जालना, सोने का पाळणा
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटची स्वारी जालना शहरावर केली होती एवढा इतिहासही जालना शहराबद्दल खूप काही सांगून जातो. तेव्हा पासून जालना शहराबद्दल जे बोललं जातं ते वाक्य आजही जालनेकरांच्या तोंडी चपखल बसलेलं आहे ते म्हणजे “जालना,सोने का पाळणा..”
या शहराच्या वैभवाबद्दल खूप काही बोललं जातं, सांगितलं जातं. शहरातील किल्ला 75 टक्के जमीनदोस्त झाला असून 25 टक्के अवशेष आता शिल्लक आहेत. या किल्ल्यात जालना नगर परिषदेचे कार्यालय कित्येक वर्ष होते. आता त्याचा फक्त दर्शनी भाग शिल्लक असून तो किल्ला म्हणूनच ओळखले जातो. इंग्रजी राजवटीत देखील या शहराला ओळख होती. इंग्रजांनी तेव्हा जुना जालना व नवीन जालना जोडण्यासाठी लोखंडी पूल बांधला होता. जुना जालना आणि नवीन जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे आकर्षण जालनेकरांना नेहेमीच राहिलं होतं. 100 पेक्षा जास्त वर्ष सेवा देणाऱ्या या इंग्रजी अवशेषाला नुकतंच जमीनदोस्त करून त्याजागी नवा पूल बांधला तरी त्यावरून जाताना लोखंडी पुलाची आठवण येतेच.
आता आमच्या जालना शहराने कात टाकली आहे. समृद्धी महामार्ग, ड्राय पोर्ट, आयसीटी कॉलेज, जालन्यातल्या प्रसिध्द स्टील उद्योगाने जालना शहराचं नाव राज्याच्या सीमा ओलांडून बाहेर नेलं आहे. इथली मोसंबीची बाजारपेठ प्रसिद्ध असून जिल्ह्यात मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जालन्याची मोसंबी आता देशाच्या विविध भागात पोहोचल्याने मोसंबीची गोडी परराज्यातील लोकांच्या जिभेवर रुळू लागली आहे. साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात जालन्याची स्वतंत्र ओळख आहे. कवयित्री रेखा बैजल, संजीवनी तडेगावकर यांनी साहित्य, कविता क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. बियाणे क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जालना जिल्ह्याला महिको सारख्या बियाणे कंपनीने ओळख दूरपर्यंत पसरवली आहे, तर अत्याधुनिक गणपती नेत्रालय डोळ्याच्या आजारांवरील देत असलेल्या सेवेने सर्वदूर प्रसिद्ध झालंय. आता जालना जिल्ह्यात रेशीम शेती मोठ्या प्रमाणात होते आहे. जालन्यातील शेतकऱ्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यामुळेच स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट अशा फळांच्या शेतीकडे शेतकरी वळला आहे. कडवंची सारख्या छोट्याश्या गावाने पाण्याचे नियोजन करून द्राक्ष लागवड करत नाशिकसारखी स्वतःची ‘ग्रेप हब’ म्हणून ओळख बनवली आहे. शहराबाहेरून जाणारे रस्ते बनले. पण, वाढत्या लोकसंख्येने आणि जागा अपुरी पडू लागल्याने त्या रस्त्यांच्या आजूबाजूला आता नवनव्या वसाहती, कॉलनी बनू लागल्याने शहराला थोडा ‘गेटअप’ आलाय. पण आमच्या पिढीच्या आठवणी हळू हळू पुसत चालल्या आहेत त्या नव्या पिढीला कळणारही नाहीत.
शहराबद्दल बोलताना आता हिणकसपणाने बोललं जातं, की या शहरात रस्ते चांगले नाहीत आणि घरी पाहुणे आले तर त्यांना फिरायला नेण्यासाठी एखादी जागाही नाही. खरंय ते, पण आता बदलतंय जालना! आमच्या वेळी मोतीबाग सोडलं तर कुठलीच प्रेक्षणीय जागा नव्हती. सिनेमा टॉकीज तेव्हढ्या होत्या. नटराज, मॅजेस्टिक, अलंकार, राजमहेल आणि अमरछाया. आमच्या पिढीतल्यांनी याच टॉकीजमध्ये करमणूक करून घेतली. आता त्यातली बहुतांश टॉकीज बंद झाली आहेत. मोतीबाग, गणपती गल्लीतले गणपती मंदिर, पुढे आनंदी स्वामींचे मंदिर. आषाढी एकादशीला मुस्लिम बहुल भागात आनंदी स्वामींच्या पालखीचा आदर सत्कार मुस्लिम बांधव करतात, फराळ वाटप करतात ही परंपरा गेल्या काही वर्षांपासून नित्यनेमाने पार पाडली जाते हे या उत्सवाचं विशेष. या यात्रेसाठी सारं जालना शहर उत्सुक असतं. पुढे मुंबादेवी मंदिर, लोखंडी पूल आणि मग बाजारपेठ सुरू होते. फुले मार्केट, खवा मार्केट, कडबी मंडी, सराफा, बडी सडक, मथुरा भुवनची लस्सी, सर्वात जुन्या अनंत स्वीटमार्टच्या पेढ्यांमध्ये आता बाप्पा/मामाच्या पेढ्याची लज्जत आहे.
तर, जानेवारीपासून घेवर आणि फेणीने त्यात भर घातली आहे. ही आठवणीतली ठिकाणं आपली ओळख आजही टिकवून आहेत. दुर्गा देवीची नवरात्रातील यात्रा म्हणजे मोठे आकर्षण तेही आमच्या जालन्याने आजही जपून ठेवलंय.
गेल्या काही वर्षात माळाचा गणपती, न्हावा रोड वरील दत्ताश्रम लोकांच्या पसंतीला उतरले आहे हे पण खरे. तसं पहाता जालन्याने ही कात टाकलीये, जुनी कात टाकून जालना बहरतंय, काळाची ती गरजही आहेच.
– अनंत साळी, जालना

Leave a Reply