जंगलाची राणीः प्राजक्ता
“जंगलात काम करताना बऱ्याचदा वेगवेगळे प्राणी दिसत असतात. आत्ता काही दिवसांपूर्वीची गोष्ट. जंगलातलं काम संपवून आम्ही परत येत होते. जंगलातल्या एका रस्त्याच्या कडेला एक वाघीण आणि तिची पिल्लं बसली होती. ती पिल्लं त्यांच्या आईशी, बहिण भावंडांशी खेळत होती. आपण जसं आपल्या बहिण-भावंडांशी खेळत असतो तसंच ते चित्र होतं. आपली आई जशी आपली काळजी घेते तशीच ती वाघीण घेत होती. अशाच बऱ्याच गोष्टी मला माणूस म्हणून समृद्ध करतात. मला जंगलाबद्दलचं जे आकर्षण आहे, आदर आहे तो वाढवतात. प्राणी असले म्हणून काय झालं त्यांना त्यांच्या भावना आहेत, त्यांची भाषा आपल्याला कळत नसली तरी त्यांच्या त्यांच्यात एकमेकांविषयी जे प्रेम असतं ते ते पोचवत असतात. म्हणजे त्यांची भाषा आपल्याला कळत नसली तरी त्यांच्यात प्रेम आहे, आपुलकी असते, ते एकमेकांचा आदर करतात.” जंगल आणि तिथले अनुभव याविषयी प्राजक्ता सांगत होती.
प्राजक्ता हुशंगाबादकर सध्या ताडोबा व्याघ्रप्रकल्पात वाईल्डलाईफ बायोलॉजीस्ट म्हणून काम करते आहे. तिचं प्राण्यांविषयीचं काम सुरू झालं ते 2006 साली. ती कॉलेजमध्ये असतानाच. तेव्हाच कॉलेजच्या इतर विद्यार्थ्यांसोबत तिने मेळघाटातील जंगल पिंजून काढलं. प्राणीप्रेमाचा वारसा तिला मिळाला तो घरातूनच. त्यामुळेच पुढे तिने अँग्रीकल्चरमध्ये पदवी तर तामीळनाडूतून वाईल्डलाईफ बायोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
मेळघाटातल्या जंगलात जाण्यापूर्वी तिने त्या जंगलपरिसरातील गावकऱ्यांकडून माहिती घेतली होती. लोकांनी तेव्हाही तिला व्यवस्थित मार्गदर्शन केलं होतं आणि आताही करतात. या कामात तिला गावकऱ्यांचे प्रेम, पाठिंबा भरपूर मिळतो, असं प्राजक्ता सांगते. तो पहिलाच अनुभव तिला याच क्षेत्रात आपले पाय रोवायचे आणि येथील प्राण्यांकरता तसंच जंगलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरता काहीतरी करायचे असा निर्धार करण्यास भाग पाडणारा ठरला.
2014 ते 2016 या काळात ती पेंच व्याघ्र प्रकल्पात बायोलॉजीस्ट म्हणून काम करत होती. नंतर 2016 ते 2020 पर्यंत WWF (World Wildlife Fund) या संस्थेसोबत मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्राच्या जंगलात काम केलं. साधारण याच काळात म्हणजे 2018 ते 2020 पर्यंत उत्तराखंड (नैनीताल) इथं तिने नोकरी केली. नुकतंच ऑगस्ट 2021 मध्ये रणथंबोर इथं झालेल्या देशव्यापी व्याघ्र गणना प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र वन विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि प्राजक्ता सुद्धा होती. येथे व्याघ्र गणना करण्याचे प्रशिक्षण दिलं गेलं. नविन तंत्रानुसार कागदाचा वापर न करता नोंदी कशा करायच्या याविषयीचं ते प्रशिक्षण होतं. याकरता ‘अँण्ड्राईड अप्लीकेशन’ तयार करण्यात आलं आहे. या प्रशिक्षणाचा फायदा करून घेत प्राजक्ताने आतापर्यत डिवीजननुसार २० ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्रॅम घेतले आहेत व आताही घेत आहे. प्राजक्ता याविषयी फक्त माहितीच देऊन थांबत नाही, तर प्रशिक्षणार्थ्यांना जंगलात जाऊन कॅमेरा ट्रॅपिंगचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवते.
प्राजक्ता सांगते, “वनक्षेत्रात काम करतांना लिंगभेद,जातीभेद या गोष्टीला काहीच थारा नसतो. प्रत्येकाला एकसारखीच कामं करावी लागतात. स्त्री असली तरी ती कमजोर बनून वागू शकत नाही. इथं स्त्रीपुरूष समानता आहे. इथं काम करणारी स्त्री पूर्णपणे सुरक्षित असते”. प्राजक्ताला नुकताच वन आणि वन्यजीव क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा sanctuary wildlife पुरस्कार मिळाला आहे. प्राजक्तासोबत तिचा एक सहकारी सुद्धा असतो. ते दोघे मिळून ट्रेनिंग प्रोग्राम घेत असतात. प्राजक्ता आपल्या कामाप्रती फार प्रामाणिक आहे. निसर्ग व प्राण्यांच्या सहवासात राहायला तिला फार आवडते.
विदर्भासारख्या रखरखीत भागात काम केल्यानंतर अचानक बर्फाळ प्रदेशात जाऊन काम करायला मिळतं तेव्हाचा एक वेगळा अनुभव असतो, असं प्राजक्ता सांगत असते. ती म्हणते, “मी पहिल्यांदा हिमशिखरं, बर्फाळ पहाड बघितले तेव्हा मला अचानक जाणवलं की निसर्ग खूप मोठी गोष्ट आहे. एका छोट्या मुंगीपासून ते मोठ्या हत्तीपर्यंत, समुद्र, नदी आणि आपण सुद्धा त्याचा एक भाग आहोत. ती हिमशिखरं बघताना मला वाटायला लागलं की मी या सगळ्याचाच एक भाग आहे. पुढल्या पिढ्यांसाठी हा निसर्ग जसाच्या तसा राहावा म्हणून मी काहीतरी करायला हवं हे मला जाणवलं आणि माझ्या नकळतच माझ्या डोळ्यातून अश्रू आले.
– नीता सोनवणे, नागपूर

Leave a Reply