हॉकीचं ग्राऊंड गाजवणारी भावना
हिंगोली जिल्ह्यातलं छोटंसं गाव, सेनगाव. इथं राहणारी भावना सतिशराव खाडे. भावनाला लहानपणापासून खेळाची आवड. हे लक्षात आलं तिच्या आजी सरोजिनीताई खाडे यांच्या. त्यांनी तिला क्रीडा क्षेत्रात पाठवायचं ठरवलं. भावनाने पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीची परीक्षा सहजच उत्तीर्ण केली.
पाचवीपासून भावना क्रीडा प्रबोधिनीमध्ये तिच्या प्रशिक्षक आरती हाळगळी यांच्याकडे खेळ शिकत होती. भावनाला इतर खेळांपेक्षा हॉकीमध्ये अधिक रस असल्याने तिला हॉकीचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. तिचा खेळातला उत्साह आणि तिच्या मेहनतीमुळे १४ वर्ष वयोगटाखालील राज्य महिला हॉकी संघात भावनाची निवड झाली. या काळात तिने सुरेख कामगिरी करीत संघात आपलं स्थान पक्क केलं. कोल्हापूर इथं २०१३ साली पार पडलेल्या १७ वर्ष वयोगटाखालील जवाहरलाल नेहरू चॅम्पियनशिपसाठी तिची कर्णधार म्हणून पहिल्यांदा निवड झाली. त्यावेळी भावनाच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघाला ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावं लागलं. २०१४ साली हीच चॅम्पियनशिप मुंबई इथं पार पडली, यावेळी भावनाच्या नेतृत्वात हॉकी संघाने गोल्ड मेडल मिळवलं. २०१६ साली जळगावात भावना महाराष्ट्र राज्य महिला चॅम्पियनशिप खेळली. ज्यामध्ये तिच्या विशेष कामगिरी बद्दल तिला बेस्ट डिफेण्डर ऑफ द टुर्नामेंट हे अवार्ड मिळालं तर संघाने गोल्ड मेडल पटकावलं. २०१७ साली भावनाची राष्ट्रीय क्रीडा महिला संघात निवड झाली, या संघात महाराष्ट्राच्या केवळ ३ मुली होत्या. आता अजित लाकरा या नव्या प्रशिक्षकाचं मार्गदर्शन तिला मिळालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७ साली सेकंड हॉकी इंडिया फाईव्ह ए साईड सिनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भावना पहिल्यांदा खेळली. इथं तिच्या संघाने सिल्व्हर मेडल मिळवलं. ऑल इंडिया युनिव्हर्सिटीकडून ती अनेक सामने खेळली, त्यात तिच्या संघाने अनुक्रमे चवथा,तिसरा,दुसरा असे क्रमांक पटकावले. २०१८ साली भावनाची आंतरराष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या कोअर ६० खेळाडूंच्या गटात निवड झाली. यापैकी ३३ खेळाडू निवडले जाणार होते. पण एका आजारपणामुळे तिला या संघातून घरी परतावं लागलं. त्यानंतर कोरोनामुळे खेळ बंद राहिले. ती गावी होती, त्यावेळी कोरोनाने तिच्या कुटुंबाला गाठलं, यात आजोबा कुंडलीकराव खाडे आणि काका विलासराव खाडे यांच निधन झालं. जीवापाड प्रेम करणारे कुटुंबीय गमावल्याची सल मनात ठेवून तिने तिचं लक्ष पुन्हा खेळावर केंद्रित केलं.
सध्या आरती मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर विद्यापीठात एमपीएडचं शिक्षण घेतेय. तिथंच सराव करते आहे. भावनाने तिचं चवथीपर्यंतचं शिक्षण सेनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केलं आहे. पाचवी ते बारावीचं शिक्षण क्रीडा प्रबोधिनी मधून घेतलं. बारावी नंतर तिने पुणे येथील मॉर्डन कॉलेजमधून बीकॉमची डिग्री मिळवली आहे.
भावनाने आतापर्यंत २३ राष्ट्रीय तर २५ राज्यस्तरीय सामने खेळले आहेत. त्यातील १५ सामन्यांसाठी ती कर्णधार होती, या काळात तिने ९ मेडल्स मिळवली आहेत. भावनाला तिची आजी सरोजिनी खाडे यांनी बघितलेलं हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवायचं स्वप्न तिला पूर्ण करायचंय. आंतरराष्ट्रीय महिला हॉकी संघात महाराष्ट्रातील एकही मुलगी नाही आहे. महाराष्ट्राची कन्या म्हणून तिला आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा खेळून जिंकायच्या आहेत. यासाठी ती हवी तेवढी मेहनत घ्यायला तयार असल्याचं ती सांगायला विसरत नाही. संधी मिळाली तर मुली संधीचं कसं सोनं करतात हे भावना खाडेच्या प्रवासातून दिसून येतं.

Leave a Reply