेही. कामगारांच्या स्थलांतरामुळे बहुतांश वेळा मुलांचे शिक्षण सुटते. नव्या शहरात, कामाच्या ठिकाणी सुविधा नसल्याने घरी ठेवण्यापेक्षा अनेकदा कामगारांकडून मुलांना कळत नकळत बालमजुरीच्या खाईत लोटले जाते. यातून एका नव्या कामगार पिढीची निर्मितीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होते.
यंदाच्या ऊस गाळप हंगामात राज्यात २०४ कारखाने कार्यान्वित राहिले. या कारखान्यांवर ऊसतोडणीसाठी राज्यातील ५२ तालुक्यांतून १५ लाखांवर ऊसतोडणी कामगार असल्याचे जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेचे नेते बबन माने सांगतात. अनेक कामगार हे शेजारील राज्यांतही ऊसतोडणीसाठी जातात. कोविडनंतर रोजगार गेल्याने ऊसतोड कामगार संख्येत काहीशी वाढ झाल्याचे निरीक्षण माने यांनी नोंदवले आहे. या कामगारांचे पाच लाखांवर पाल्य आहेत. मात्र, या पाल्यांच्या सुविधांसाठी शासनस्तरावर पुरेसे प्रयत्न होत नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे. इतर कामगार नेत्यांकडूनही वारंवार हा मुद्दा मांडला जातो. त्यात तथ्थ्यही जाणवते.
स्थलांतरित ऊसतोड कामगारांसह वीटभट्टी, बांधकाम कामगारांच्या मुलांच्या निवासाची गावातच व्यवस्था व्हावी, त्यांचे

शिक्षण अखंडित राहावे, यासाठी शासनाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृह योजना अस्तित्त्वात आणली. या योजनेतून मुलांच्या निवास, भोजनाची व्यवस्था होत असल्याने मोठ्या प्रमाणात मुलांचे स्थलांतर रोखण्यास शासनास यश मिळाल्याचे चित्र दिसले. परंतु, उत्तर काळात अनुदान विलंब, किचकट नियम, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या कारणांनी वसतिगृह सुरु करण्यास त्या त्या ठिकाणच्या संस्थांकडून निरूत्साह पाहायला मिळतोय.
बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत २३७ हंगामी वसतिगृह सुरु आहेत. वास्तविक याला ‘वसतिगृह’ म्हणणे तसे चुकीचे ठरेल कारण मुलांच्या निवासाची व्यवस्थाच याठिकाणी नाही. जिल्ह्यातील २३ हजार १४६ विद्यार्थ्यांची या हंगामी वसतिगृहांच्या माध्यमातून केवळ दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. जी मुले या सेवेचा लाभ घेतात, त्यांच्या घरी एकतर कोणीतरी ज्येष्ठ आहे किंवा नातेवाईकांकडे त्यांच्या राहण्याची सोय आहे. जर ही सोय नसती तर ही मुलेदेखील कारखान्यावर दिसली असती. डोंगरकिन्ही (जि.बीड) परिसरातील एका वस्तीवरील शिल्पा तिच्या आत्याकडे राहते. पालक ऊसतोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यावर गेलेले आहेत. शिल्पा भारजे सांगते, ‘सध्या वसतिगृहाच्या माध्यमातून दोनवेळा जेवण मिळतंय. आत्याचं घर गावात आहे, म्हणूनच पालकांनी मला इथं ठेवलं. नाहीतर मीही कारखान्यावर जाणार होते. माझ्या गावातील एक मैत्रीण घरी कुणी नसल्याने आई, वडीलांसह कारखान्यावर गेलेल्या आहेत.’
बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी पाचशेंहून अधिक हंगामी वसतिगृहे सुरु असत. याठिकाणी निवासाचीही व्यवस्था केली जायची. परंतु, नंतर बोगस विद्यार्थी संख्या दाखवत अनुदान लाटण्याचे प्रकार घडल्यानंतर शासन नियम अधिक कडक बनत गेले. शिवाय अनेकदा अनुदान वितरणासही विलंब व्हायचा. त्यामुळे ही वसतिगृहे सुरु करण्याचा ओघ आटला. त्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फटका विद्यार्थ्यांना बसला. सन २०१६ मध्ये ७४६ हंगामी वसतिगृहांतून बीड जिल्ह्यात ४३ हजार १९२ विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. यंदा मात्र एकाही ठिकाणी निवासी वसतिगृह सुरु नाही. व्यक्तिगत स्तरावर अनेक संस्था या बालकांच्या सुरक्षिततेमुळे वसतिगृह सुरु करण्यास धजावत नसल्याचे चित्र गेल्या काही वर्षात जाणवते आहे. अशा स्थितीत शासनानेच पुढाकार घेऊन वसतिगृहाची उभारणी करण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव सांगतात. सन २०२१ मध्ये तत्कालीन सरकारने राज्यातील ४१ तालुक्यात ८२ वसतिगृहे उभारण्याचे जाहीर केलं होतं. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत ही वसतिगृहे उभारली जाणार होती. त्यांचं काय झालं? जर शासनच उदासीन असेल तर मुलांचं स्थलांतर कसं रोखायचं? त्यांना शाळाबाह्य होण्यापासून कसं वाचवायचं? असा सवाल करत समाजानेही वसतिगृहांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले.
कष्ट तितकेच, वाट्याला छदाम नाही…
भल्या पहाटे, साडेतीन वाजण्याच्या सुमारास उठायचे. लगबगीने चहा-पाणी, आंघोळ उरकून भाकऱ्या, कालवण बनवायचं. टोळीसोबत वाहनात बसून ठरलेल्या गावी, उसाच्या फडापाशी पोचायचे. हाती कोयता घेऊन घुसायचं. ऊस तोडीचा हंगाम

म्हणजे बहुतांश दिवस थंडीचे असतात. बोचणाऱ्या थंडीत, विंचूकाट्याची भीती बाजूला ठेवून कोयता चालवायचा. खूप कष्ट पडतात. त्यात पालावर सोडलेल्या किंवा सोबत आणलेल्या चिमुकल्यांकडेही लक्ष द्यावे लागते. सहा महिन्यांचा गाळप हंगाम अगदी अंत पाहतो. दोन पैसे पदरी पडतेल असं वाटतं परंतु, पतीच्या व्यसनामुळे त्यांची उचल तर खर्चली जातेचं माझ्या वाट्याचेही पैसे तसेच जातात. कसेबसे सहा महिने काढायचे, कर्ज, उसनवारी करायची, पुन्हा दुसरा हंगाम. हेच चक्र गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे.’, केज परिसरात ऊस तोडणी करायला आलेल्या कलावतीबाई यांची ही व्यथा.
ऊसतोड कामगार हा सर्वाधिक कष्टकरी वर्ग. सहा महिन्यांच्या स्थलांतराच्या काळात वेगवेगळी गावं फिरणं होतं. दसरा होताच कामगारांना कारखान्याचे वेध लागतात. तत्पूर्वी गाव परिसरातील मुकादमांकडून उचल घेतलेली असते. सन २०२२-२३ च्या गाळप हंगामासाठी कलावतीबाईंना ९० हजार रूपये मजुरी मिळाली. मात्र ही रक्कम त्यांच्या हाती पडण्याऐवजी त्यांच्या पतीकडे पडली. बहुतांशी महिला ऊसतोड कामगारांच्या बाबतीत असेच होते. याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले म्हणाल्या, महिलांचे कष्ट हे अपरिमित आहेत. ज्या पध्दतीने शेतीत महिलांचे योगदान अधिक आहे, त्याच प्रमाणे ऊसतोडणीतही. सहा ते सात लाखांवर ऊसतोड कामगार महिला यंदाच्या हंगामात शिवारात असतील. मात्र, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या वाट्याला दिले जात नाहीत. हा एकप्रकारचा अन्याय आहे, हे शोषण आहे. महिलांना त्यांचे पैसे मिळाले तर त्या कुटूंबासाठी, मुलांसाठी दोन पैसे बचत करून ठेवू शकतात. अडीअडचणीच्या काळी, दवाखान्यात हे पैसे उपयोगी ठरू शकतात. मुकादमांनीच याबाबतीत पुढाकार घ्यायला पाहिजे.’
दरम्यान, अलीकडच्या काळात अगदी खेडोपाडीही सहज दारू उपलब्ध होत असल्याने पुरुष कामगारांत व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. प्रशासन अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे कारखाना परिसर, कामगारांच्या राहुट्या याठिकाणी अशी दारू सहज उपलब्ध होते.
व्यसनामुळे सहा महिने कारखान्यांवर कष्ट करूनही कामगारांच्या हाती छदाम राहत नाही. कमवलेले पैसे व्यसनात वाया जातात. परिणामी कर्जबाजारी होण्याची वेळ कामगारांवर येते.
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर शिवारात ऊसतोडणीसाठी आलेला २० वर्षीय भाऊसाहेब खोमणे सांगतो, ‘आमचे वडील, चुलते हे दोन दशकांपासून ऊसतोडणीला जातात. पण आमच्या कुटूंबावर अजूनही कर्ज आहे. बहिणीचे लग्न झाले त्यालाही उसनवारी केली. त्यामुळे मला ऊसतोडणीला यावे लागले आहे. दोन वर्षात कर्ज फिटेल. पण ऊसतोड कामगाराचे जीवन हे फार दगदगीचे असल्याचा अनुभव मला येतोय. सोबत असलेले अनेकजण दारू पिऊनच कामावर येतात. त्यांच्या घरीही पैसे कमी जातात. व्यसनाचे प्रमाण कमी झाले तर किमान दोन पैसे कामगारांच्या घरी तरी जातील.’
सुरक्षितता, मदतीची कधी मिळेल हमी?
सन २०१९ चा गाळप हंगाम. माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा परिसर. सहा जणांची टोळी दिवस उजाडताच रोजच्याप्रमाणेच ट्रॅक्टरमध्ये बसून ऊसतोडणीसाठी निघाली. भरधाव वेगात वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने अचानक मागून येऊन ट्रॅक्टरला धडक दिली अन् ट्रॅक्टर पलटी झाला. अपघात एवढा भीषण होता की सर्व मजूर जखमी झाले तर अर्चना लक्ष्मण जगदाळे या ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू झाला. जखमी कामगारांना तर सोडाच परंतु मयत झालेल्या अर्चना यांच्या कुटुंबियांनाही शासन, कारखाना प्रशासनाकडून मदतीचा छदामही मिळाला नाही.

मुळा सहकारी साखर कारखाना सोनई येथे तोडणीसाठी गेलेल्या मनिषा विठ्ठल केदार (रा.वारणी, ता.शिरूर) यांचा १८ डिसेंबर २०२१ रोजी कारखाना स्थळ परिसरात अपघात झाला. उपचारावर त्यांचा पाच लाख रूपये खर्च झाला. इथेही कारखान्याकडून त्यांना कसलीही मदत मिळाली नाही. ही झाली दोन प्रातिनिधीक उदाहरणं. राज्यभरात प्रत्येक गाळप हंगामात ऊसतोड कामगारांच्या बाबत अशा घटना शेकडोंच्या संख्येने घडतात. लाख रूपये मिळतील, या आशेने तोडीसाठी गेलेल्या मजुरांना दवाखान्यात लाखो रूपये खर्च करण्याची वेळ येते तर काहींना जीवही गमवावा लागतो. शासनाच्या कुचकामी धोरणांमुळे कष्टांची शर्थ करून गोड साखर लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कामगारांचे भविष्य असे ‘रामभरोसे’ आहे. मदतीचा छदामही त्यांच्या कुटुंबियांच्या हाती पडत नाही. ऊसतोडणी मजुरांना विविध सुविधा व सवलती

मिळाव्यात, यासाठी शासनाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाचे कामकाज समाजकल्याण विभागांतर्गत सुरू आहे. महामंडळाच्या स्थापेनपूर्वी शासनाकडे राज्यात ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या कामगारांची वस्तुनिष्ठ माहितीही उपलब्ध नव्हती. त्यामुळे कामगारांच्या नोंदणीपासून महामंडळाने कामाचा श्रीगणेशा केला. मजुरांच्या नोंदणीची जबाबदारी सोपवण्यात आली ती ग्रामसेवकांवर. आधीच कामांचा व्याप असल्याचे सांगत सुरुवातीला ठिकठिकाणच्या ग्रामसेवक संघटनांनी नोंदणी करण्यास टाळाटाळ केली. शासनाने सक्ती केल्यानंतर नोंदणी तर सुरु झाली परंतु, हंगाम सुरु झाल्याने कामगार कारखान्यांवर रवाना झालेले होते. आता दोन हंगाम उलटून गेल्यानंतरही आणि दीड वर्षानंतर केवळ साडेतीन लाख कामगारांची नोंदणी पूर्ण होऊ शकली आहे. यापैकी केवळ सामाजिक न्याय विभागाच्या माहितीनुसार एक लाख कामगारांना ओळखपत्रे देण्यात आल्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. ऊसतोड कामगारांना अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू आल्यास विमा योजनेंतर्गत पाच लाख रुपये कुटुंबास अदा करण्यात येणार आहेत. तसेच, अपघातात जायबंदी झाल्यास नियमानुसार उपचारांसाठी रक्कम देण्यात येणार आहे. या कामगारांना पाच लाखांचे विमा संरक्षण, मुलांसाठी स्थानिक शाळेत शिक्षण तसेच ज्या भागात काम करतात त्याच ठिकाणी स्थानिक रेशनिंग दुकानांमधून रेशन देण्याची सुविधा दिली जाईल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या सुविधा केवळ नोंदणीकृत कामगारांनाच मिळणार असल्याने अद्याप नोंदणी पूर्ण न होऊ शकलेल्या सात लाखांहून अधिक कामगारांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. किमान गाळप हंगाम २०२३-२४ सुरु होण्यापूर्वी तरी राज्यातील १०० टक्के ऊसतोड कामगारांची नोंदणी पूर्ण होणे आवश्यक आहे.
“शासकीय योजना या कागदावर कितीही चांगल्या दिसत असल्या तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अतिशय कठीण राहते. ऊसतोड मजुरांची जबाबदारी ना कारखाना घेतो, ना मुकादम घेतो ना शासन. त्यामुळे सर्वात दुर्लक्षित आणि शोषित घटक ऊसतोडणी मजूर ठरतो आहे. मी स्वत: ऊसतोड कामगार पाल्य असून गेल्या काही वर्षांत कित्येक मजुरांच्या अपघातांच्या घटना अनुभवल्या आहेत. अपवादानेच एखाद्या ठिकाणी जखमी मजुराला कारखान्याने उपचार खर्च दिल्याचे पाहिले. अनेक कामगारांना तर अपघातानंतर उपचारही मिळत नाहीत. उपचार मिळाले तर कामगारांकडे पैसे नसतात. एक लाख रूपयांसाठी ऊस तोडणी करायला गेलेला मजूर दवाखान्याचे दोन तीन लाखांचे बिल कसे भरणार? शासनाने विमा योजना आणली त्यातही काही त्रुटी आहेत. त्यामुळे दहा लाखांहून अधिक संख्येने असलेला हा कामगार शोषणाचा बळी पडत असल्याचे दिसते”, अशी भावना ऊसतोड कामगार प्रश्नांचे अभ्यासक, अभियंता दत्ता हुले यांनी व्यक्त केली.
गुणवत्ता आहे, हवे दिशादर्शन
”आई आणि बापूंचं उभं आयुष्य माझ्यासाठी कष्ट करण्यात गेलं आहे. तेव्हा मी कुठे इथपर्यंत पोहोचलो. माझं सर्व यश आई-वडीलांच्या कष्टाचं चीज आहे,” नुकताच निकाल जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेत एनटीडी प्रवर्गातून राज्यात प्रथम आलेला संतोष आजिनाथ खाडे सांगत होता. सावरगाव (जि.बीड) येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील संतोषनं पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवत अभ्यास केला. ग्रामस्थ, नातेवाईकांनी सहकार्य केलं. यातून त्याने हे नेत्रदीपक यश मिळवले.
बीड जिल्ह्यातीलच आणखी एका ऊसतोडी केलेल्या युवकानेही यंदाच्या एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. त्याचं नाव नागेश राम लाड. चिखली गावातील स्वतः ऊसतोड मजुरी केलेला नागेश सांगतो, “बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मी गेली अनेक वर्ष एमपीएससीमध्ये तयारी करत होतो. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये बऱ्याच अडचणी आल्या आणि मला अडचणीचा सामना करावा लागला. मला मिळालेल्या यशाचे श्रेय मी माझ्या ऊसतोड कामगार कुटुंबाला देतो. त्यांच्या कष्टाची जाणीव मला स्वस्थ बसू देत नव्हती.”
संतोष आणि नागेश यांच्याप्रमाणेच अनेक ऊसतोड कामगार पाल्यांनी एमपीएससीचं नव्हे तर विविध क्षेत्रात यश मिळवलेले आहे. योग्य वयात आलेली समज आणि मिळालेले मार्गदर्शन यातून हे विद्यार्थी घडले. परंतु, ८० टक्क्यांहून अधिक ऊसतोड कामगार पाल्य हे पालकांच्या उसतोडणीच्या कामातच गुंततात व पुढे याच कामात वाहून घेतात. या व्यवसायात सुरक्षिततेची हमी नसल्याने आणि कामाचा पुरेसा मोबदला न मिळाल्याने बहुतांश जणांना आयुष्य विवंचनेत घालवावे लागते. वास्तविक कुठल्याही मजुराला त्याची मुलं या वेठबिगारीच्या व्यवसायात येऊ नयेत, असंच वाटत असतं. शासन सुविधा देण्यात कमी पडल्याने त्यांचा नाईलाज होतो.
नाथापूर (ता.बीड) येथील सुदाम काळे हे ४८ वर्षांचे मजूर सांगतात, ”मी दरवर्षी कारखान्यावर जातो. दहा वर्षांपासून माझी मुलेही जातात. त्यांना शिकवायचे होते. पण आर्थिक अडचणी आणि सुविधा नसल्याने दोघांनाही कारखान्यावर न्यावे लागले. आज त्यांच्याही हाती कोयता कायमचा आलेला आहे. शाळा, शिक्षण झाले असते तर फायदा झाला असता.”
शासनाने मध्यंतरी ऊसतोड कामगार संख्या अधिक असलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याचे निश्चित केलेले

होते. घोषणेला दोन वर्षे लोटली. तरी एकही वसतिगृह उभे नाही. शिवाय शासनाने जाहीर केलेल्या वसतिगृहाच्या ठिकाणी केवळ शंभर मुलांची व्यवस्था होऊ शकते. ज्या तालुक्यात पाच हजारांच्या पुढे ऊसतोड कामगार आहेत तिथे शंभर संख्या असलेले वसतिगृह कसे पुरेसे ठरेल. त्यामुळे नागरी उत्थानाचा विचार करताना शासनाने व्यापक अशी योजना राबवत उसतोडणी मजुरांच्या मुलांची शाळागळती थांबवायला हवी. अनेक अशासकीय संस्था, कंपन्याही या कामी मदतीचा हात देऊ शकतात. मात्र, त्यासाठी हवी ती इच्छाशक्ती.
सुरक्षित निवारा आणि दोन वेळचे पुरेसे जेवण शासन देऊ शकले तर वर्षाकाठी शाळाबाह्य होणाऱ्या हजारो मुलांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते, यात शंका नाही. ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता सुटण्यासाठी त्यांची मुलं शिक्षण प्रवाहात राहणे अत्यंत गरजेचे आहे.
Related