हॉटेल कामगार झाला वकील
सोलापुरातील दयानंद कॉलेज परिसरात असणारी गुजरवस्ती ही झोपडपट्टी. इथं वाढलेल्या अविनाश बनसोडे यांची ही गोष्ट. शेळगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे दहावीपर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत घेतले. नंतर दयानंद कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना घरगाडा चालविण्याची जबाबदारीही त्यांच्या शिरावर होती. काम केलं तरच पोटापुरतं खायला मिळेल अशी परिस्थिती. हमाली, बिगारी, रिक्षाचालक असे मिळेल ते काम तेव्हा अविनाश यांना करावं लागलं. काही काळाने सोलापुरातील त्रिपुरसुंदरी या तारांकित हॉटेलमध्ये त्यांना नोकरी मिळाली. सुरुवातीला भांडी घासण्याच्या, फरशी पुसण्याच्या कामापासून थेट स्टोर मॅनेजर पदापर्यंत त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मजल मारली.
तिथे आलेल्या अनुभवाचा त्यांच्या संवेदनशील मनावर खोलवर परिणाम झाला. मुळातच साहित्यिक पिंड असलेल्या अविनाश बनसोडे यांनी आपल्या व वंचित समूहाच्या व्यथा पुस्तकरूपाने मांडल्या. 2009 साली ‘काही उन्हातले, काही वणव्यातले’ हे त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकामुळे सामाजिक भान असणारा आंबेडकरी कवी म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती झाली.
आता परिसरात अविनाश यांची ओळख, नाव होऊ लागलं. त्यातूनच सन 2012 मध्ये ते सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. लोकप्रतिनिधी म्हणून काम सुरू झालं. यातही काही वर्ष कशी निघून गेली हे कळलंच नाही. मात्र या धावपळीच्या काळातही शिक्षणाची ज्योत कधीच विझू दिली नाही असं बनसोडे अभिमानाने सांगतात. एम.ए. पर्यंतचं शिक्षण हॉटेलमध्ये काम करत करत पूर्ण केलं. आता राजकारणात, समाजकारणात राहून त्यांनी नुकत्याच झालेल्या एल.एल.बी. परीक्षेतही 82% असे घवघवीत गुण घेऊन उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. आता यापुढेही एल.एल.एम. चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून तद्नंतर भारतीय संविधानावर पी.एचडी करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.
– नंदिनी सीताफळे, सोलापूर

Leave a Reply