गोष्ट 40 वर्षांपूर्वी शैलाबाईंनी उभारलेल्या हार्डवेअरचा व्यवसायाची

महिलांनी कुठलं  काम करावं  किंवा करु नये याबाबत समाजामध्ये काही परंपरा आहेत. हीच परंपरा स्त्री ही पुरुषापेक्षा दुर्बल आहे, असंही मानते. त्यामुळेच शारिरिक ताकदीच्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या  स्त्रियांविषयी समाजाला नेहमीचकुतूहल वाटतं.  असंच कुतूहल परभणी शहरातील 67 वर्षांच्या  शैलाबाई सुभाषराव उदगीरकर यांच्याविषयी  आहे.  भजन गल्लीत रहाणाऱ्या शैलाबाई गेल्या 40 वर्षापासून यशस्वीरित्या हार्डवेअर स्टोअर्सचा उद्योग-व्यवसाय सांभाळत आहे.
त्यांचं  माहेर परभणीतच.  जिल्हा परिषदेच्या कन्या  प्रशालेतून मॅट्रीक. 1968 साली त्यांचं  लग्न लातूरच्या  सुभाषराव उदगीरकर यांच्याशी झालं. आता 72  वर्षांच्या सुभाषरावांनी त्यावेळी लातूरच्या दयानंद कॉमर्स कॉलेजमधून बी.कॉम.ची पदवी संपादन केली होती. त्यांनी 1972 च्या दुष्काळामध्ये 2 महिने कारकून म्हणून तात्पुरत्या स्वरूपात काम केलं. त्यानंतर हिंदुस्थान ट्रॅक्टर कंपनीत व्यवस्थापक म्हणून 6 महिने काम. एलोरा ट्रेडींग कार्पोरेशनमध्ये  पेंट  (रंग) विक्रीचं  काम. 1975 मध्ये त्यांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाची कामे. यासाठी त्यांना बीड, परभणी, औरंगाबाद आदी ठिकाणी जावं  लागायचं. लातूरला  किराणा व भुसार मालाचं  दुकानही चालवलं.
बराचसा अनुभव गाठीशी असल्याने परभणीत 1984 मध्ये हार्डवेअरचे दुकान सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं . सुशिक्षित बेरोजगार म्हणून त्यांनी बँक ऑफ बडोदाकडून 22 हजाराचं  कर्ज घेतलं. सुभाषराव  कुठे बाजारात अथवा  बाहेरगावी गेले की दुकान सांभाळण्याची जबाबदारी शैलाबाईंवर!   हीच संधी मानून त्यांनी कौशल्य पणाला लावलं.  अल्पावधीत त्या  कुणाच्याही मदतीविना  हार्डवेअर दुकानाचे सर्व आर्थिक व इतर व्यवहार सांभाळू लाग.
माहेरी वडिलांचं  कापड दुकान होतं. लहानपणापासून पैशांचे व्यवहार माहिती असल्यानं  हार्डवेअरचं  दुकान चालवताना तो अनुभव कामी आला. ट्रान्सपोर्टचा माल आला की तो सोडूवन घेण्यापासून नगरपालिकेचा कर भरणं ते शासकीय कामांसाठी मालाचा पुरवठा करण्यापर्यंतची सर्व कामं  त्या स्वत:च क.
आता त्यांच्या मदतीला प्रसाद व प्रवीण ही दोन्ही मुलं आली आहेत.  व्यवसायात चांगली प्रगती झाली आहे. एका हार्डवेअर स्टोअरपासून सुरुवात झालेल्या या व्यवसायाचा मोठा विस्तार झाला असून तिरुमला ट्रेडींग कार्पोरेशन आणि गुरुभक्ती ट्रेडर्स अशा दोन स्वतंत्र फर्मदेखील सुरु झाल्या आहेत. प्रसादने आयटीआय इलेक्ट्रीशियनचा अभ्यासक्रम पूर्ण  केला असून व्यवसायात त्याची पत्नी आश्विनी मदत करते. प्रवीणनेदेखील आयटीआय वायरमनचा अभ्यासक्रम पूर्ण  केला असून  त्याची पत्नी प्रेरणाही  मदत करते.
घरातील ज्येष्ठ सदस्य असलेले सुभाषराव आणि  शैलाबाई आजही सकाळी घरातील आपापली कामं  पूर्ण करून दुकानात येऊन  वेळोवेळी मार्गदर्शन करतात. या व्यवसायात 3 कोटीची वार्षिक उलाढाल होते.  केवळ मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर शैलाबाईंनी  हे यश मिळवलं.
त्यांच्या कर्तृत्वाचा अनेक संस्थांकडून सन्मान झाला आहे.

-बाळासाहेब काळे, परभणी

Leave a Reply