गोष्ट मिलेट्सची
देवधान्य
“मधुमेहामुळे चिघळत असलेली पायाची जखम हे धान्य खाल्ल्याने बरी झाली.” कोणतं तरी पिवळ्या रंगाचं बारीक धान्य माझ्या हातात देत पेंडसे काका मला म्हणाले.
हे नक्की कोणतं धान्य आहे, मी विचारलं.
याला मिलेट, तृणधान्य किंवा देवधान्य असं म्हणतात, काका म्हणाले.
म्हणजे नक्की काय हो?
अशी धान्य जी फार पूर्वीपासून आपल्याकडे घेतली जातात, जी जमिनीचं, आपलं आणि एकूण पर्यावरणाचं आरोग्य चांगले ठेवतात.
याचा तुम्हाला नक्की कसा फायदा झाला?
तांदूळ आणि ज्वारी मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह बळावण्याची शक्यता असते, परंतु हे पिवळ्या रंगाचे धान्य म्हणजेच फॉक्सटेल मिलेट किंवा राळं. हे धान्य खाल्ल्याने माझ्या रक्तातली साखरेची पातळी कमी झाली आणि हळूहळू इन्सुलिन घ्यायचं बंद झालं आणि शिवाय मधुमेहात होणारी जखम देखील बरी झाली.
अरे वा! हे फारच जादुई धान्य आहे की…
हो. म्हणून याला मॅजिकल मिलेट असं देखील म्हणतात. हे घे पुस्तक आणि यातून याची माहिती वाच. पेंडसे काकांनी मला एक पुस्तक दिलं आणि मी वाचू लागलो.
शेतीची सुरुवात झाली आणि हे धान्य सर्वप्रथम मानवाने आपल्या जवळ केले. आशिया आणि आफ्रिका खंडात सापडलेले धान्य हळूहळू जगातील असंख्य संस्कृती सोबत नांदू लागले. इंग्रजीत यांना मिलेट (Millet) म्हणतात. मिनी म्हणजेच लहान आकाराच्या एका दाण्यापासून असंख्य दाणे मिळवता येतात. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी यांना रामधान्य, देवधान्ये, जादुई धान्य, श्रीधान्य अशी नावे आहेत. मराठीत याला भरडधान्य म्हणतात. परंतु हे नाव मिलेटला शोभत नाही. ही नावं कशी पडली असतील बरं?
एकदा तांदूळ आणि नाचणीचे (Finger Millet) भांडण लागते. नाचणी म्हणते मी सगळ्यात चांगली. तांदूळ म्हणतो मी महान. ती दोघे न्यायासाठी धर्मराजाकडे जातात. राजा दोघांना तुरुंगात टाकतो. काही महिन्यांनी जेव्हा दोन्ही धान्यांना बाहेर काढलं जातं तेव्हा तांदूळ खराब झालेला असतो, मात्र नाचणी आहे तशीच असते. ह्या गोष्टीतून कळतं की, नाचणी जास्त काळ टिकणारं धान्य आहे म्हणजेच लोकांचं धान्य आहे. म्हणून ह्या वर्गातील धान्यांना रामधान्ये म्हणतात. कारण राम हा लोकांचा राजा होता. भारतातील काही राज्यांमध्ये मिलेटला देवधान्ये किंवा श्रीधान्ये (समृद्धी देणारी) म्हणतात.
मिलेट्सबाबत दुसरीही अशीच एक रंजक गोष्ट ऐकायला मिळते. ती अशी –
एकदा इंद्राच्या एकुलत्या एक मुलीचं पृथ्वीवरील एका मुलावर प्रेम जडतं. इंद्राने नकार देऊनही मुलगी ऐकत नाही. शेवटी एकुलत्या एक मुलीसमोर इंद्र हार मानतो. मुलगी पृथ्वीवर जाणार म्हटल्यानंतर मुलीसोबत काय द्यायचं हा प्रश्न त्याला पडतो. इंद्रदेव मुलीसोबत सात वेगवेगळी मडकी भरून देतो. त्या मडक्यात असतात भिन्न भिन्न प्रकारची मिलेट. देवांनी दिलेलं हे धान्य म्हणून याचं नाव देवधान्य. अगदी यजुर्वेदामध्येही या धान्याचा उल्लेख आढळतो. याचाच अर्थ भारतीय कास्ययुगापासून मिलेट खाल्लं जातं. (इ.स.पूर्व ४५००). भारताव्यतिरिक्त आफ्रिका, चीन, जपान, कोरिया आदी देशांमध्ये फार पूर्वी पासून मिलेट खाल्ले जात असल्याचे पुरावे आढळतात. थोडक्यात काय तर आपले पूर्वजही मिलेट खात होते.
मिलेटमध्ये प्रमुख, मोठे मिलेट व धाकटे मिलेट अशी वर्गवारी करतात. मोठे मिलेटम्हणजे ज्वारी (Sorghum), बाजरी (pearl millet) हे तर धाकटे मिलेट म्हणजे नाचणी(finger millet), वरई(barnyard millet), राळा(foxtail millet), सावा (little millet), कोदो (kodo millet), ब्राऊन टॉप मिलेट, प्रोसो मिलेट अशी एकूण नऊ मिलेट आहेत.
या व्यतिरिक्त सकारात्मक मिलेट म्हणजेच अशी धान्य जी आपल्याला आजारात गुणकारी ठरतील. यात वरई(barnyard millet), राळा(foxtail millet), सावा (little millet), कोदो (kodo millet), ब्राऊन टॉप मिलेट. दुसरा प्रकार तटस्थ धान्य अशी धान्य ज्यामुळे आपले निरोगी शरीर निरोगी राहण्यास मदत होईल यात ज्वारी, नाचणी, बाजरी अशी धान्य येतात. भारतीय कदान्न (मिलेट) अनुसंधान संस्था (Indian Institute of Millets Research) हैदराबाद मध्ये कार्यरत आहे. २०२३ हे वर्ष जागतिक मिलेट वर्ष आहे. Odisha Millets Mission अंतर्गत ओडीसा सरकार शिधापत्रिकेवर (Ration Card) नाचणीचे वाटप करते.
दक्षिण भारतातील डॉ. खादर वली यांना मिलेट मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात. त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून मिलेट संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.
जगाची वाढती लोकसंख्या, पर्यावरणाचे होत असलेले नुकसान, बदलते वातावरण, शेती समस्या, आरोग्याच्या समस्या या सगळ्याकडे उत्तर म्हणून मिलेटकडे पाहिलं जातं. तर या मिलेटमधून शरीराला काय मिळतं, मिलेट का खावं हे आता पाहू.
अंबली
ज्वारी (Sorghum), बाजरी (pearl millet), नाचणी(finger millet), वरई(barnyard millet), राळा(foxtail millet), सावा (little millet), कोदो (kodo millet), ब्राऊन टॉप मिलेट, प्रोसो मिलेट यातली काही नावं पहिल्यांदा ऐकल्यासारखी वाटत असतील. मिलेट आहारातून जाण्याची कारणं असंख्य आहेत. भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट घेतले जात असत. जिथे ४५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडतो अशा सगळ्या भागात मिलेट घेतले जाते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ज्या प्रकारे आपल्या देशात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या त्याच प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाचे आणि तांदळाचे उत्पादन वाढू लागले. साधारण 1970 आणि 71 च्या काळात एकूण अन्नधान्य लागवडीपैकी 45.9 टक्के एवढी मिलेट लागवड होती.
मात्र 1996 च्या काळात तीच लागवड 31.5 टक्क्यावर आली. याचाच अर्थ असा की तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली शिवाय पीडीएस (Public Distribution System) सिस्टमवर म्हणजेच शिधापत्रिकेवर संपूर्ण देशात गहू आणि तांदूळच दिला जाऊ लागला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मिलेटमधून मिळणारे आर्थिक उत्पादन कमी झाले.
कोणत्याही प्रकारचा कस नसलेली, कमी पाण्याच्या जमिनीत शिवाय खडकाळ जमिनीतही मिलेट उगवून येतं. शिवाय मिलेट कोणत्याही प्रकारच्या रसायनाशिवाय उगवू शकतात. मिलेटमध्ये इतर धान्याच्या तुलनेत प्रोटीन, कॅल्शियम, फायबर जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे आपल्या देशातील कुपोषणाचे प्रमाण तसेच अन्नधान्यामध्ये पोषणतत्त्वांचे प्रमाण ही समस्या सोडवता येईल. दक्षिण भारतात काम करणारे डॉक्टर खादर वली यांचं मिलेटबाबत विशेष संशोधन केलं आहे.
पाऊस कमी झाला किंवा मोठाली वादळं आली तरीही अशा जमिनीमध्ये टिकून असणारे मिलेट शेतकऱ्याला हुकमी उत्पादन मिळवून देते. शिवाय वाढती जागरूकता आणि ग्राहकांची मागणी यामुळे शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य तो दर मिळतो. मिलेट्साठी लागणारा उत्पादन खर्च हा खूप कमी असल्याने शेतकऱ्याला परवडणारे पीक आहे. मिलेटसहित कडधान्य, तेल बिया आपल्याला मिश्रपीक पद्धतीने देखील करता येतात.
मिलेटमध्ये कणीस वगळता इतर भाग हा जनावरांच्या खाण्यासाठी वापरला जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था उपलब्ध होते. हा चारा पोषक असल्याने जनावरांची तब्येत उत्तम राहते. ज्वारीतील काही जाती नुसत्या जनावरांच्या खाण्यासाठी वापरल्या जातात.
कोणत्याही मधुमेह झालेल्या व्यक्तीला ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेली धान्य खाण्यास सांगितलं जातं. त्यामागचं कारण असं की ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले धान्य आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज हळूहळू सोडतं. त्यामुळे शरीरामध्ये साखरेची पातळी योग्य राखली जाते.
सगळे मिलेट खरीप हंगामात (पेरणी मे – जून) पेरले जातात. काही मिलेट (वरई- नाचणी ) भातासारखी लावणी करून करतात. काही नुसते फेकून करतात तर काही पेरणी केली जाते. सगळ्या मिलेटची पीक अवस्था 2 ते 4 महिन्यात येते. शिवाय रब्बी हंगाम (ऑक्टोबर) आणि उन्हाळ्यात देखील घेतले जातात.
मिलेटमध्ये तंतुमय (Fiber) पदार्थांचे प्रमाण जास्त असते. जो व्यक्ती मिलेट पहिल्यांदा खातो त्याला सुरुवातीला काही दिवस पोट बिघडण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मिलेट खाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास मिलेटमधून मिळणारी सगळी पोषणमूल्ये आपल्याला शरीराला मिळतात.
मिलेट वापरताना लक्षात ठेवायच्या गोष्टी :
१. कोणतेही मिलेट वापरताना ते पहिल्यांदा स्वच्छ धुऊन नंतर आठ तास भिजवून, त्याचा कुठलाही पदार्थ करावा.
कारणं : मिलेट आठ तास भिजल्याने त्यात असणारे तंतुमय पदार्थ मोकळे होतात. मोकळे झालेले तंतुमय पदार्थ आपल्याला शरीराला पचवायला हलके असतात शिवाय मिलेट भिजवल्यानेच त्यातील सगळे पोषणमूल्य आपल्याला मिळतात. न भिजवता खाल्यास पचनाला त्रास होण्याची शक्यता आहे. मिलेटचा रवा किंवा पीठ करताना सुद्धा हीच पद्धती वापरणे अनिवार्य आहे.
२. मिलेट भिजवताना वापरलेले पाणी फेकून देऊ नये. ते पुन्हा वापरावे
कारण : रात्रभर पाण्यात भिजल्याने काही पोषकमूल्ये पाण्यात विरघळतात. तेच पाणी फेकून दिल्याने चवीत आणि पोषणात फरक पडतो. जसे की कोडो मिलेट लगेच आपला काळसर रंग पाण्यात सोडते.
३.. मिलेट खरेदी करताना वेगवेगळे रंग असलेले अथवा नुसती वरची साल काढलेले (unpolished) मिलेटच खरेदी करावे म्हणजेच मिलेटला रंग असतो. पूर्णपणे सफेद असलेले मिलेट विकत घेऊ नये.
कारण – जसे की राळ (foxtail Millet) हे पिवळ्या रंगाचे असते, वरई हे त्वचेच्या रंगाचे असते तर कोडो हे काळपट असते. मिलेटला असणारा रंग त्याच्यामध्ये असणारे गुणधर्म दर्शवतो.
४. मिलेट धुताना जर रंग गेला तर ती नैसर्गिक क्रिया आहे त्यामुळे दोन वेळा पेक्षा जास्त मिलेट धुवू नये.
कारण : एखाद्या धान्याचा जास्त रंग गेला म्हणजे आपण ते जास्त धुतो. त्यात घाण आहे असे आपल्याला वाटते. परंतु मिलेटचा रंग जाणे नैसर्गिक आहे. जास्त वेळा धुतल्यास त्यातील पोषकमूल्य कमी होते.
५. शहरांमध्ये हल्ली मिलेट म्हणून बरेच जण मिलेटच्या बिया म्हणजेच सिड विकत आहेत त्यामुळे घेताना काळजी घ्यावी.अशा बिया खाल्यास आपल्या पचन संस्थेला गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.
६. मिलेट कधीही कुकरमध्ये शिजवू नये. लोखंडी भांडे किंवा मातीच्या भांड्याचा वापर करावा.
कारण : कोणतेही धान्य कुकरमध्ये शिजवल्यास शिट्टीमधून पोषकमूल्य निघून जातात. मातीच्या भांड्यात मंद आचेवर शिजवून त्याची चव अबाधित राहते. लोखंडाच्या भांड्यात केल्याने शरीराला आवश्यक असणारे लोखंड (iron) आपल्याला मिळते.
मिलेट कुणी व किती खावे ?
वय वर्षे 5 ते वय वर्षे 100 पर्यंत कुणीही व्यक्ती मिलेट खाऊ शकतात. मिलेट आकाराने लहान असेल तरी शिजवून झाल्यावर मिलेट फुलतात. एका व्यक्तीच्या मुठीत बसतील एवढे मिलेट एका व्यक्तीला पुरतात म्हणजेच चार लोकांसाठी चार मुठी पुरतात. जितके मिलेट घेऊ त्याच्या चार पट पाणी घालावे.
मिलेटपासून बनवले जाणारे पदार्थ
मिलेट रवा : या रव्याचा उपमा तसेच खीर करता येते
मिलेट पीठ : याचे इडली, डोसा, चपाती, भाकरी, माडगं, आंबील करता येते
त्याचसोबत मिलेटचे बिस्कीट, लाडू, शेवया, नूडल्स,पोहे, मुरमुरे बनवता येतात
मिलेट अंबली
साहित्य : कोणतेही मिलेट, सुती कपडा, मातीचे भांडे
कृती:
1. प्रथम मिलेट 12 तास पाण्यात भिजत ठेवावे
2. दुसऱ्या दिवशी मातीच्या भांड्यात तेच मिलेट शिजवण्यासाठी मंद आचेवर ठेवावे. शिजवताना मीठ टाकू नये.
3.शिजवून झाल्यावर थंड होऊ द्यावे
4.थंड झाल्यावर मातीच्या भांड्याला व्यवस्थित सुती कपडा गुंडाळावा.
ते भांडे ठेवून द्यावे.
5. 12 तास आंबून झाल्यावर गरज वाटल्यास थोडे मीठ टाकून खाता येते. शिल्लक राहिलेली अंबली त्याच दिवशी खाऊन संपून टाकावी.
मुलांना भूक लागत नाही का ?
पाचवीतली सई आज एकदम खुशीत होती. आर्या, पार्थ, सोहम आणि त्यांच्या आईबाबांसोबत ती चालली होती दिनूमामाकडे हुरडा पार्टीसाठी … सोबत मित्रमंडळी त्यामुळे सई खुश. बर्थ डे पार्टी, ख्रिसमस पार्टी माहीत होतं, पण हुरडा.. ??? तिने विचारलं. मग उमेशकाका सांगू लागले, ”हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे”. उमेशकाका शेतकरी कुटुंबातले. शहरात आले असले तरी शेतीची आवड आणि अभ्यास होता. आहार, पोषण याबाबतही जागरूक. ”आता तुम्ही मिलेट शब्द ऐकला असेल. एकूण मिलेट किंवा भरड धान्यांच्या उत्पादनाच्या तुलनेत ६० टक्के वाटा ज्वारीचा. गहू , तांदूळ , मका , बार्ली यानंतर घेतलं जाणारं पाचव्या क्रमांकाचं पीक. अनेकांच्या आहारातला प्रमुख घटक असलेल्या ज्वारीत तांदुळाच्या तुलनेत प्रथिनांचं प्रमाण अधिक म्हणजे १०. ४ टक्के आहे.” काकांनी मग लहानमोठ्या सर्वांनाच ज्वारीची माहिती दिली.
ज्वारीला काही ठिकाणी शाळू, जोंधळा म्हणतात. इंगजीत Sorghum, Great millet म्हणतात.
१०० हून अधिक देशात उगवल्या जाणाऱ्या ज्वारीचं मूळ आफ्रिकेच्या ईशान्य भागात. तिथून साधारण ५०००-८००० वर्षांपूर्वी सगळीकडे पसरू लागली. आफ्रिकेत ज्वारीच्या पिवळी, लाल, केशरी, फिकट लाल अशा अनेक जंगली तसेच लागवड केलेल्या जाती आढळतात. अंदाजे ४५०० वर्षापासून भारतीय उपखंडात सगळीकडे ज्वारी लावली जाते.ज्वारी उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांक तर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. पावसाळी, हिवाळी, उन्हाळी असे तिचे तीन हंगाम. रब्बी म्हणजे हिवाळ्यातली ज्वारी दगडी, मालदांडी , बेंद्री, झिपरी अशी असंख्य नावाने ओळखली जाते. दगडी ज्वारीला असणारे दाणे कणसाला अगदी दगडासारखे चिकटलेले असतात म्हणून त्याला दगडी ज्वारी म्हणातत. काही ठिकाणी पक्ष्यांसाठी ती राखून ठेवतात. झिप्री ज्वारी ही एखाद्या केस विस्कटलेल्या मुलीसारखी दिसते म्हणून तिला झिप्री म्हणतात. ज्वारीच्या वाणानुसार ज्वारीच्या दाण्यात व रंगात फरक जाणवतो जसे की दगडी ज्वारी पांढऱ्या रंगाची असते. तर मालदांडी ज्वारी फिकट पिवळी.
ज्वारीला चिकण पोयटा जमिन सगळ्यात उत्तम. पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्याने एक पाऊस झाला की नुसत्या दवावर ज्वारी उगवते. कर्नाटकातील काही भागात ९०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर ज्वारीचे पीक घेतात. ३० सेमी – १०० सेमी वार्षिक पर्जन्यमान असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रात ज्वारीचे पीक होते. काही भागात खास प्रजाती नुसत्या जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरल्या जातात.
शरीराची चरबी कमी करण्यासाठी आणि पोषकता वाढवण्यासाठी ज्वारीची भाकरी खावी, परंतु मधुमेही व्यक्तींना फक्त हायब्रीड ज्वारी म्हणजे पावसाळ्यात घेतली जाणारी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात, कारण त्यात साखरेचं प्रमाण अगदी नगण्य. लाह्या करण्यासाठी वेगळी, पापड करण्यासाठीं वेगळी, भाकरीसाठी वेगळी , लाडूसाठी वेगळी अशा विविध प्रकारच्या ज्वारी सातपुडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी होतात.
आपल्या प्रत्येक सणात ज्वारी असतेच परंतु नागपंचमी दिवशी खास लाह्यांच्या ज्वारीच्या लाह्या केल्या जातात, असं सांगून काकांनी मग लाह्या करण्याची त्यांच्या आजीची पद्धत सांगितली.
साहित्य :
लाह्याची ज्वारी १ वाटी
कृती :
१. आदल्या दिवशी ज्वारी एक वाटीत बुडेल अशी भिजून ठेवायची.किंवा लाह्या करण्याअगोदर ज्वारी कोमट पाण्यात तासभर भिजून द्यायची
२.सुती कापडावर सुकेपर्यंत ज्वारी पसरून ठेवायची.
३.लोखंडी कढई तापवून मग त्यात ज्वारीचे दाणे घालायचे
४. सुती रुमालाचा गोल करून मग त्यात हळूहळू फिरवत जावे
५. हळूहळू सुती कपडा जसा फिरवू तसे त्यातून लाह्या निघण्यास सुरुवात होईल.
याशिवाय ज्वारीपासून दोसा इडली, शेव आणि कितीतरी चटपटीत पदार्थ होतात. ”पदार्थ ढीग असतील पण मुलांनी ते खाल्ले पाहिजेत ना”… आर्याची आई म्हणाली. ”आमचा छोटा तर काही खातच नाही.”
”वहिनी, मुलांना भूक लागत नसेल तर साव्याची अंबाली किंवा लापशी आठवड्यातून दोनदा दिली तर फरक पडतो. ” असं सांगून उमेशकाकांनी सावा या आणखी एका मिलेटविषयी माहिती दिली. चवीला गोडसर असल्यानं मुलांचे हे आवडते मिलेट. कुणाही व्यक्तीला आहारात मिलेटची सुरुवात करायची असेल तर हे मिलेट एक उत्तम सुरुवात होऊ शकते. ६४ ग्रॅम कार्बोदके, ९ ग्रॅम प्रथिने, 6 ग्रॅम तंतुमय पदार्थ. शरीर स्वच्छ ठेवण्याचं काम हे मिलेट करतं. आपल्या शरीरातले सगळे महत्त्वाचे अवयव जसे की यकृत , किडणी, हृदय, स्वादुपिंड यांना स्वच्छ ठेवण्यात आणि मधुमेह, मुतखडा वा इतर निगडित आजार लांब ठेवायला साहाय्य हे मिलेट करतं.
सावा किंवा शामूलचे इंग्रजी नाव बानयार्ड मिलेट. सगळ्यात जुने लहान मिलेट. Echinochloa frumentacea ही जात भारतीय सावा तर Echinochloa esculenta ही जात जपान सावा. याला जपानी मिलेटसुद्धा म्हणतात. भारतात प्रामुख्याने ओडिसा, महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार , पंजाब , गुजरात या राज्यात उत्पादन होतं. बदलते सामाजिक जीवन आणि शेती पद्धतीमुळे या मिलेट मध्ये असणाऱ्या उपजाती जवळ जवळ नष्ट झाल्या आहेत.
समशीतोष्ण युरेशियातून ४००० वर्षापूर्वी हे मिलेट भारतात आलं. खरीप हंगामातील पीक असून समुद्रसपाटीपासून २००० मीटर उंचीवर देखील हे मिलेट उगवते. पाणी कमी असणाऱ्या जमिनीतही हे येतं. खडकाळ जमिनीत मात्र ते तग धरू शकत नाही. जिथे आदिवासी शेतकरी वर्गाला अजून कोणतेही पीक घेणे शक्य नाही तिथे याची लागवड केली जाते. कणसाच्या सुंदर आकारामुळे पक्षी या पिकाकडे आकर्षित होतात. पक्ष्यांचे सगळ्यात आवडते खाद्य म्हणून विविध पक्षी शेतात येतात तसेच त्यांची विष्ठा शेतात पडते त्यामुळे माती सुधारण्यास प्रचंड मदत होते. साधारण ९० दिवसात कापणीला येणारे. साधारण ४०० किलो ते ६०० किलो बिया आणि १२०० किलो चारा प्रति हेक्टर उत्पादन मिळते. मग काकांनी बानयार्ड मिलेट हालबायची रेसिपी सांगितली.
बानयार्ड मिलेट हालबाय ( गोड दक्षिण भारतीय पदार्थ)
साहित्य : बानयार्ड मिलेट पीठ – १ कप गूळ – अर्धा कपएक पूर्ण किसलेला नारळ तूप ४ वेलची
कृती : १. प्रथम पिठात पाणी ओतून ताकाप्रमाणे पातळ करा
२. गॅस चालू करून मध्यम आचेवर हे मिश्रण ढवळत रहा
३. अंदाजे १० मिनिटानंतर मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होईल.
४. गुळात पाणी टाकून काकवीप्रमाणे पातळ करा.
५. पातळ केलेला गूळ वरील मिश्रणात सोडा
६. मग हळूहळू मिश्रण एकजीव होऊ पर्यंत ढवळत रहा
७. अंदाजे तीस मिनिट हे मिश्रण ढवळावे लागते.
८. हालबाय म्हणजे हलवा आणि बर्फी मधील प्रकार.
९. तयार झालेले मिश्रण एका ताटात ओतून देऊन बर्फीप्रमाणे सगळीकडे समप्रमाणात लावून घ्या.
१०. थोडे थंड झाल्यावर आवडीनुसार कापून खाण्यास तयार
वरई आणि राळा

कालच आजीची एकादशी होती. आजीने मस्त उपवासाची भगर अर्थात वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी करून खाल्ली, घरातल्यांनाही

राळा पिकासोबत शेतकरी आजी

खिलवली. पाचवीतल्या सईने थोडी नाखुशीनेच ती भगर खाल्ली. “काय गं आजी तुझ्या उपवासाला जरा चमचमीत साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी तरी करत जा की. हे काय किती बोअर खाणं- वरईचा भात म्हणे!!” आजी म्हणाली, “सईबाई, वेडाबाई भारतात पुरातन काळापासून उपवासाला चालणारी, पचनाला हलकी असणारी वरई साबुदाण्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. वरईत तुमचं लाडकं प्रोटीनही असतं बरं का, आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना पचायला साबुदाण्यापेक्षा भगर केव्हाही सहज-सुलभ. आणि तुला माहितीये का सई, तुझा लाडका साबुदाणा मूळचा भारतीय नाही हं तो परदेशीच, अवघ्या काही शतकांपूर्वी तो भारतात आला आणि चक्क उपवासाच्या पदार्थात मानाचं स्थान मिळवून बसला”

“एवढंच नाही तर वरईची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ऐकायची का सईबाईंना?” गोष्टीचं नाव ऐकताच सईचे डोळे चमकले, गोष्टीसोबत आता तो वरईचा भात सहज पोटात जाईल, खात्री होती तिला. “तर आपले श्री व्यंकटेश भगवान, त्यांच्या पत्नीच्या पद्मावतींच्या शोधात सात डोंगर या जागी गेले. देवी काही सहज सापडेना, भगवान धडपडले, त्यांच्या डोक्याला मोठा खडक लागला आणि ते बेशुद्ध पडले. ही खबर व्यंकटेशांची आई बकुळा देवींना समजताच त्यांनी व्यंकटेश बाळाला वरईची गोड- मधुर खीर करून खाऊ घातली आणि व्यंकटेश भगवानांची जखम त्यानं लवकर भरून आली. तुला सुद्धा करून घालेन हं ही ताकद देणारी खीर मी” आजीने गोष्ट पूर्ण करत आश्वासन दिले.
त्या सोबतच आजीने वरईची बरीच माहिती सांगितली- मराठीत वरई किंवा भगर, हिंदीत सामा किंवा कुटकी आणि इंग्रजीत ज्याला आपण लिटिल मिलेट म्हणून ओळखतो, हे मिलेट जखम भरून येण्यासाठी अगदी उपयुक्त आहे. आणि हे मिलेट भारताशी प्रदेशनिष्ठ (Endemic) आहे. भारतात इसवी सन पूर्व 2600 पूर्वी हडप्पा अणि फर्माणा संस्कृतीत लिटल मिलेट सापडले. यात खूप जाती नाहीएत, आणि जंगली जाती भारताच्या बाहेर सापडल्या आहेत. सध्या भारतात मध्यप्रदेश, उडीसा, झारखंड या राज्यात मोठ्या प्रमाणात वरईचे उत्पादन होते.
मिलेट्समध्ये आकाराने सगळ्यात लहान, थोड्या फार क्रीम रंगाची, याला आफ्रिकन मिलेट देखील म्हणातात. आफ्रिका खंडातील अनेक आदिवासी ही मिलेट मुख्य अन्न म्हणून वापरतात. भारतात सर्वप्रथम पूर्वघाट प्रदेशात ही मिलेट येऊन नंतर संपूर्ण भारतात पसरले गेले. लिटिल मिलेट श्रीलंका, नेपाळ, म्यानमार देशातील आदिवासीच्या आहारातील मुख्य स्त्रोत आहे.
प्रोसो मिलेट आणि तांदुळाप्रमाणे याचा दाणा असून या पिकाचे कणिस तुऱ्यासारखे दिसते. लिटिल मिलेटचा दाणा सगळ्या मिलेटच्या तुलनेत लहान असतो म्हणून याला लिटिल मिलेट नाव पडलंय. समुद्र सपाटीपासून 2000 मीटर उंच आणि 50-70 मिमी पाऊस असणाऱ्या भागात तसेच 20 डिग्री ते 50 डिग्री तापमानात देखील उगवू शकते. खडकाळ , पाणी असणारी, पाणी नसणारी जमीन अशा सगळ्या जमिनीत हे मिलेट उगवून येते.
प्रत्येक प्रकारानुसार उत्पादन बदलत जाते परंतु अंदाजे 20 ते 25 क्विंटल प्रती हेक्टर (अडीच एकर) उत्पादन मिळते.काही राज्यांमध्ये यांत उडीद- सोयाबीन हे मिश्रपीक तर काही ठिकाणी चवळी- घेवडा हे मिश्रपीक घेतले जाते. खरीप आणि रब्बी हंगामात पीक घेतले जाते. साधारण 70-90-120 दिवसात कापणीला येणाऱ्या जाती उपलब्ध आहेत.
वरईची पोषणमूल्ये : 62 ग्रॅम कार्बोदके, 8 ग्रॅम प्रोटीन , 9.8 ग्रॅम तंतुमय पदार्थ , 4.2 ग्रॅम चरबी.
आणि मग आजी म्हणाली “सई, त्याप्रमाणे महाराष्ट्रात राहणारे आपण सगळेजण जाणतोच की, उपवासाला आपण जी वरई खातो ती हीच मिलेट. प्रत्येक मिलेट आपल्या शरीराला ऊर्जा हळूहळू पुरवते म्हणूनच नुसत्या वरईवर आपल्याला संपूर्ण उपवास करता येतो. उत्तर भारतात याला ‘व्रत का चावल’ असेही म्हणतात. काही भागात उपवासाला वरईची भाकरी देखील बनवली जाते. आणि नवरात्रात उपवासाला हमखास वरई वापरली जाते. त्यामुळे ही वरई साबुदाण्यापेक्षा निश्चित गुणकारी आहे बरं का”
“ही मिलेट्सची गोष्ट इंटरेस्टिंग आहे आजी, अजून सांग ना माहिती” हातातली भगर आमटीची प्लेट चाटूनपुसून स्वच्छ करत सई म्हणाली. आजी पुढे बोलू लागली, “ऐक तर मग असंच आणखी एक प्राचीन भारतीय आणि जगातही इतरत्र काही देशांत उगवणारे मिलेट म्हणजे- फॉक्सटेल मिलेट. याला हिंदीत कांग, मराठीत राळा आणि संस्कृतमध्ये प्रियांगु, भावज्य, रजिका म्हणतात. जगातल्या मिलेट्समध्ये तिसऱ्या क्रमांकावरचे हे पिक. प्राचीन काळापासून टिकलेले कमी पावसाचे पीक युरोप, आशिया, आफ्रिका , ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन होते. याला इटालियन मिलेट तसेच जर्मन मिलेट सुद्धा म्हणतात.”
आजी पुढे सांगत होती- साधारण 6600 वर्षांपूर्वी चीनमध्ये ही मिलेट खायला सुरूवात झाली. 4000 वर्षांपूर्वीचं व्यवस्थित राखून ठेवलेल नूडल्सचं भांडं चीनमधल्या लाजिया येथे सापडले, ज्यात राळ्याचा अंश आहे. आपल्या भारतात साधारण हडप्पा संस्कृती अगोदर राळे सापडले आहे. तांदळाप्रमाणे याचा दाणा असून या पिकाची उंची 1 ते 5 फूट पर्यंत असू शकते. पिकाचा तुरा लांब गोलाकार असून कोल्ह्याच्या शेपटीप्रमाणे दिसतो म्हणूनच याला फॉक्सटेल (कोल्ह्याचे शेपूट) मिलेट म्हणतात. हे मिलेट हिरव्या, पिवळ्या, लाल अशा विविध रंगात आढळते.
2000 मीटर उंच आणि 50-70 मिमी पाऊस असणाऱ्या भागात तसेच 20 डिग्री ते 50 डिग्री तापमानात देखिल उगवू शकते. खडकाळ जमिनीतही उगवते. मात्र पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत हे मिलेट तग धरत नाही. चीनमध्ये काही ठिकाणी प्रती हेक्टर (अडीच एकर) क्षेत्रावर 11 हजार किलो इतके फॉक्सटेल मिलेट उगवते. 600 फूट उंचीवर तसेच काळया पोयटा मातीत पाणी कमी असेल त्यावेळी, ज्वारी सोबत मिश्रपीक म्हणून हे घेतले जाते. खरीप हंगामाचे पीक असून 70- 90 दिवसात हे पीक येते. साधारण 70 दिवसात कणिस येऊन 90 व्या दिवशी कापणीला येते.
पोषणमूल्य : 60.1 ग्रॅम कर्बोदके, 12.3 ग्रॅम प्रोटीन असल्याने शाकाहारींना कडधान्यांमधून मिळणाऱ्या प्रोटीनची चिंता करावी लागत नाही, तसेच यात 4.3 ग्रॅम चरबी असते.
“आणि या राळा उर्फ प्रियांगुची कथा ऐकायची आहे का सईला?” सईने मानेने होकार भरताच आजी सांगू लागली “या प्रियांगुबाबत मी पुराणात एक कथा वाचलीये. ऐक हं सई, विष्णूचे तिसरे अवतार वराहस्वामी, जेव्हा सलग दहा दिवस राक्षसांसोबत युद्ध करकरून दमले. त्यामुळे त्यांना श्वसनाला त्रासही होऊ लागला. तेव्हा त्यांचे शिष्य चिंतित झाले. त्यांच्या शिष्यांनी त्यांना काय हवंय? म्हणून विचारलं. तेव्हा वराहस्वामींनी ‘मला प्रियांगु हवंय’ म्हणजेच तुमच्या इंग्रजीत या फॉक्सटेल मिलेटची मागणी केली ”
“वॉव, कसलं भारी आज्जी!! किती जुनं आहे हे मिलेट. पण वराहस्वामींनी ती फॉक्सटेल मिलेट नुसतीच खाल्ली का?” आजी हसत म्हणाली, “नाही गं वेडाबाई त्याचे कितीतरी प्रकार करता येतात, पण वराहस्वामींना राळ्याची खीर देण्यात आली. त्याची रेसिपी मी सांगते. या पद्धतीने वरई आणि राळा दोन्हींचीही खीर बनवता येते.”
वरई/ राळ्याची खीर
साहित्य : वाटीभर राळा/ वरई, दूध, गूळ, तूप, स्वादासाठी वेलचीचे दाणे, चिमूटभर सोडा.
कृती :
वाटीभर राळा किंवा वरई पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून ठेवा. (राळा न भिजवताही करता येईल). सकाळी सगळं पाणी निथळून वरई किंवा राळा तुपात व्यवस्थित परतून घ्या.
मग त्यात दुध आणि पाणी टाकून चांगलं शिजवून घ्या. आणि दहा मिनिटानंतर त्यात चिमूटभर सोडा घालून गूळ टाकून चांगलं हलवून घ्यायचं. सगळ्यात शेवटी वेलची दाण्यांची पूड घालावी. तयार आहे आपली वरई किंवा राळ्याची खीर. या थंडीत मस्त तूप टाकून खाऊन बघा.
कोदो आणि ब्राऊन टॉप मिलेट
“आजी तू परवा बनवलेली वरईची खीर यम्मी होती, या मिलेटसच्या दुनियेविषयी मला अजिबातच काही माहीत नव्हतं बघ. सांग ना मला अजून या मिलेट्सविषयी” सई उत्सुकतेने आजीला विचारत होती. आपल्या आधुनिक आजीबाईंनी ऑनलाईन काही सामान मागविले होते, ते घेत- घेत त्या उत्तरल्या, “अरे वा, भगर न आवडणाऱ्या मुलीला आता मिलेट्स बद्दल जाणून घ्यायचंय तर? थांब तुला एक गंमत दाखवते. मला माहीत होतं, तुला मिलेट्स आवडणार ते म्हणून मी सरप्राईज मागवलंय तुझ्यासाठी. ” ‘सरप्राईज’ हा शब्द ऐकून सईचे डोळे विस्फारले.
असं म्हणत आजीने लालसर- करड्या रंगाची आणि लालसर पोपटी रंगाच्या धान्याची दोन पाकिटं सईसमोर ठेवली. “हे आहेत अनुक्रमे ‘कोदो आणि ब्राऊन टॉप मिलेटस’. तुला क्रमाक्रमाने यांची माहिती सांगते हं. हे पहिल्या पाकिटात जे लालसर करड्या रंगाचं आहे ना, ते कोदो मिलेट, हिंदीत कोद्रा आणि इंग्रजीत कोडो मिलेट म्हणतात याला. कठीण बी असलेला, रंगाने करडा, उगवायला जास्त दिवस घेणाऱ्या या मिलेटला हिमालयन मिलेटदेखील म्हणतात, कारण अर्थातच हिमालयाच्या आसपासच्या परिसरात याचे जास्त उत्पादन होते. कानडीत याला ‘आरगा’ म्हणतात. संस्कृतमध्ये ‘आरगा’ या शब्दाचा अर्थ सूर्य होतो. उन्हाळ्याच्या सुरूवातीला उन्हामुळे हिमालयातील बर्फ वितळून खाली असणारे कोदो मिलेट बी उगवून येत असे, म्हणून हिमालयातील पर्वतरांगा हिरव्या दिसू लागत. भारतात मध्य प्रदेश, छत्तीसगड व झारखंड भागात हे मिलेट आदिवासी शेतकऱ्यांचे मुख्य खाद्य आहे.
आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीय भागात हे मिलेट होत असे. साधारण 3000 वर्षांपूर्वी हे भारतात आले. छत्तीसगडमधील मल्हार नावाच्या गावात येथे 1000 वर्षांपूर्वीच्या या कोदो मिलेटचा काही भाग सापडला, परंतु 3000 वर्षापूर्वी हे भारतात कसे आले याचा काहीच सुगावा अद्याप लागलेला नाही.
कोदो मिलेट फिकट लालसर ते गडद करड्या रंगात आढळून येते. कणसाचा आकार सरळसोट उभा असून बिया गव्हाच्या लोंबीप्रमाणे एकमेकांना जोडत जातात. भारतातील ज्या भागात कमी दर्जाची माती आहे अशा भागात कोदो मिलेटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अगदी शून्य पाणी असलेले, खडकाळ जमीन असलेले जिथे इतर कोणतेही पीक घेता येणार नाही अशा जमिनीत हे आनंदाने येते. पाणी धरून न ठेवणारी जमीन यासाठी सगळ्यात उपयोगी. 40 मिमी – 50 मिमी पाऊस येणाऱ्या भागात देखील हे मिलेट उगवून येते. खरीप हंगामात जून ते जुलै महिन्यात पेरणी केली जाते, तर ऑक्टोबर पर्यंत पीक तयारही होते.
120 दिवसांत हे कोदो पीक कापणीला येते. कोदोच्या काही 90 दिवसात येणाऱ्या जाती आहेत परंतु त्याची फार लागवड केली जात नाही. 90 सेमी म्हणजेच तीन फूट उंच वाढणारे हे पीक जनावरांचा चारा म्हणून उत्तम आहे. मिश्र पिके म्हणून सोयाबीन, उडीद, मूग किंवा चवळी घेतली जाते.
पोषणमूल्य : 64 ग्रॅम कर्बोदके, 9 ग्रॅम प्रोटीन , 6 ग्रॅम तंतुमय पदार्थ
जंगली डुकरांना शेतापासून लांब करण्यासाठी हे मिलेट संरक्षक भिंत म्हणून लावता येते कारण या मिलेट पासून येणारा उग्र वास डुकरांना आवडत नाही. रंगाने थोडे काळपट व त्यातील मूलद्रव्ये पाण्यात विरघळणारी असल्याने धुताना हे मिलेट काळे पाणी सोडते . अनेकदा असा गैरसमज होतो की यात माती किंवा धूळ आहे, परंतु खरं तर हे आहे की जास्त धुतल्याने ह्या मिलेटमधील गुणधर्म नाहीसे होतात. आजी पुढे म्हणाली, “गुरूद्वारामध्ये दिल्या जाणाऱ्या लंगरच्या जेवणात देखील कोदो मिलेटसचा समावेश असतो हं.बरं या कोदो मिलेट्सची खिचडी मस्त होते हं सई. उद्या दुपारच्या जेवणासाठी करणार आहे मी. ही घे रेसिपी”
कोदो मिलेट खिचडी
पदार्थ :
कोदो मिलेट – 1 कप
मूग डाळ – अर्धा कप
मिरची, गाजर, फरसबी, चवळी इतर भाज्या आवडीनुसार
कढीपत्ता , जिरे , कांदा , लसूण , तेल, मीठ .
कृती :
एकदा पाण्याने स्वच्छ धुवून कोदो मिलेट रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
लोखंडी कढईत तेल तापवा आणि त्यात चिरलेला लसूण, कांदा, कढिपत्त्याची व्यवस्थित फोडणी द्या, नंतर भाज्या टाकून छान परतून घ्या. आता भिजवलेल्या कोदो मिलेटमधले पाणी निथळून कोदो आणि मूगडाळ या फोडणीत टाका. नीट परतून झालं की त्यात गरजेनुसार पाणी टाका.
मंद आचेवर कोदो मिलेट व्यवस्थित शिजू द्या. तयार झालेली खिचडी वेगळ्या भांड्यात काढून घ्या. गरमागरम कोदो मिलेटची खिचडी तूप टाकून खा.
“ व्वा आजी, म्हणजे या आरोग्यदायी मिलेटसचा आपण रोजच्या आहारात समावेश करू शकतो तर!! अगदी भात, खिचडी, खीर, धिरडं अश्या किती तरी रूपात!!“ सई उत्साहाने म्हणाली. “अगदी बरोबर बेटा, आता मी तुला अश्या एका मिलेटविषयी सांगणार आहे, ज्याची तर पोळी पण करता येते. तुझ्या आईनंच ती मला शिकविली आहे अगं, रेसिपी पण सांगणार पण सगळ्यात शेवटी. तर या मिलेटला मराठीत विशिष्ट शब्द नाही, हिंदीत हरी कांगनी किंवा छोटी कांगनी, तर इंग्रजीत ब्राऊन टॉप मिलेट असे म्हणतात. “
याचे उगमस्थान भारतच आहे परंतु तरीही एकूण भारतात सध्या फक्त आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात हरिकची लागवड केली जाते, तीदेखील कमी प्रमाणात. भारतातील अनेक भागात हे तण (गवत) म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे त्याला खुरपणी करण्याची गरज देखील लागत नाही. अमेरिकेतील फ्लोरिडा आणि अलाबामा येथे गवत आणि कुरणांसाठी दरवर्षी खूप कमी पैशात, सुमारे एक लाख एकरवर याची लागवड केली जाते, तर ब्राऊन टॉप मिलेटच्या बिया कबुतरांना खाद्य म्हणून दिल्या जातात.
इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूर्वी दक्षिण भारत आणि नैऋत्य भारतात ब्राऊन टॉप मिलेट सापडले, असे अभ्यासक सांगतात. पुढे ते डेक्कन पासून खाली दक्षिणेकडे पसरले आणि गुजरात मधून उत्तरेकडेही. उत्पादन क्षमता कमी असल्याने हळूहळू हे मिलेट मागे पडू लागले, मात्र तरीही इसवी सन सातव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात पैठण येथे ब्राऊन टॉप मिलेटचे उत्पादन होत असे, असे पुरावे मिळतात. 1915 मध्ये भारतातून अमेरिकेत याचा प्रसार झाला जिथे प्रामुख्याने कुरणांसाठी याचा वापर केला जातो.
ब्राऊन टॉप मिलेट फिकट हिरवे व थोडे पोपटी रंगाचे दाणे असून दाण्याचा वरील भाग हलका ब्राऊन असतो म्हणून याला ब्राऊन टॉप (वरचा भाग लाल असलेली मिलेट) म्हणतात. समुद्रसपाटीपासून 8000 फूट उंचीवर देखील हे मिलेट उगवते. सगळ्या प्रकारच्या मातीत हे आनंदाने उगवते मात्र कमी पाणी धरून ठेवणारी, तसेच ज्या भागात पाऊस कमी आहे अशा ठिकाणी हे मिलेट चांगले उगवत नाही. वालुकामय चिकणमाती मातीत हे चांगल्या प्रकारे उगते. ब्राऊन टॉप मिलेट जमिनीतील शिसे आणि झिंक गोळा करण्याचे काम करते म्हणून, माती व जमिनीची प्रत सुधारण्यासाठी ब्राऊन टॉप मिलेटच्या पिकाचा वापर केला जातो.
ब्राऊन टॉप मिलेटचे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या मिलेट मध्ये सर्वात कमी दिवसात हातात येणारे पीक. 60-80 दिवसात हे पीक कापणीला येते. 90 सेमी म्हणजेच 3 फूट उंच वाढणारे हे पीक जनावरांचा चारा म्हणून उत्तम आहे. मात्र इतर मिलेटच्या तुलनेत उत्पादन कमी असते म्हणून याची लागवड कमी प्रमाणात होते. गवत प्रकारात असल्याने याच्या बिया जिथे पडतील तिथे पुन्हा पुन्हा उगवून येतात. शेतातून बी पूर्ण नष्ट होण्यासाठी अक्षरश: काही वर्षे जावी लागतात.
पोषणमूल्ये : 64 ग्रॅम कर्बोदके, 9 ग्रॅम प्रोटीन, 6 ग्रॅम तंतुमय पदार्थ
“आता ऐक तुझ्या आईने सांगितलेली ब्राऊन टॉप मिलेटच्या चपातीची रेसिपी” आजी पुढे सांगू लागली.
ब्राऊन टॉप मिलेटची चपाती
यात असणाऱ्या प्रोटीनमुळे आपला मुख्य आहार असलेल्या चपातीसाठी उत्तम असे हे मिलेट आहे
साहित्य :
ब्राऊन टॉप मिलेटचे पीठ – 1 कप
उडीद डाळ पीठ – पाव कप
एक उकडलेला बटाटा
चवीनुसार मीठ आणि तेल
कृती :
दोन्ही पीठं एकत्र करून हळू हळू पाणी आणि थोडं तेल- चवीनुसार मीठ टाकून चपातीची कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यावं. याची छान चपाती बनावी असं वाटत असेल तर ही मळलेली कणिक किमान दोनेक तास तेल लावून छान भिजू द्यावी.दोन तासांनी या कणकेचे गोळे करून त्याची चपाती लाटता येतेय का चेक करावं. जर व्यवस्थित लाटता येत नसेल तर त्यात उकडलेला बटाटा टाकून पुन्हा कणीक मळून घ्या जेणेकरून पीठ मऊ होईल आणि चपाती लाटली जाईल.
ज्या लोकांना काही कारणांनी उडीद डाळ चालत नाही, ते‌ फक्त ब्राऊन टॉप मिलेटच्या पीठाची उकड (मोदकांसाठी तांदळाच्या पिठीची कशी उकड काढतो तशी) काढून, ती नीट मळून दोन तास भिजवून ठेवून मग चपात्या करू शकतात.
तुम्हीही करून पाहा मिलेट्सचे नव नवे पदार्थ!!
मिलेट्स खाऊया, आरोग्य न पर्यावरण जपूया !
”मीना, गरमागरम बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी खाऊन घे, आराम पडेल बघ. थंडीत कुणाला ताप आला, सर्दी झाली तर आपल्या शरीराला गरम ठेवणारी बाजरी सगळ्यात उत्तम. ” नुकतीच लग्न होऊन आलेली सून आजारी पडल्यानं माई तिच्या सेवेत गुंतल्या होत्या. तुझ्यासाठी बाजरीचे लाडू पण करू.”
”माई, लाडू बरेच ऐकले आहेत, पण बाजरीचे लाडू … ते कसे करतात? ” मीनानं विचारलं. माई सांगू लागल्या, ”प्रथम बाजरी रव्याप्रमाणे दळून घ्यायची. त्यानंतर लोखंडी कढईत हळूहळू हे बाजरीचे पीठ गरम करायचं. गरम करताना त्यात तूप घालणं गरजेचं. एक किलो पिठाला अर्धा किलो तूप आणि अर्धा किलो गूळ. पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात बारीक केलेला गूळ मिक्स करावा. लाडू खाताना घशाला चिकटू नये म्हणून त्यात तुपात तळलेला आणि बारीक केलेला अंदाजे दहा ग्रॅम खाण्याचा डिंक वापरावा. हे सगळे मिश्रण एकत्र करून लाडू वळून घ्यावे. असा लाडू कमीत कमी महिने दोन महिने आरामात टिकतो. शिवाय सकाळीसकाळी असा एक लाडू खाल्ल्यानंतर भूक भागते.”
”मीना तू नाचणीही सुरू कर”, माईंनी सल्ला दिला.
माईंनी मीनाला बाजरी आणि नाचणी खाण्याचा सल्ला का बरं दिला?
प्रथिनं, लोह,झिंक,फॉस्फरस,मॅग्नेशियम, ब जीवनसत्त्व असलेली बाजरी एकदम पौष्टिक. देशाच्या एकूण बाजरी उत्पादनापैकी महाराष्ट्र,राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा या राज्यात ९० टक्के बाजरी उगवली जाते. थोडी पांढरी, थोडी पिवळी, थोडी करडी, थोडी निळी अशा विविध रंगांनी नटलेली बाजरी अगदी मोत्यासारखी दिसते म्हणून त्याला इंग्रजीत पर्ल मिलेट असे म्हणतात. साधारण इसवी सन पूर्व ४००० मध्ये आफ्रिकेत सहारा वाळवंटाच्या पश्चिम भागतील सुदान येथे बाजरीची शेती केली जाऊ लागली. भारतात साधारण इसवी सन पूर्व १००० ते २५०० मध्ये उत्तर भारतात हडप्पा संस्कृती तसेच गंगेच्या खोऱ्यात बाजरी पिकवली जात असे. नंतर साधारण इसवी सन पूर्व १५०० च्या काळात ती दक्षिण भारतात पिकवली जाऊ लागली.
नाचणीही प्राचीन काळापासूनचचं धान्य. अगदी डोंगर माथ्यापासून ते हिमालयापर्यंत नाचणी उगवते. जिथे चांगला पाण्याचा निचरा होतो तिथे नाचणी चांगली उगवते. नुसत्या कर्नाटक राज्यात आपल्या देशातील ६० टक्के नाचणी होते. प्रथिने, कॅल्शियम, तंतुमय, पदार्थांनी भरपूर असलेली नाचणी स्त्रियांनी तर जरूर खावी. हाडांची समस्या, दातांची समस्या किंवा रक्ताची समस्या असेल तर नाचणी जरूर खावी. सगळीकडे मोठ्या प्रमाणात लहान मुलांना दिला जाणारा नाचणी सत्व हा एक प्रकार. सहा महिन्याच्या पुढील बाळाला आहार देताना नाचणी सत्व दिले जाते.
नाचणी सत्व बनवण्यासाठी प्रथम नाचणी स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुतली जाते. त्यानंतर तिला साधारण बारा तास पाण्यात भिजवून मोड आणले जातात. मोड आणताना नाचणीला सुती कपड्यांमध्ये बांधले जाते. मोड आलेले धान्य साधारण दोन-तीन तास वाळवले जाते. त्यानंतर एखाद्या भांड्यात हलकेसे गरम करून मग त्याचे पीठ केले जाते. असे पीठ लहान बाळ असो व प्रौढ व्यक्ती यांनी गुळातून खाल्ल्यास किंवा खीर बनवून खाल्ल्यास अतिशय उपयुक्त. त्याचप्रमाणे नाचणीचं आंबीलही बहुगुणी.
राळ्याची अर्थात फॉक्सटेल मिलेटची खीर

काही अभ्यासकांच्या मते आफ्रिकेतील टांझानिया पश्चिम भागात किंवा इथोपियाच्या उंच सखल भागात नाचणीचा उदय झाला तिथून ती इतिहास पूर्वकाळातच भारतात आली. नाचणीच्या जंगली जाती अजूनही काही ठिकाणी आफ्रिकेत सापडला जातात. कधीही कीड न लागणारे कोणत्याही पर्यावरणात तग धरून राहणारे असे बियाणे जवळजवळ दशकावर टिकून राहते.महाराष्ट्रात अनेक डोंगराळ भागात नाचणी पिकवली जाते. मुठी बंद असलेली मुटकी, शीत मुटकी, दिवाळीला निघणारी दिवाळी बेंद्री, कळसुबाईला येणारी जाबड अशा विविध स्थानिक जाती आहेत. मुठी बंद केलेली आणि मुठी ही बोटांची बनली जाते म्हणून या मिलेटला इंग्रजीत फिंगर मिलेट म्हणतात.

आजच्या बाजरी आणि नाचणीसोबत वेगवेगळ्या मिलेट्सची ओळख गेल्या काही भागांमध्ये आपण करून घेतली.
२६ हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या पुण्यातील आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर सांगतात, ”मिलेट्समध्ये आपल्याला ज्वारी, बाजरी, नाचणी माहीत आहेत पण राळं, सावा, कोदो ही अत्यंत उपयुक्त आणि प्रामुख्यानं महाराष्ट्र आणि आंध्र मध्ये घेतली जाणारी मिलेट्स फारशी परिचित नाहीत. आपण उपासाला खातो ती वरी किंवा भगर मिलेटच. पण सर्वसाधारण बाजारात असते ती पॉलिश्ड स्वरूपात असते. कुठलंही धान्य पॉलिश्ड स्वरूपात येतं तेव्हा साहजिकच त्याचे गुणधर्म कमी होतात. आम्ही पेशंट्सना अनपॉलिश्ड वरी खायला सांगतो. फायबरचं अधिक प्रमाण, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणं यामुळे रक्तात साखर रिलीज होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे शुगर कंट्रोलसाठी, औषधं कमी होण्यासाठी ती नक्कीच उपयुक्त आहेत. सर्वच मिलेट्स अत्यंत उपयुक्त असून ऍसिडिटीपासून अगदी कॅन्सर पेशंटपर्यंत सर्वांसाठी ती गुणकारी आहेत. अर्थात मिलेटसोबत बाकीचा आहार संतुलित असणं, दही/ डाळी, भाज्या योग्य प्रमाणात आहारात असणं, नियमित व्यायाम या गोष्टींचं काटेकोर पालन आवश्यक आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धान्यांसाठी रासायनिक कीटकनाशकं, खतं यांची गरज लागत नाही. त्यामुळे ती पर्यावरणपूरक आहेत. ”
मिलेट मॅन ऑफ इंडिया डॉ. खादर वली यांनीही मिलेट्ससोबत काही गाईडलाईन्स आखून दिल्या आहेत.
भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या भारतीय कदन्न (मिलेट्स)संशोधन परिषदेनंही मिलेट्समध्ये मधुमेह, कर्करोग, हायपरटेन्शन रोधी गुणधर्म असल्याचं म्हटलं आहे.
मिलेट्स पोषणासाठी, आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी कशी महत्त्वाची आहेत, ते आपण या मालिकेतून जाणून घेतलं. बहुतांश करून सेंद्रिय पद्धतीनं पिकवली जाणारी ही पौष्टिक तृणधान्य पशुपक्ष्यांसाठीही उपयोगाची आहेत. रोग आणि किडीची समस्या कमी असल्यानं, पाणी कमी लागत असल्यानं शेतकऱ्यांसाठी ही धान्य फायद्याची आहेत. तेव्हा मिलेट्स पिकवूया, खाऊया आणि आरोग्य न पर्यावरण जपूया !
– संतोष बोबडे

Leave a Reply