होय, घरगुती हिंसाचार रोखता येतो
माझी आई नाशिकच्या लोकनिर्णय संस्थेच्या कार्यक्रमात नेहमीच सहभागी व्हायची. लोकनिर्णय संस्था कोरो इंडियासोबत एकत्रितपणे गेल्या सहा वर्षांपासून महिला हिंसाचाराविरोधात काम करतेय. तर या दोन संस्थांशी मी ही जोडला गेल्यानं महिलांबद्दलच्या माझ्या विचारांत काय बदल झालाय, हे मला यातून सांगायचं आहे.
‘लोकनिर्णय’नं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दहा वर्षापूर्वी महिला म्हणून कुणीही रक्तदान केले नव्हतं. ते करण्याचा पहिला मान माझ्या आईला मिळालाय याचा मला आनंद आहे. मी व्यवसायानं पानटपरीवर मिळणाऱ्या वस्तूंचा किरकोळ विक्रेता आहे. आमच्या घरात मी, माझी पत्नी आणि वडील असे तीन लोक राहतात. आईचे दीर्घ आजारानं मागच्या वर्षी निधन झालं. छोट्या बहिणीचा विवाह आई असतानाच पाच वर्षांपूर्वी झाला असून तिचा संसार सोन्यासारखा सुरू आहे. माझा संसार सोन्यासारखा होण्यासाठी मात्र मला लग्न जमण्याचीही वाट बघावी लागली. आम्ही जातीनं सोनार, समाजात मुलींची संख्या कमी असल्यानं आणि जी स्थळं येत आहेत त्या मुलींच्या साहजिक अपेक्षा – वराकडून म्हणजे माझ्याकडून फारच असल्याने लग्न जमेचना. आईची इच्छा होती, की माझं लग्न तिच्या डोळ्यांदेखत व्हावं, पण नशिबात नव्हतं. तिच्या मृत्यूनंतर घरात आम्ही दोघंच बाप-लेक. आम्ही घरातली सर्व कामं करायचो, परंतु बाई नसल्याने घराला ‘घरपण’ येत नव्हतं. याच दरम्यान मी जातीचा मोह सोडून, आंतरजातीय लग्न करण्याचा निश्चय केला. एक मनाजोगतं स्थळ मिळालं आणि आमच्या कुटुंबातलं माझं पहिलंच आंतरजातीय लग्न पार पडलं- तेही हुंड्याशिवाय.
करोनाच्या सावटात एका खेडेगावात, खूपच कमी लोकांच्या उपस्थितीत हे लग्न झालं. लग्न झाल्यावर आम्हाला आमच्या संस्थेच्या लोकांनी घरी जेवणास बोलवलं. कुटुंबातल्या सदस्यांसारखं प्रेम दिलं. आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांना आजही लवकर स्वीकारलं जात नाही. हे प्रत्यक्ष जाणवत नसलं तरी आपल्याला आपुलकीने विचारणं, नातेवाईकांनी घरी बोलावणं असं फारसं होत नाही. त्यामुळे त्यासाठी पुढाकार घेतलेल्या लोकांसाठी पोषक, उत्साहवर्धक वातावरण तयार होणं महत्वाचं आहे. आम्ही वैयक्तिक या अनुभवातून जात होतोच. हीच गरज मी संस्थेकडे बोलून दाखवली आणि त्यातून जन्म झाला तो- आंतरजातीय लग्न करणाऱ्या लोकांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचा. आम्ही अशा आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांचा एक व्हॉटसअप ग्रुप तयार केला. याद्वारे आम्ही दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी एकत्र येऊन अशा आंतरजातीय जोडप्यांसाठी काही वेगळं- चांगलं करता येईल का, यावर चिंतन सुरू केलं.
नाशिकच्या ‘लोकनिर्णय’ संस्थेतील सामाजिक प्रश्नांवरील चर्चा
या ग्रुपद्वारे आम्ही आंतरजातीय लग्नांबाबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करतो. सर्वांनाच यातून खूप शिकायला मिळतं. आंतरजातीय विवाह ही संविधानाने आश्वासित केलेली बाब असली तरी समाज पुरुषप्रधान आहे, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य महिलांना नाकारलंच जातं. त्यावरचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणं गरजेचं आहे. त्यांच्या सुरक्षेचा विचार म्हणून त्यांनी स्वत:च्या नावे बचत करणं, विमा काढणं, संपत्तीत वाटा मागण्यासंदर्भातील आवश्यक दस्ताऐवज तयार करणं, ते जपून ठेवणं महत्वाचं आहे. तसंच पुरुषांनी, कुटूंबांनी नवपरिणीत महिलेला समजून घेणं गरजेचं आहे. आपलं घर, समाज, परिसर, संस्कृती दूर सारून स्त्री नवऱ्याच्या घरी येत असल्यानं त्यांना वेळ देणं, त्यांना समजून घेणं महत्वाचं असतं. अशा अनेक मुद्द्यांवर आम्ही आमच्या व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून चर्चा करतो.
याचआधारे मी ही घरात सुरुवातीपासून विचारपूर्वक वागण्याचा प्रयत्न करतोय. शक्य तेवढा घरात वेळ देणं, घरातली शक्य ती कामं करणं, आपलं कामं आपण करणं हे सगळं मी करतो. याचा माझ्या वडिलांना मात्र त्रास होतो, त्यांची चिडचिड होते. त्यांचे पारंपरिक विचार असल्याने विशिष्ट पद्धतीनेच घरातील महिलांनी वागावं असा त्यांचा आग्रह असतो. सुनेनं घरात कुणाला तरी विचारल्याशिवाय घराबाहेर पडू नये, गेल्यावर तिकडची इत्यंभूत माहिती सांगावी असं त्यांना वाटतं. काळजी म्हणून ठीक, परंतु घरातल्या महिलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवलेलं मला आवडत नाही. कधी कधी वादही होतात, तेव्हा मात्र माझा पारा चढतो. मग मी मित्रांशी, नातेवाईकांशी बोलतो. त्यातून मार्ग काढतो. अशावेळी हक्काने बोलण्यासाठी मार्ग काढण्यासाठी, महिला मंडळ अर्थात- नवे नाव – कुटुंब विकास केंद्र (संपूर्ण कुटुंबाचा विचार) हे माझ्या कुटुंबासारखंच वाटतं.
तिथं सातत्याने चर्चा करताना, हिंसा मग ती कुठलीही असो त्यातून व्यक्ती-कुटुंब-समाजाची घडी विस्कळीत होते, हा विचार पक्का झालाय. त्यामुळे ‘कारण काहीही असो हात उचलायचा नाही!’ हा विचार मनी रुजतोय. वडिलांशी वाद होतात झाले तरी तिथंही मी सामोपचारानं मार्ग काढत आहे. संवाद प्रक्रिया कायम ठेवत आपण सर्वांची प्रतिष्ठा, सन्मान कायम ठेवत, वेळीच योग्य तो मार्ग काढायला हवा हे मला पटलंय. ‘लोक काय म्हणतील?’ यापेक्षा ‘संविधानिक मूल्यांचं काय?’ हा प्रश्न कायम ठेवत घरात हिंसाचार कसा होणार नाही, याचा विचार करायला हवा. हा विचार सतत मनात जागृत ठेवण्याचं काम आम्ही सुरु केलंय आणि ते आमच्या आसपासच्या इतर पुरुषांपर्यंतही पोहोचवत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.
वंसत काळे, नाशिक (खासगी अवकाश जपण्यासाठी लेखकाच्या विनंतीवरुन नाव बदललं आहे)
शब्दांकन- संतोष जाधव, लोकनिर्णय सामाजिक संस्था, नाशिक

Leave a Reply