हिंदू मुस्लिम सौहार्दाचे लक्ष्मीपूजन
कोविडच्या लाटेमागे लाटा, त्यातून येणारी भयाण अस्वस्थता यात आपल्या सर्वांची मागची दोन वर्षं गेली. विज्ञानाच्या कृपेने यंदाच्या वर्षावर मात्र कोरोनाचे सावट नाही. त्यामुळेच यंदाच्या वर्षी सर्वच सण- उत्सव अगदी धूमधडाक्यात आणि मोठ्या आनंदात साजरे केले जातायत. त्यातही दिवाळी हा हिंदूंचा वर्षभरातील मोठा सण म्हणण्यापेक्षा, आपण दिवाळीला भारतीयांचा सर्वात मोठ्ठा सण म्हणतो. हाच भारतीयत्वाचा नारा जोपासत पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या मेहबूबभाई पानसरे आणि कुटुंबियांनी यंदाही लक्ष्मीपूजन भक्तीभावाने साजरं केलं.
मेहबूब पानसरे कुटुंबियांचे लक्ष्मीपूजन
जेजुरीचे पानसरे हे मुस्लिम कुटुंब. मेहबूबभाई पानसरे हे जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तर त्यांच्या पत्नी अमिना पानसरे या गेल्या अडीच वर्षांपासूनच्या विद्यमान नगरसेविका. बावीस सदस्यांचे यांचे हे कुटुंब आजही एकत्र कुटुंबपद्धती पाळत एका छताखाली राहतंय. जेजुरीच्या खंडेरायाचे पानसरे हे पिढीजात मानकरी आहेत. त्यांचे पानसरे हे आडनावसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. पानसरेंचे आडनाव खरं तर शेख होते, मात्र खंडोबा देवस्थानात या कुटुंबाला पान सुपारीचा मान मिळाल्याने त्यांचे पानसरे हे आडनाव पडले. हे आडनाव त्यांना त्यांच्या पूर्वजांपासून मिळालेले आहे, तसा ताम्रपत्रात सुद्धा उल्लेख आहे.
मेहबूब पानसरे यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते. हे संपूर्ण कुटुंब खंडोबा देवस्थानाचे मानकरी आहेत. पानसरे कुटुंबाकडून खंडेरायाला मानाचा अश्व वाहिला जातो. मेहबूबभाईंचे पूर्वज देवीची घटस्थापना सुद्धा करायचे. नवरात्राची परंपरा आजही या घरात अखंडितपणे सुरु आहे. मेहबूब पानसरे हे उद्योग व्यवसायात उतरल्यानंतर, त्यांचे किराणा दुकान- रूबिना प्रोव्हिजन स्टोअर्स, सुरू झाल्यानंतर त्यांनी दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाची परंपरा सुरू केली, त्यालाही आता वीस वर्षं होऊन गेली. त्यांच्या दुकानातील लक्ष्मीपूजनाला खंडोबा देवस्थानचे काही मानकरी आवर्जून हजर असतात. जेजुरीच्या खंडोबा देवस्थानाचे माजी ट्रस्टी डॉ. प्रसाद खंडागळे दरवर्षी पानसरे कुटुंबियांच्या लक्ष्मीपूजनाचे पौरोहित्य करतात.
एवढंच नाही तर यावर्षी बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आली होती तेव्हा ” जेजुरीतील मुस्लिम बांधव आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी कापणार नाहीत” असे निवेदन मेहबूब भाईंनी जेजुरी पोलिस ठाण्यात दिले होते. राज्यभरातून त्यांच्या या निर्णयाला समर्थन देणारे आणि कौतुक करणारे अनेक कॉल मेसेजेस त्यांना आले. त्यांच्या निर्णयाचा आदर करीत महाराष्ट्रातील बहुतांश मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी बळी देणं टाळत, सामाजिक सौहार्दाचा एक कौतुकास्पद पायंडा पाडला.
कोरोनाकाळात अमिनाताई आणि मेहबूबभाईंंनी जेजुरीत आयोजित केलेले रक्तदान शिबिर
धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेची परंपरा जोपासणारे हे पानसरे कुटुंब सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. कोरोनाकाळात जेव्हा रक्ताची प्रचंड टंचाई होती तेव्हा अमिनाताई आणि मेहबूबभाईंनी जेजुरीत रक्तदान शिबिर आयोजित करून त्या अवघड काळात शंभरेक बाटल्या रक्त जमवले. त्या काळात अम्ब्युलन्सची टंचाई असताना या परिवाराने स्वत:च्या गाड्या अम्ब्युलन्स म्हणून दिल्या. कोरोनाच्या पहिल्याच लाटेत स्वत: मेहबूबभाई आणि त्यांचा मुलगा कोरोनाग्रस्त झाले होते , पण सुदैवाने ते पूर्ण बरे होऊन परतले. पण असे होऊनही त्यांनी मदतकार्य थांबवले नव्हते. त्यांच्या किराणा दुकानातून शेकडो गरजू कुटुंबियांना मोफत किराणा कीट वाटप केलं गेलं. कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या आणि नातेवाईक घेऊन जात नसलेल्या कित्येकांचे अंत्यसंस्कार पीपीई कीट घालून स्वत: मेहबूबभाई आणि परिवाराने केले आहेत आणि हे करताना त्यांनी कुणाचीच जात-पात पाहिली नाही.
आज धर्मा- धर्मातली आणि जातीपातीतली तेढ वाढत असताना जेजुरी शहरात मात्र अठरापगड जाती आणि धर्म अगदी सौहार्दाने कायमच एकमेकांसोबत नांदत आहेत, हे मेहबूबभाई समाधानाने सांगतात. माणसाचा जात- धर्म बाजूला ठेवून माणूस म्हणून एकमेकांशी वागणे आणि सर्व सणांचा आनंद घेत कसलीही कटुता न बाळगता भारतीय म्हणून जगणे, खरोखरच कौतुकास्पद आहे.
लेखन- नीता सोनवणे, जेजुरी

Leave a Reply