मुलं परत शाळेकडे परतली हाच आनंद
“आमची शाळा मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरनंतर सुरू झाली. मुलं शाळेत यायला लागली तेव्हा जाणवलं की मुलं लिहायचं बरंचसं विसरून गेली आहेत. मागच्या वर्षी शिकवलेलंही त्यांना नीटसं येत नव्हतं. आमचा ग्रामीण भाग त्यामुळे सगळ्यांनाच मोबाईल, इंटरनेट अशा सुविधा मिळत नव्हत्या. त्यातून सगळी मुलं एकाच गावातून येणारी नसतात. आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावातून ही मुलं-मुली येत असतात. अर्थातच सगळीकडे एकच परिस्थिती नसते. त्यामुळे त्यांच्या शिकण्यात, समजण्यात फरक होताच. मुलं शाळेत येऊ लागली तसंतसं त्यांच्या एकएक अडचणी, शिक्षणात असणाऱ्या कमतरता लक्षात येऊ लागल्या. मुलांकडे परत नीट लक्ष द्यावं लागणार, मागच्या वर्षीची उजळणी परत करायची आहे हे लक्षात आलं,” शिक्षिका स्वाती चित्ते सांगत होत्या.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या बाभुळगावच्या जिल्हा परिषद शाळेची ही गोष्ट. शहरातल्या शाळा अगदी यावर्षी आत्ता आत्ता सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागातल्या 8 वी ते 10 च्या शाळा मागच्या वर्षीच दिवाळीनंतर सुरू झाल्या आणि त्या नंतरही सुरळीत सुरू राहिल्या.
चित्ते मॅडम सांगत होत्या, “शाळा सुरु झाल्या पण कोविड नियमांमुळे वर्गात मुलांची संख्या कमी असणार होती. एकावेळी सगळी मुलं नसणार. आमची विद्यार्थी संख्या मुळातच कमी असली तर या नियमांमुळे एकावेळी वर्गात जेमतेम 20 मुलं असणार होती. उर्वरित दुसऱ्या दिवशी. त्यामुळे आम्हांला एकच विषय दोनवेळा शिकवायला लागणार होता. मुलांचं शंकानिरसन, त्यांचं समजलेलं, न समजलेलं असं सगळं आमचं डबल होतं होतं. पण त्याला इलाज नव्हता. नियम पाळून का होईना पण शाळा सुरू झालेली, मुलं शाळेत येऊन आमच्यासमोर अभ्यास करत होती, शिकत होती हेच आमच्यासाठी महत्त्वाचं होतं.”
एकच गोष्ट दोनवेळा शिकवणं, विद्यार्थ्यांकडे बाकीही लक्ष देणं, त्यांच्या अडचणी सोडवणं हे सगळंच खरंतर आम्हा शिक्षकांसाठी थकवणारं होतं. पण मुलं पुन्हा शिक्षणाकडे वळली हेच या सगळ्यात आमच्यासाठी आनंदाचं आहे, स्वाती चित्ते सांगत होत्या.
– वर्षा जोशी-आठवले

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading