चला, ‘जांभूळबेट’ बघायला
जिल्हा परभणी. इथल्या पालम आणि पूर्णा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीत मध्यभागी अद्भुत आणि नयनरम्य असं जांभूळबेट आहे. बेटावर जायचं तर होडी गरजेचीच. बेटावर असणाऱ्या जांभळाच्या झाडांमुळे त्याचं नाव जांभूळबेट. शिवाय इथं इतरही झाडं आणि काही महत्त्वाच्या दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळतात. बेटावर मध्यभागी पुरातन असं मारूती मंदिर आहे.
अशा या आगळ्या वेगळ्या, निसर्गरम्य बेटाला अनेक पर्यटक भेट देत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मात्र बेटाचा ऱ्हास होत असल्याचं पर्यटक आणि निसर्गप्रेमींच्या लक्षात येऊ लागलं. पूर्वी हे बेट 27 एकरावर वसलं होतं. आता मात्र केवळ 20 एकर जमिनीचा भाग शिल्लक असल्याचं जुनी जाणकार मंडळी सांगतात. पूर्वी मोरासह इतरही पशु-पक्ष्यांची वर्दळ इथं असायची. तीही आता कमी झाली आहे. हे सगळं बघूनच या बेटाचं संवर्धन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि आणि पर्यावरण प्रेमी आता एकत्र आले आहेत. परभणी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींसह नांदेडच्या वृक्ष मित्र फाउंडेशनने यासाठी जांभूळ बेट संवर्धन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून जांभूळ बेटास पुनरुज्जीवित करून जांभूळबेटाचे सुशोभीकरण व संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी कृषीभूषण कांतराव झरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरखेड, सोमेश्वर, देऊळगाव दुधाटे, गोळेगाव, मुंबर येथील तरुणवर्ग आणि नांदेड येथील वृक्षमित्र फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येऊन काम सुरू केलं आहे. कांतराव झरीकर सांगतात, “बेटावर 2 हजार जांभळाची लावण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यातील एक हजार झाडं आतापर्यंत लावली आहेत. शिवाय साग, जांब आदी वृक्ष ही लावण्यात आले असून काही औषधी वनस्पतीही लावण्यात येणार आहेत. बेटाच्या विकासातून भविष्यात स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराचं साधनही उपलब्ध होवू शकेल. यासाठी पर्यावरणप्रेमी, वृक्षपेमींनीही जांभूळबेटाच्या विकासासाठी आपलं योगदान द्यावं.”
बेटावर जांभळाच्या झाडांची संख्या कमी झाल्यामुळे आता जांभळासह इतर मोठी आणि औषधी वृक्षांची लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बेटाचे खच्चीकरण होऊ नये यासाठी सर्व बाजूने मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली आहे. जांभूळबेटास भेट देणार्या व्यक्तीस तिथं जास्त काळ रमता यावे याकरता संपूर्ण बेट फिरण्यासाठी पायवाटा बनवण्यात येत आहेत. तसंच बेटावर 7 ते 8 मोठे पॉईंट्स निर्माण करून त्यात एका जागी फुलपाखरे व इतर जीवजंतूसाठी 2000 फुट घनवन पद्धतीने फुलांच्या झाडांची लागवड करून संरक्षित तारेचे कुंपण असलेले गार्डन बनवण्यात येणार आहे. अशाच पद्धतीने पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी फळझाडांचे गार्डनही असणार आहे. बेटावरील श्री हनुमान मंदिराचा परिसर सुशोभित करणे व मंदिराजवळ लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळाचे साहित्य व मैदान तयार करणे. बेटावर शांत ठिकाणी एका ध्यान मंदिराची निर्मिती करणे. फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट, रॉक गार्डन तयार करणे अशी कामे आता सुरू झाली आहेत.
जांभूळबेटावर अस्तित्वात असलेल्या वृक्षांची काळजी, नव्याने वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती आदी उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा निर्धार करण्यात आला. ज्येष्ठांसह तरुणाईचा या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग पहावयास मिळत आहे. या बेटावर जाण्यासाठी नियमित बोट लागणार होती. त्यामुळे जांभूळ बेट संवर्धन समितीने लोकसहभागातून एक बोट आणि 10 लाईफ जॅकेट खरेदी करून 5 डिसेंबर 2021 रोजी त्याचे लोकार्पण केले आहे. त्यामुळे अतिशय माफक दरात बेटावर जाण्यासाठी पर्यटकांना सुविधा उपलब्ध झाली आहे.
पर्यावरण अभ्यासक आणि वृक्षमित्र फाऊंडेशनचे सदस्य प्रा.डॉ.परमेश्वर पौळ म्हणाले की,
“बेटावरची झाडे ही यापूर्वी कोणी लावलेली नसून ती पशु-पक्षी यांच्या माध्यमातून बियांचा प्रसार आणि निसर्गतःच आलेली आहेत. बेटाच्या सर्व बाजूने पाणी असल्याने या ठिकाणचे तापमान समस्वरूपात असून वातावरण आल्हादायक, उत्साहवर्धक आहे. त्यामुळे अशा वातावरणात जर आपण वेळ घालवला तर एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. जैव विविधतेच्या दृष्टीनेही हे बेट महत्वपूर्ण आहे. त्यामुळे याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.”
– बाळासाहेब काळे, परभणी

Leave a Reply