‘यश’ आणि ‘आनंदग्राम’च्या साथीने कठीणकाळ झाला सुकर

“मी एड्स पॉझिटिव्ह. एड्स झाला तेव्हा खरंतर पायाखालची जमीनच सरकली होती. पण पत्नी आणि मुलांकडे पाहून स्वतःला सावरलं. औषधोपचार करून स्वतःला बरं करायचं हा निश्चय केला. पहिल्या लॉकडाऊन नंतर काही दिवसांनी कंपनीने कामगार कपात केली. त्यात दुर्दैवाने माझा नंबर लागला. आता कसं होणार याची चिंता सतावत होती. आवड म्हणून ज्योतिषचा अभ्यास केला होता, परीक्षा दिल्या होत्या. ते शिक्षण या काळात कामी आलं. लोकांच्या पत्रिका पाहून त्यांना मार्गदर्शन करू लागलो. जगण्यासाठी दोन पैसे मिळू लागले. या काळात यश फाऊंडेशनने किराणा सामान, जीवनावश्यक वस्तू, करोना प्रतिबंधक साहित्य घरपोच आणून दिलं. पहिल्या-दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी मदत केली. त्यामुळेच खूप दिलासा मिळाला. आता करोनाचा प्रकोप थोडा ओसरला आहे. मला दुसर्‍या कंपनीत नोकरीही लागली आहे.  नियमित व्यायाम, पथ्य पाळणे, वेळेवर औषधे घेणे या गोष्टी सांभाळत असल्याने तब्येतही चांगली आहे,” अरुण (बदललेले नाव) सांगत होते.

“मी धुणीभांडी करून घर चालवते. नवरा ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याला एड्स झाला आहे. नियमित औषधं घेत असल्याने आता तब्येत बरी आहे. करोनाच्या दोन्ही लाटा आम्हाला फार त्रासदायक गेल्या. दोघेही घरी असल्याने मुलांना काय खाऊ घालायचं, घर कसं चालवायचं हा प्रश्न होता. पण यश फाउंडेशनकडून किरणासामान  व इतर वस्तू घरपोच मिळाल्याने खूप मदत झाली,” कुमुद (बदललेले नाव) सांगत होत्या. त्या नाशिकच्या कामगार नगरमध्ये राहतात. करोनाकाळात मिळालेल्या मदतीमुळे खूप मोठी चिंता दूर झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.

यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले, “कारोनाकाळात इतर सर्वसामान्य लोकांपेक्षा एड्स बाधितांना संसर्गाची शक्यता जास्त असते. हेच आम्ही लक्षात घेतलं. त्यानुसार त्यांना काही मदत करायची तर ती घरपोच करायची हा निर्णय घेतला आणि कामाला लागलो. आमच्याकडे पत्ते व फोन नंबर होतेच. आमच्या कामाचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात आल्याने पोलिस यंत्रणाही आम्हाला सहकार्य करत होती.” एड्स बाधितांना गरजेच्या काळात मदत करू शकलो याचं खूप समाधान वाटत असल्याचं पाटील यांनी नमूद केलं. यश फाउंडेशनच्या तत्परतेमुळे शेकडो एचआयव्ही बाधितांना कठीण काळात दिलासा मिळाला.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पूर्ण लॉकडाऊन असताना आणि सारेच व्यवहार ठप्प असताना  एड्स बाधितांना मिळालेली मदत महत्त्वपूर्ण ठरली. यासाठी राज्यभर विविध संस्था काम करत होत्या. एड्स बाधितांना वेळेवर औषधोपचार, पुरेसा आहार मिळणं गरजेचं असल्याने त्यावर भर देत असतानाच किरणासामान, जीवनावश्यक वस्तू, सॅनिटायझर, मास्क अशा करोना प्रतिबंधक वस्तू व इतर आवश्यक गोष्टी त्यांना घरपोच देण्यात आल्या. या सेवांमुळे  करोनाचा खडतर  कालखंड त्यांना सुलभतेने पार करता आला. नाशिक येथील यश फाऊंडेशन आणि बीड येथील आनंदग्राम इंफंट इंडिया यांच्या कार्याची दखल म्हणूनच जागतिक एड्स दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घेतली पाहिजे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड संचलित यश फाऊंडेशनद्वारे एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्ती  व  बालकांना वेळोवेळी मदतीचा  हात देण्यात आला. ताळेबंदीचा  फटका,  कामगार वर्ग, रोजंदारीवर काम करणारे मजूर, हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर सर्वाधिक झालेला दिसून आला.  या  सर्व  परिस्थितीत एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्ती व बालकांवर उपासमारीची वेळ येऊ  नये आणि  त्यांचं  आरोग्य सांभाळलं जावं, कोरोनाचा संसर्गापासून बचाव व्हावा हा उद्देश ठेवून  महिंद्रा आणि  महिंद्रा लि. व यश फौंडेशन यांच्या संयुक्तपणे नाशिक शहर तसंच मालेगाव येथील एचआयव्ही  बाधितांना  तांदूळ, गहू, नागली, डाळ, कडधान्य – मूग, मटकी, चवळी, चणे, वाटाणा, सोयाबीन, शेंगदाणे, गूळ, तेल, साबण, मास्क, सॅटिटायझर, हॅन्ड वॉश आदी गोष्टी देण्यात आल्या.

कोरोनापासून  बचाव करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी या विषयावर १५४ जणांना फोनवरून माहिती देण्यात आली.  तसेच टाळेबंदी  काळात  वाहतूक  सेवा  बंद  असल्याकारणाने एचआयव्ही बाधित  व्यक्ती  आणि  बालकांना  सिव्हिल  हॉस्पिटल  ला  जाऊन  एआरटी  औषध आणण्यास  अडचणी  येत होत्या. अशा  परिस्थितीत  त्यांना  एआरटीचे सातत्य राखण्यासाठी यश फॉऊंडेशनच्या  स्वयंसेवकांनी औषधे घरपोच दिली.

नाशिकसारखंच काम पार पडलं ते बीडमध्ये. बीड शहराजवळील पाली घाटातील डोंगर माथ्यावर ‘आनंदग्राम इन्फंट इंडिया’ ही संस्था कार्यरत आहे. याठिकाणी संपूर्ण राज्यभरातून एचआयव्हीसह जगणारी निराधार, अनाथ व उपेक्षित बालकं असून त्यांना या ठिकाणी निवास व्यवस्था, अन्न, औषधं पुरवली जातात. त्यासोबत कौशल्य विकासाचे धडे दिले जातात. दत्ता व संध्या बारगजे हे दांपत्य मागील १५ वर्षांपासून हे काम करत आहेत. करोनाकाळात या संस्थेला अस्तित्वासाठी मोठा झगडा द्यावा लागला. एकाचवेळी अनेक पातळ्यांवर तोंड द्यावं लागले. एचआयव्ही बाधितांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक होता. कोरोनाचा काळ त्यांच्यासाठी थोडा कठीण गेला. शासकीय अनुदान नाही, त्यात लाॅकडाऊनमुळे भेटी द्यायला, डोनेशन द्यायला लोक येऊ शकत नव्हते. एरवी वाढदिवस, स्मृतिदिन किंवा इतर निमित्ताने लोक तिथं जाऊन वस्तू, साहित्य किंवा आर्थिक स्वरूपात मदत कर असतात. लाॅकडाऊन काळात हे बंद होतं. पण, जिल्ह्यात काही सामाजिक संस्था ज्यांनी लाॅकडाऊन काळात गरजूंना किराणा, धान्य वाटप केले त्यांनी या प्रकल्पाला मदत केली. यामुळे थोडा आधार मिळाला. काही संस्था, संघटना यांनी सामाजिक भान जपत मदतीचा हात पुढे केला. एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांना इन्फंट इंडियाने आधार दिला. सध्या  ७० बालके या संस्थेत असून त्यांना उत्तम आहार, निवास, नियमित औषधोपचार, संस्थेकडून पुरवण्यात येत आहे. यासाठी संस्थेला कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान नसून केवळ लोकसहभागावर हे सेवा कार्य सुरू आहे. प्रकाश आमटे यांच्या कामाची प्रेरणा घेत दत्ता बारगजे यांनी आपली प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून असलेली सरकारी रुग्णालयातील उत्तम पगाराची नोकरी सोडून हे व्रत घेतलं आहे. त्यांच्या पत्नी प्रा. संध्या बारगजे याही त्यांना सक्षमपणे साथ देत आहेत. एचआयव्ही बाधितांचं लग्न लावून देण्यात, त्यांना कौशल्य प्रशिक्षण देत, शिक्षण देत, स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करत आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करत आहेत. करोनाकाळात त्यांनी थोडे हाल सोसून आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवले.

  • भाग्यश्री मुळे, अमोल मुळे.

Leave a Reply