कोविड साथीने जगातील प्रत्येकाला काहीना काही शिकवलं. अनेकांनी कलेला चांगला वाव दिला. तर काहींनी आपले छंद जोपासले, वाढवले. रत्नागिरी तालुक्यातील भोके येथील केतन शिंदे या अकरावीतील विद्यार्थ्यांने आकर्षक, सुबक, देखणे आकाश कंदील तयार करून त्याची विक्री सुरु केली. दिवाळीपूर्वीच केतनकडे कंदिलासाठी बुकिंग सुरु होते.
रत्नागिरी तालुक्यातील भोके या गावात राहणारा केतन शिंदे. हातखंबा येथील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी शिक्षण घेतो. केतन पूर्वी त्याच्या मामेभावाला आकाश कंदील तयार करण्यासाठी मदत करत होता. त्यातूनच त्याला आकाश कंदील तयार करण्याचा छंद लागला. स्वतः कलाकार असलेला केतन संगमेश्वरी बाज कार्यक्रमात उत्कृष्ट कला सादर करतो. परंतु कोरोनामुळे सर्वच प्रयोग बंद होते. शाळाही बंद. तरी घरी रिकामं न बसता केतनने आपला छंद जोपासला आणि त्यातून आपल्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.
बाजारात मिळतात त्यापेक्षाही वेगळे सुंदर व देखणे आकाश कंदील तो आपली बहिण रिद्धी आई सोनिका, वडील सचिन यांच्या मदतीने तयार करतो. गणेशोत्सवापूर्वीच कंदील साकारण्याचा कामाला सुरुवात होते. बांबू आणून त्याच्या काठ्या तयार करण्यापासून तो कामाला सुरुवात करतो. दिवाळीपूर्वी त्यांचे जवळजवळ शंभर कंदील तयार होतात. आज केतनच्या आकाश कंदीलांना रत्नागिरी, देवरुख, सोमेश्वरसह मुंबईमध्ये ही मोठी मागणी आहे. सुनील बेंडखळे, मंगेश मोरे, योगेश बांडागळे यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे केतन सांगतो.
आकाश कंदिलाच्या विक्रीतून मिळणारा मोबदला तो स्वतःसह बहिणीच्या शिक्षणासाठी खर्च करतो. केतन आजच्या तरुण पिढी समोर छंदातून शिक्षणाचा खर्च उचलण्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
– प्रतिनिधी, रत्नागिरी
Related