४८० फुटांवरुन शहिदांना अभिवादन ‍
पुणे जिल्ह्यातला वानरलिंगी सुळका हा गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. ४८० फूट उंच असणाऱ्या या सुळक्यावर चढाई करुन टोकावर तिरंगा फडकावत बीड जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी गोरख राठोड यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना अनोख्या प्रकारे श्रद्धांजली अर्पण केली.
गोरख राठोड हे बीड जिल्हा पोलिस दलात मोटर परिवहन विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते महामार्ग पोलिस विभागात प्रतिनियुक्तीवर आहेत. आपल्या या गिर्यारोहणाच्या आवडीविषयी गोरख सांगातात, “मी तीन वर्षांपासून गिर्यारोहण करतो. राज्यातल्या विविध ठिकाणी गिर्यारोहक मित्रांसोबत मी जातो. १५ ऑगस्ट २०२१ हा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिवस होता. यावेळी मी सहकाऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील उंच असलेल्या शितकडा धबधबा या ठिकाणी चढाई करुन तिरंगा फडकावत स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. त्यानंतर मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ४८० फूट उंच असलेल्या पुणे जिल्ह्यातील वानरलिंगी सुकळ्यावर मी चढाई केली.” त्यांच्या पथकात सुमारे ३५ जण होते त्या पैकी केवळ १४ जणांनी ही चढाई यशस्वी केल्याचे गोरख सांगतात.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या गोरख यांना मित्रांमुळे गिर्यारोहणाची आवड लागली. धकाधकीच्या नोकरीतूनही ते आपल्या या छंदासाठी वेळ काढतात. या छंदाच्या माध्यमातून ते देशप्रेम, पोलिस दलाविषयीची कृतज्ञता संधी मिळेल तशी व्यक्त करत असतात. गोरख यांनी आतापर्यंत कळसुबाई शिखर, भैरवगड, शितकडा धबधबा, वानरलिंगी सुळका या महत्वाच्या ठिकाणांसह विविध गड, किल्ल्यांवर गिर्यारोहण केले आहे.
गोरख म्हणतात, “माऊंट एव्हरेस्ट सर करायचं माझं स्वप्न आहे. मात्र, त्याच्या तयारीसाठीही अनेक आर्थिक अडचणी आहेत. सध्या नोकरी सांभाळून गिर्यारोहण करुन सराव करतो आहे. यात वरिष्ठ अधिकारी, सहकारी, मित्र आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंबियांचे पाठबळ आहे. त्यामुळेच हे करता येणे शक्य आहे.” मात्र, एक दिवस नक्की स्वप्नपूर्ती करु असे गोरख सांगतात.
– अमोल मुळे, बीड

Leave a Reply