”एक दिवस मी वर्गामध्ये ‘खोप’ ही कविता शिकवत होतो.” जगदीश कुडे सर सांगत होते.
”शिकवणं सुरू असताना मध्येच एक मुलगी म्हणाली, गुरुजी थांब ही कविता शिकवू नको. ती ढसाढसा रडत होती. त्या मुलीचे आईवडील ऊसतोडीच्या कामाला गेले होते आणि त्यांची आठवण तिला झाली. तिथून पुढे खर्या अर्थानं श्रीराम तांडा गावासाठी, लोकांसाठी, मुलांसाठी कामाला सुरुवात झाली. ” कुडे सरांनी श्रीराम तांड्यावरच्या मुलांचं स्थलांतर पूर्णपणे थांबवण्यात यश मिळवलं आहे.
शिक्षक दिनानिमित्त गेल्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी जालना जिल्हयातल्या मंठा तालुक्यातील श्रीराम तांडा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.
श्रीराम तांडा, जालना हैदराबाद महामार्गावरील वाटुरफाटा या ठिकाणापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरच्या माळरानावर वसला आहे. लोकसंख्या साधारण ४५०. प्रामुख्यानं बंजारा समाज. डोंगराच्या कुशीत वसलेल्या, पक्का रस्ता नसलेल्या गावात १९९३ साली जगदीश कुडे सर आले. गावातल्या मारुतीच्या मंदिरात शाळा भरायची. पहिली ते पाचवीपर्यंतची ही शाळा. गावात वीज नाही, पाणी नाही, मुलांचे निरक्षर आईवडील, अठराविश्व दारिद्र्य. दोन चार सधन शेतकरी सोडले तर बाकीचे गावकरी जवळपास अर्ध वर्ष ऊसतोडणी आणि वीटभट्टीवरच्या कामासाठी स्थलांतरित होणारे. त्यांच्यासोबत मुलंही. पटसंख्या २५, त्यातलीही १०-१५ मुलं स्थलांतरित होत. मुलांच्या शिक्षणात खंड पडत होता. शिकणंच नाही तर मग परिस्थिती बदलणार तरी कशी?कुडे सरांनी पालकसभा बोलावली. आपलं परिवर्तनाचं स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर उभं केलं. गावकरी मुलांना शाळेत पाठवू लागले. सहकारी शिक्षक नसिर पठाण सरांच्या मदतीनं प्रत्येक मुलाला समजून घेत विद्यार्थ्यांना शिकण्याची
गोडी लागेल, गुणवत्ता वाढीला लागेल, असे उपक्रम सरांनी सुरू केले. इथली बोलीभाषा ते शिकले. शाळेच्या उपक्रमांची माध्यमांनी, शासनानं दखल घेतली. शिक्षणअधिकाऱ्यांनी शाळेला भेटी देऊन वेळोवेळी कौतुक केलं. आज शाळेची पटसंख्या १५० वर गेली असून परिसरातल्या मान्यवरांची मुलंही या शाळेत प्रवेश घेत आहेत. प्रवेशासाठी इथं रांगा लागत असून प्रवेश बंदची पाटी लावायचीही वेळ आली आहे.
२०१२ पासून इथल्या मुलांचं स्थलांतर पूर्णपणे थांबलं आहे. अनेक पालकांनाही सरांनी स्थानिक स्तरावर रोजगार मिळवून दिला. जे अल्प पालक स्थलांतर करतात त्यांच्या मुलांचीही गावात सोय होत आहे. शाळेतून आहार मिळतोच. काही मुलांना सरांनी दत्तक घेतलं आहे, तर काहींची जबाबदारी त्यांच्या नातलग, शेजाऱ्यांनी उचलली आहे. २०१५-१६ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सरांना मिळाला आहे.
२०१७ मध्ये तत्कालीन प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार यांनी त्यांना महाराष्ट्रातील पहिला बालरक्षक घोषित केलं. शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलांसाठी स्वंयप्रेरणेने व संवेदनशीलपणे कार्य करणारी व्यक्ती म्हणजे बालरक्षक होय. कुडे सरांनी आपल्या कामातून इतर शिक्षकांनाही स्थलांतर रोखण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
-अनंत साळी, ता. मंठा, जि. जालना