जन्मदाते गमावूनही, शेकडो आई- वडील मिळविणाऱ्या डॉ. पठाण.

एप्रिल 2020- कोविडची पहिली लाट. भारतभरात लागलेला लॉकडाऊन, कोरोनाची प्रचंड भीती, घरात अडकून पडलेले लोक, काही जण आजारी, थेट हॉस्पिटलला भरती, त्यांच्या नातेवाईकांचे जीव टांगणीला हे सगळं तुम्हांला आठवत असेलच. कोरोना हे नावच आपण सगळ्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलं होतं, रोग नवा- उपचार नेमके माहीत नाहीत, त्यामुळे घरी बसणे- अनावश्यक बाहेर न जाणे, डॉक्टर आणि सरकारकडून येणाऱ्या आदेशांचे पालन करणे हे आपण सगळेच करत होतो. याच काळात वैद्यकीय क्षेत्रावरचा ताण खूप वाढला होता. कारण रूग्णांच्या टेस्ट, तपासणी, उपचार करणं, प्रसंगी ऑक्सिजन/ रेमडिसिव्हर देणं यासोबतच कोरोनाबाबतची जनजागृती करणं आणि हे सगळं करताना पीपीई किट घालून, एन ९५ मास्क घालून स्वत:ला सुरक्षित ठेवणं, हे मोठ्ठं आव्हान त्यांच्यासमोर होत

 

पीपीई किट घालून तपासणीसाठी सज्ज डॉ. पठाण आणि टीम

लातूर जिल्ह्यातलं भातंगळी प्राथमिक आरोग्य केंद्रही याला अपवाद नव्हतं. तिथल्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सगिरा सिद्दीकी- पठाण मॅडम आणि त्यांची टीम याच प्रकारची कामं करत होती. त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १७ गावं येतात. लातूर शहराच्या आसपासची पूर्ण ग्रामीण नाहीत आणि पूर्ण शहरीही नाही अश्या लोकवस्तीची गावं त्यांच्या कार्यक्षेत्रात येतात. इथं कोरोनाबाबतची जनजागृती, हात धुण्याचे महत्त्व, हात नीट कसे धुवावेत, सोशल डिस्टन्सिंग कसे पाळावे, घरात राहणे कसे हिताचे आहे याबाबतची जनजागृती तर यांची टीम करतच होती. पण सोबतच गावाच्या बाहेरून आलेल्या लोकांचे टेस्टिंग, टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास जि.प. शाळेत उभारलेल्या क्वारंटाईन सेंटरला भरती करणं, त्यांच्यावर औषधोपचार, सतत त्यांचे ऑक्सिजन मॉनिटरिंग करत राहणं, कोणाची लक्षणं जास्त तीव्र वाटली तर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करणं, ऑक्सिजन देणं ही सगळी कामं देखील पठाण मॅडम आणि टीम करत होती. क्वारंटाईन सेंटरमधील पेशंटना ताजा सकस आहार मिळावा याची सोय ग्रामपंचायत, महसूल विभाग अधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या मदतीने करण्यात येत होती.

या सगळ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे- अस्पृश्यता नाही किंवा रूग्णांना वाळीत टाकायचं नाहीए, याबाबतही खूप जनजागृती करावी लागल्याचे डॉ. पठाण यांनी सांगितलं. त्यांनी एक उदा. दिलं.,”एक व्यक्ती बिदरहून लातूरला भातंगळीला त्याच्या गावी चालत आला. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने तो चालतच आला, आधी पत्नीला लातूरमध्ये भेटला, बायकोने त्याचे आदरातिथ्य केले पण त्याची झोपायची सोय स्वतंत्र केली. पुढं तो भातंगळीला आला, त्याच्या आईने हे क्वारंटाईन वगैरे पाळणं महत्त्वाचं मानलं नाही आणि मुलाला थेट घरात घेतलं. या सगळ्यानंतर गावातल्या महिला मात्र त्या माणसाला थेट कोविड पॉझिटिव्हच समजू लागल्या आणि त्याच्या आईला पाणी भरायला सार्वजनिक नळावर येण्यास त्यांनी बंदी घातली, यांचं पाणी बंद होतंय की काय अशी वेळ आल्यावर आम्हांला मध्ये पडावंच लागलं. आपल्याला केवळ आजारापासून बचावासाठी एकमेकांपासून दूर राहायचं आहे, नियम पाळायचेच आहेत पण दुसऱ्याला वाळीत टाकायचं नाहीए”

डॉ. सगिरा सिद्दीकी- पठाण

यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले. मास्क, सोशल डिस्टन्सिंग अश्या गोष्टी बहुतांश लोक पाळत होते, तर काहीजण बेफिकिरीने वागत होते त्यातच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली, झालं असं की एकीकडे कोविडच्या दुसऱ्या लाटेत पटापट रूग्ण वाढू लागले होते. भातंगळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील सोनवती गावात कससलेच निर्बंध न पाळता एका व्यक्तीच्या अंत्ययात्रेला चारशे- पाचशे लोकांनी गर्दी केली. त्यानंतर काहीच दिवसांत त्या गावातील पन्नाशीच्या आसपासच्या महिलेचा मृत्यू झाला, जिला कोविडसदृश लक्षणं होती. या अंत्ययात्रेतूनच कोरोना पसरला हे उघड होतं. मग पठाण मॅडमच्या नेतृत्त्वाखाली तिथल्या जि.प. शाळेत कोविड टेस्टिंगचा विशेष कॅम्प घेण्यात आला. तिथं यापैकी ८५ लोक कोरोना पॉझिटिव्ह आले, तेवढे बेडसुद्धा स्थानिक कोविड सेंटरमध्ये अव्हेलेबल नव्हते. त्यामुळे मनपाची विशेष सिटी बस बोलावून हे सारे रूग्ण लातूर शहरातील रूग्णालयात हलवण्यात आले आणि त्यांना उत्तम उपचार दिले गेले. इथं गावात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोविड टेस्ट करणं आवश्यकच होतं. पठाण मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या गावातच मुककाम ठोकला आणि सर्व संशयितांची टेस्ट केली, घरीच बरे होऊ शकणाऱ्यांना क्वारंटाईन करून उपचार दिले.

या दुसऱ्या लाटेत कोविडचा डेल्टा व्हेरियंट तेव्हा वेगाने पसरू लागला होता आणि याच व्हेरियंटने पठाण मॅडमच्या आयुष्यातली दोन माणसं कायमची हिरावून नेली. एकीकडे पठाण मॅडमचे काम खूप वाढलं होतं आणि त्यातच त्यांच्या आईलाही कोविडची बाधा झाली. २५ मार्च २०२१ रोजी पठाण मॅडम यांचे मामा वारले, त्यांच्या अंत्ययात्रेला मॅडमची आई गेली नव्हती, कारण काही दिवसांपूर्वीच आईची पोटाची शस्त्रक्रिया झालेली होती. अंत्ययात्रेला आलेले काही नातेवाईक, यांचेही ऑपरेशन झालेले आहे, म्हणून त्यांना भेटायला घरी आले, त्यानंतर ३ एप्रिलला आईंना ताप आला. पठाण मॅडमनी स्वत: त्यांची कोविड टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आल्याने वेळ न घालवता आईंना थेट कोविड केअर सेंटरला शिफ्ट केलं. तिथं पठाण मॅडम यांची एमडी. मेडिसिन असलेली जवळची मैत्रिण डॉ. नीता पाटील त्यांच्या आईंना मॉनिटर करत होत्या. आवश्यक ते सर्व उपचार आईंवर करण्यात आले, रेमडिसिव्हर दिलं गेलं, पण आईंचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी कमी होत गेल्यानं त्यांना आयसीयूला हलवावं लागलं. आईंना आधीच डायबेटिस होता, उपचारादरम्यान त्यांची शुगर वाढत गेली. हे सर्व होताना पठाण मॅडम स्वत: सुद्धा आईच्या उपचारात डॉक्टर म्हणून सहभागी होत्याच.

हे सगळं घडत होतं, त्याच दरम्यान पठाण मॅडम यांच्या वडिलांनाही घरी ताप चढला, त्यांनाही कोविड सेंटरलाच दाखल करण्यात आलं. आईंच्या शेजारच्या बेडवर वडिलही उपचार घेत होते. वडिलांची तब्येत तशी ठीक होती, पण आईची तब्येत मात्र खालावतच होती. त्यातच १५ एप्रिल रोजी मध्यरात्री आईंना हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्या गेल्या. हा खूपच मोठ्ठा धक्का होता, पण वडिलांची तब्येत बरीचशी सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. पठाण मॅडम आणि त्यांच्या पाच बहिणींनी मिळून अंत्यविधी आणि सोपस्कार पार पाडले. वडीलही घरी आलेले होतेच, पण आपली पत्नी या आजाराने आपल्याला सोडून या दुनियेतूनच निघून गेली हा धक्का त्यांना सहनच झाला नाही. तीन दिवस ते पत्नी गेल्याच्या शॉकमध्येच होते. दोघांचेही एकमेकांवर निरातिशय प्रेम होते, ते दोघे लग्न झाल्यापासून कायम एकमेकांसोबतच राहिले होते, एकमेकांशिवाय कधी जेवलेही नव्हते. त्यामुळे १८ एप्रिल रोजी मध्यरात्री आईप्रमाणेच हार्टअटॅक येऊन पठाण मॅडम यांचे वडीलही गेले. पठाण मॅडम आणि इतर बहिणींना अक्षरश: उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. डोक्यावरची आई-बापाची छत्रछाया एका आठवड्यात लागोपाठ नाहीशी झाली.

बाहेरून आलेल्यांचे तापमान तपासणारे आरोग्य केंद्राचे कर्मचारी

पण आईवडील गेले तरी कर्तव्य चुकवून चालणार नव्हतं, उलट कर्तव्याची त्यांना आता अधिक तीव्रतेनं जाणीव होत होती. डॉ. पठाण मॅडम सांगतात, “बाबांचे अंत्यसंस्कार झाल्यावर तिसऱ्या दिवशीच मी प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर झाले. त्या आठवड्याभरात डेल्टा व्हेरियंटने धुमाकूळ घातला होता, मृत्यूदर कितीतरी पटीने वाढला होता. त्यातच मला कॉल आला की एका जुनाट घरात चार जण आजारी आहेत आणि त्यांना फार हालचालीही करता येत नाहीएत. मी ताबडतोब कामावर हजर झाले आणि तिथं अम्ब्युलन्स पाठवली. त्या घरात खरोखरच चारजण होते, जे जवळपास बेशुद्ध होते. त्यांना आधी शुद्धीवर आणलं आणि कोविड सेंटरला घेऊन आलो. तिथं आल्यावर शुद्धीवर आलेल्या त्या लोकांनी सांगितलं की, ते भिकारी आहेत आणि गेल्या चार दिवसांपासून त्यांनी काहीच खाल्लेलं नाहीए. त्यांना आधी पोटभर खायला घातलं, त्यांच्या टेस्ट केल्या, बरे कपडे घालायला दिले. त्यांनाही कोरोनाची बाधा झालेली होती, आणि त्यांच्यापैकी एकजण आजारी होता, म्हणूनच हे लोक घाबरून एका जुन्या घरात आसऱ्याला राहिले होते. यांच्यावर आम्ही उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोघांचा जीव वाचला. यांच्या नातेवाईकांशी वेळेत संपर्क न झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्या दोघांवर अंत्यसंस्कारही केले. ”

“तो काळ फार कठीण होता. या आजाराने माणसा- माणसातली नाती तुटली. आई-बापाचा मृतदेह घ्यायला सुद्धा मुलं यायची नाहीत. मोठ्ठा परिवार असूनसुद्धा अनेकांवर बेवारश्यांसारखे अंत्यसंस्कार करावे लागायचे. आजारी असलेला माणून कोविड प्रोटोकॉलनुसार वेगळा ठेवला जायचा, पण त्यात तो माणूस आपल्या घरच्यापासून तुटल्याने किती खचत असेल, याचा अंदाजही करवत नाहीए. प्रेमाच्या म्हणवल्या जाणाऱ्या माणसांचे खरे चेहरे पुढे यायचे, तो काळ आठवला की मी आजही अस्वस्थ होते, मला झोप लागत नाही. मात्र याच काळात मी माझे आई- वडील गमावल्याने ज्येष्ठ नागरिकांविषयी माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. आपले आई- वडील तर वाचू शकले नाहीत, पण इतर वरिष्ठांवर मी जास्तीत जास्त चांगले उपचार करून त्यांना बरं करण्याचा प्रयत्न कऱू शकतेच ना? त्यामुळे अश्या लोकांना मी जास्त प्रेमाने आणि आपुलकीने वागवू लागले” डॉ. पठाण मॅडम सांगत होत्या.

आईवडील गेल्यानंतरच्या काळात मी जास्त स्ट्रॉंग झाले असं पठाण मॅडम सांगतात. ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांचं कुणी नाहीए, यांच्या घरी धावतपळत जाऊन त्या उपचार करायच्या, त्यांना उत्तमातले उत्तम उपचार देऊन वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. याच काळात भातंगळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पठाण मॅडम यांच्या नेतृत्त्वाखाली ‘Anti-Covid Force’ तयार करण्यात आला. त्यात आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आशा सेविका सहभागी होत्या. गावाच्या वेशीवर एक छोटा स्टॉल लावला जायचा. गावात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर टी टीम लक्ष द्यायची, प्रत्येकाची नोंदणी व्हायची. बाहेरून आलेल्या व्यक्तीची तब्येत जर संशयास्पद वाटली तर लगेच टेस्ट केली जायची, आणि सोयीनुसार कोविड केअर सेंटर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा शहरातील दवाखान्यात त्या व्यक्तीला दाखल केलं जायचं. सकाळ संध्याकाळ ऑक्सिजन, टेम्परेचर तपासलं जायचं. यामुळे कोरोनाच्या प्रसाराला बऱ्यापैकी अटकाव बसला.

लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करून वेगाने लसीकरण करणारी आरोग्यकेंद्राची टीम

याचसोबत पठाण मॅडम आणि त्यांच्या टीमने केलेलं अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे- जि.प. शाळेच्या शिक्षकांची आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लातूरच्या तुरूंगातील कैद्यांची सातत्याने तपासणी आणि नंतर पुढाकार घेऊन केलेले लसीकरण. दुसऱ्या लाटेच्या आधीच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले होते आणि नंतर लाट कमी- कमी होत गेली तसे आधी ज्येष्ठ नागरिकांचे, मग मध्यमवयीनांचे, मग तरूणांचे आणि मग बालकांचे असे टप्प्याटप्प्याने लसीकरण देशात सुरू झाले. डॉ. पठाण सांगतात, “कोविडपासून वाचण्यासाठीचा सर्वात चांगला उपाय म्हणून आपण लसीकरणाकडे पाहत होतो, पण ग्रामीण भागात लोकांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी यासाठी आम्हांला फार प्रयत्न करावे लागले. कारण ग्रामीण भागात सुरूवातीला या लसींविषयी खूप गैरसमज पसरले होते. लस घेतल्याने मरण येऊ शकते, किंवा लस घेतल्यानेच कोविड होतो अथवा ही लस घेतल्याने नपुंसकता येते असे वाट्टेल ते समज लोकांमध्ये होते. ते दूर करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात, समाजमंदिरात कार्यक्रम घेतले. लोकांशी वैयक्तिक बोलून या सर्व अफवा असल्याचे सांगितले आणि मग नंतर आमच्या कार्यक्षेत्रात इतके जोमाने लसीकरण शिबिरं झाली की कधी कधी शासनाने पुरविलेल्या लसी कमी पडू लागल्या. याशिवाय लातूरच्या तुरूंगातील ४२५ कैद्यांचे लसीकरण एकाच दिवशी केल्याचा विक्रमही आमच्याच भातंगळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावावर आहे.”

डॉ. पठाण सांगतात, “कोविड येऊन गेल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला. आधी आजार होऊ नये म्हणून, प्रतिबंधक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अशी संकल्पना होती. पण कोविडने शिकवून दिले की योग्य वेळी, जागच्या जागी प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार अर्थात After Care सुद्धा महत्त्वाची हा धडा कोविडने दिला. आमचे भातंगळीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आता दहा बेडसह, आणि प्रत्येक बेडला ऑक्सिजन जोडता येईल अश्या व्यवस्थेसह कोविडकाळातच सज्ज झालंय. आमचे आ. धीरजदादा देशमुख यांनी प्रत्येक पीएचसीला ऑक्जिन कॉन्सट्रेटरही पुरवला आहे. आमच्याकडे ऑक्सिजनचा जम्बो सिलेंडर, आवश्यक यंत्रसामग्री, औषधं आहेत. त्यामुळे आता कोविडच नव्हे अन्य कोणता गंभीर आजार असेल तर, थेट शहरात पाठवण्याआधी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा उत्तम उपचार होऊ शकतात.”

तुरूंगातील कैंद्यांचे लसीकरण करण्याआधी प्रबोधन

खरंतर आई- वडील एकाच आठवड्यात पाठोपाठ गेल्यावर कुणीही कोलमडून पडेल, मात्र पठाण मॅडम त्यातूनही धडा शिकल्या आणि उभ्या राहिल्या. आई- वडील असे अकाली गेल्याने ज्येष्ठ नागरिकांबद्दल त्यांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय तो कायमचाच. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक रूग्णाशी त्या अतिशय मायेने, प्रेमाने बोलतात, नीट समजावतात. त्यामुळे प्रत्येक आजी- आजोबांना सुद्धा पठाण मॅडमशी चार शब्द बोलल्याशिवाय घरी जायचं नसतं. एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी डायबेटिसची उपाशी पोटी आणि खाल्ल्यावर दीड तासाने अशी चाचणी करण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पठाण मॅडम यांनी आरोग्य केंद्राच्या परिसरातच मोफत आहार सुरू केलाय. ते आजी आजोबा शिळ्या- कोरड्या भाकरीचे तुकडे- चटणी- झुणका असं काहीतर सोबत फडक्यात बांधून घेऊन यायचे, ते खाऊन मग दीड तासाने टेस्ट व्हायची. ते पाहून डॉ. पठाण यांच्या पोटात तुटलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ताज्या भाजी- भाकरीची व्यवस्था त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावरच केली. डॉक्टर नव्हे तर आपली काळजी घेणारी अशी लेक मिळाल्याने, या परिसरातील सर्व नागरिक डॉ. पठाण यांच्यावर इतके खुश आहेत की त्यांच्या डोक्यावरून हात फिरवल्याशिवाय ते घरी परत जात नाहीत. शासकीय कर्तव्यात भावनेचा हा ओलावा जोपासणारे, डॉ. पठाण मॅडमसारखे अधिकारी दुर्मिळच, पण ते आहेत त्यामुळे आपला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास टिकून आहे.

स्नेहल बनसोडे- शेलुडकर, संपर्क- नवी उमेद, पुणे.

Leave a Reply