पक्ष्यांचा ‘आपला माणूस’

पिंपळगाव बसवंत येथील मुंबई आग्रा महामार्गावरील जुना आग्रा रोडवर मोजकीच चारपाच वडाची झाडे खाजगी जागेत असल्याने वाचली. काही वर्षापूर्वी महामार्ग चौपदरीकरणात शेकडो वर्षांचे साक्षीदार असलेली बरेचशी वडाची झाडे आता काळाच्या आड गेली. या चार पाच झाडावर सध्या शेकडो पक्षी गुण्यागोविंदाने नांदत आहे. या ठिकाणचा रखवालदार अशाच पक्ष्यांचा व मुक्या प्राण्याचा पालनहार बनला आहे. नैसर्गिक पर्यावरण संरक्षणाचे काम त्याने स्वखुशीने हाती घेतलं असून कितीतरी प्राणी पक्षी आता त्याला आपलं माणूस म्हणून ओळखू लागले आहेत. निर्भयपणे पक्षी त्याच्या आसपास वावरतात. पक्ष्यांचा ‘आपला माणूस’ असलेल्या रखवालदाराचं नाव आहे, गुलत्यान सिंग.


पंजाबमधील सियापूर जिल्ह्यातील खड्डा या गावचे रहिवासी असणारे ४५ वर्षीय गुलत्यान सिंग गाडी ड्रायव्हर म्हणून काम करायचे. मुंबई आग्रा महामार्गावर त्याची गाडी नियमित चालत असे. आठ वर्षां पूर्वी गाडी भरून चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील एका कंपनीत माल खाली करण्यासाठी आले तेव्हा एकदा मुक्काम करावा लागला. रात्री आठच्या सुमारास महामार्गावरील एका हॉटेलवर जेवण करून रस्त्याच्या कडेने जात असताना अज्ञान वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या साथीदाराचा जागेवरच मृत्यू झाला तर गुलत्यान सिंग यांच्या उजवा पाय दुखावला. पोलीसांनी बेशुद्ध अवस्थेत पिंपळगाव बसवंत येथील खाजगी दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. पिंपळगाव बसवंत येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक निंबा सिंग यांनी ऑपरेशनचा खर्च उचलत त्या सहा महिन्यात त्यांना जणू जीवदानच दिले. ते हळूहळू चालायला लागले. या काळात त्याच्या पत्नीचेही आजाराने निधन झालं. मूलबाळ नसल्याने आणि आता अपघाताने पाय जायबंदी झाल्याने त्यांच्या कामावर मर्यादा आल्या. ते थोडे अंतर चालू शकतात पण ट्रक चालवू शकत नाही. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मलकित सिंग सिधु व बिंदा सिंग यांनी पिंपळगाव बसवंत येथील एका वडाच्या झाडाखाली त्यांना छोटीसी पत्र्याची रूम बांधून दिली. त्यांनी त्याला ‘तू याच ठिकाण राहून ट्रकची राखण करायची, असं सांगण्यात आलं. ट्रान्सपोर्ट युनियनने त्याला महिना दहा हजार पगारही सुरू केला.


गुलत्यान सिंग मूळातच प्राणीपक्षीप्रेमी. त्यामुळे लवकरच आजूबाजूच्या झाडांवरच्या पक्ष्यांसाठी काही करावं असं त्याला वाटून लागलं. त्याने पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली. दिवसभर पक्षी निर्भयपणे येऊन पाणी पिऊ लागले तर रात्रीच्या वेळी राखणदारी करताना त्यांची कुत्र्यांशीही दोस्ती झाली. हळूहळू त्यांना पशु पक्ष्यांचा लळा लागला. सकाळी उठल्यावर ते पक्ष्यांना काहीबाही खायलाही टाकू लागले. इथं खायला मिळतं हे कळताच सकाळी सकाळी २००/३०० पक्ष्यांची हजेरी लागू लागली. गेल्या आठ वर्षांपासून या पशु पक्ष्यांना खायला प्यायला देणे हा आता गुलत्यान सिंग यांचा दिनक्रम बनला आहे.
गुलत्याने सिंगचं काम पाहून शंभु यादव हा मित्रही मदत करायला लागला. पशु पक्ष्यांना केवळ खायलाच देऊन ते थांबले नाही तर अनेक कुत्र्यांवर औषध उपचार करून त्यांना खरजेपासून मुक्त केलं. यासाठी ते रोज जवळपास दोनशे ते अडीचशे रूपये खर्च हा करीत असून, ‘आपण एकटेच आहोत, आता हे सारे पशु पक्षी, प्राणीच माझे नातेवाईक असल्याने मी हे सारे करतो’ असं ते अभिमानाने सांगतात. आपल्याला आयुष्यात फार मोठे जीवदान मिळाले आहे. सर्व नाते संबंध दूर गेल्याने हे सारे मुके जीव माझे आप्त बनले आहेत. मी जिवंत असे पर्यंत जमेल तशी यांची सेवा करणार असे ते निर्धाराने सांगतात.

– भाग्यश्री मुळे, पिंपळगाव बसवंत, नाशिक.

Leave a Reply