गोष्ट मिरचीने आणलेल्या गोडव्याची
न परवडलेली फुलशेती, त्यात कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, वातावरणातील बदल, विविध रोगाचा होणारा प्रादूर्भाव, विजेचा लपंडाव, दोन वर्षातील कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये पडलेले भाव अशा अनंत अडचणी. पण त्यावर संजय मदनराव चव्हाण यांनी मात केली.
साडेचार हजार लोकसंख्या असलेलं बीड तालुक्यातील नाथापूर. ५०० हेक्टर शेतीक्षेत्र असलेल्या या गावात कापूस -सोयाबीन ही प्रमुख पिकं. गावाजवळील १७६६ दलघमी पाणी साठवण क्षमतेच्या कोल्हापूरी बंधाऱ्यावर शेतकऱ्यांची पाण्याची मदार. खरीपात सोयाबीन तर रब्बीत हंगामात हरभरा. त्याच्या जोडीला भाजीपाला. याच गावातील प्रयोगशील शेतकरी संजय मदनराव चव्हाण. बारावीपर्यंत शिक्षण झालं पण नोकरीच्या मागे न लागता ते घरची शेती करू लागले. त्यांच्या कुटुंबात तीन भावात ५५ एकर शेती. त्यातली ४५ एकर जमीन काळभोर व सुपीक असून ४० एकर ठिबक सिंचन आहे. तीन विहिरी आणि दोन बोअर. हे पाणी कमी झाले तर नदीवरून पाणीपुरवठा.
संजय यांनी दहा वर्षापूर्वी तेरा एकर शेतात गुलाब, मोगरा, गलांडा, काकडा, अस्टर अशा फुलांची रोपे लावली होती. त्यांची फुले पुण्याच्या बाजारात जात होती. परंतु खुल्या बाजारात फुलांचे भाव पडत असल्यानं शेती परवडत नव्हती. बीडमध्ये फुलांचे मोठे मार्केट नाही. त्यातच नैसर्गिक वातावरणातील बदलाचा फुलशेतीवर परिणाम होत होता. शेवटी त्यांनी गेल्या पाच वर्षापासून फूलशेती सोडून मिरचीसह कांदा, आलं, टॉमेटो लागवड सुरू केली.
२०२० मध्ये संजय यांनी दीड लाख रूपये खर्चून नाशिकमधून जी-४ शार्प वन या मिरचीच्या वाणाची एक लाख रोपं आणून ठिबक सिंचनवर बेड तयार करून लावली. सुरुवातीला तीन एकरवर मल्चींगवर मिरचीची लागवड केली. लॉकडाऊनमुळे मिरचीच्या तोडणीला फारसे मजूर मिळाले नाहीत. जे काही मजूर मिळाले त्यांच्याकडून फिजीकल डिस्टन्स ठेवून तोडणी करून घेतली. पहिल्या वर्षी रोपांची खरेदी, मल्चींग, खते, फवारणी, तोडणी, यावर त्यांना जवळपास तीन लाखाचा खर्च झाला. चाकणच्या बाजारात मिरचीला केवळ २५ रूपये प्रति किलोचा भाव आल्याने चार लाख रूपयांचा नफा हाती आला. लॉकडाऊनच्या दुसऱ्याही वर्षीही त्यांनी तीन एकरवर मिरचीची लागवड केली तेव्हा बाजारात मिरचीचा भाव २५ रूपयांवरून ३५ रूपयांवर गेल्यानं आठ लाख रूपये नफा हाती आला. यंदा मात्र त्यांनी शेतात मिरचीचं क्षेत्र तिपटीनं वाढवत नऊ एकरवर मिरची लागवड केली. यंदा मिरचीला ७५ रूपये प्रति किलो भाव मिळाल्यानं ते खुशीत आहेत. नऊ महिन्यात जर हा भाव कायम राहिला तर ५० लाखांचा नफा त्यांच्या हाती येणार आहे. त्यांच्या नऊ एकर क्षेत्रात दररोज एक टन मिरची होत असून ती दुसऱ्या दिवशी पुण्याला पाठवली जाते. एक टनाच्या पाठीमागे ४८ हजार रूपयांचा नफा त्यांना मिळत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून मिळालेल्या तीन एचपीच्या सौर उर्जा प्रकल्पावर मिरचीला सलग आठ तास पाणी ते देतात. म्हणजे एका एकरातील मिरचीला त्यांना ४५ मिनिटे लागतात. वीज नसली तरी सौर ऊर्जेमुळे मिरचीला पाणी देण्यात अडथळे येत नाहीत.
विशेष म्हणजे संजय यांनी गावातील बळीराम शिंदे, गोविंद सारडा, बालासाहेब गिराम, गोरख चव्हाण , विलास चव्हाण, चंद्रकांत रडे, विलास चव्हाण या शेतकऱ्यांसह ४० शेतकऱ्यांना मिरची लागवडीसाठी प्रोत्साहित केलं. त्यांचा ग्रुप समूह शेती करतो. बारामती कृषी प्रदर्शन , पालघर इथल्या मिरच्या प्लॉटला हा समूह भेट देतो.
संजय सांगतात,”मिरचीचे पीक नऊ महिन्यांचं. शेतात मिरचीची नियमीत तोडणी सुरू ठेवल्यास हातात खेळता पैसा राहतो. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांना परवडते. बाजारात जर मिरचीला २५ रूपये किलो भाव आला तर हिरवी मिरची वाळवुन ती लाल करावी. साडेतीन किलो हिरव्या मिरचीपासून एक किलो लाल मिरची तयार होते. बाजारात लाल मिरचीला दोनशे ते अडीचशे रूपये किलो भाव असून यातून फायदा होतो,असा माझा अनुभव आहे.”
– दिनेश लिंबेकर, बीड

Leave a Reply