१२ चाकी ट्रक आणि १८ चाकी ट्रेलर चालवत संसाराचा गाडा हाकतेय हरप्रीत

”एक बाई ट्रकच्या केबिनमध्ये बसली आहे,याचं लोकांना फार आश्चर्य वाटायचं. कुणी नावं ठेवायचचं तर कोणी कौतुक.”हरप्रीत बाजवा सांगत होत्या.
हरप्रीत यांचं, माहेर नाशिक जिल्ह्यातील चांदवडचं तर सासर पंजाबचं. त्यांचे पती निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत इथं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होते. त्यांना २०११ मध्ये कर्करोग होऊन वर्षभराने मृत्यू झाला. तीन मुलांची सगळी जबाबदारी आता एकट्या हरप्रीतवर होती. पाचपैकी दोन ट्रक कर्ज दिलेल्या वित्तीय संस्थेने उचलून नेले. हरप्रीतजींनी जवळच्याच नातेवाईकाला व्यवसायाकडे लक्ष द्यायला सांगितले. पण तो फसवणूक करू लागला.
हरप्रीतना दुचाकी, चारचाकी गाडी चालवता येत होती पण ट्रक, ट्रेलरसारखी अवजड वाहनं कधी हाताळली नव्हती. पण आता पर्याय नव्हता.


मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या आईनं घेतली. तीन ट्रक असल्यानं माणसं नेमली. सुरवातीला राज्याबाहेरचे प्रवास केले मात्र धाकटा मुलगा १८ महिन्यांचाच. त्याला सोडून जास्त दिवस बाहेर राहणं त्यांच्यातल्या आईला पटेना. त्यामुळे काही काळ बाहेरच्या ट्रिप नेमलेली माणसं तर मुंबईपर्यंतच्या ट्रीप हरप्रीत करायच्या. सोबत एक ड्रायवर कम मदतनीस.
एकेका ट्रीपला कधी तीन दिवस तर कधी पाच दिवस लागायचे. वाटेत कधी स्वयंपाक करायचा तर कधी धाब्यावर मिळेल ते खायचं. हरप्रीतजींनी ट्रक ट्रेलरनं महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशमध्येही प्रवास केला. काही जण आपुलकीनं चहा-जेवण विचारायचे. ठिकठिकाणच्या आरटीओनी त्यांना खूप मदत केली. पण सुरवातीला नावं ठेवणारेच अधिक.
सासरी पंजाबला घरदार, शेतीवाडी सारे काही आहे. पण सून ट्रक चालवते ही गोष्ट त्यांना मान्य नाही. सासरच्यांनी सुनेशी संबंध तोडून टाकले. कठीण काळात आईची आणि माहेरच्यांची साथ मात्र हरप्रीतना लाभली. त्यांची आई कविता कटारिया चांदवडच्या उपसरपंच होत्या. हरप्रीत यांच्या मोठ्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं असून तो आता व्यवसायात लक्ष घालतो.
हरप्रीतजींना यापुढे एकट्या पडलेल्या महिलांना वाहनं चालवायला शिकवायचं आहे. व्यवसायाचं गणित शिकवायचं आहे. या क्षेत्रात त्यांना स्वावलंबी करायचं आहे. हे काम सध्या प्राथमिक टप्प्यातच आहे लवकरच ते विस्तारण्याचा हरप्रीत यांचा निर्धार आहे.
– भाग्यश्री मुळे, ता. निफाड, जि. नाशिक

Leave a Reply