नवजात अर्भकामधील कावीळ
माधुरीला जरा उशिराच मूल होणार होतं त्यामुळे गरोदरपणात तिने खूपच काळजी घेतली होती. योग्य वेळी तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊन मुलगा झाला. माधुरी आणि घरातलेही खूप खुश होते. पण पहिल्याच दिवशी बाळाची त्वचा आणि डोळे पिवळे दिसत होते. लगेचच बालरोगतज्ञांना बोलावलं गेलं. त्यांनी बाळाला फोटोथेरपीसाठी नेलं. बाळ जवळ नसल्याने माधुरी जरा उदास झाली. पण, एक दोन दिवसांतच त्याची कावीळ कमी झाली. डॉक्टर म्हणाले, “की नवीन जन्मलेल्या सर्वच बाळांना कावीळ होते. पण, ती 3/4 दिवसांनी होते. या बाळाला पहिल्याच दिवशी झाल्यामुळे काळजी घेण्यासाठी त्याला फोटोथेरपी दिली.”
नवजात अर्भकाला होणारी कावीळ ही खरंतर एक नेहमीची गोष्ट. ही कावीळ तीन दिवसांनी होते आणि साधारण 2 ते 3 आठवड्यांनी पूर्ण बरी होते. 3 आठवड्यांपेक्षा जास्त कावीळ राहिली तर मात्र खूप तपासण्या कराव्या लागतात.
त्यासाठी ही कावीळ कशी होते ते आधी समजून घेऊ.
मूल जेव्हा गर्भाशयात असते तेव्हा त्याची फुप्फुसे काम करत नसतात. त्यामुळे त्याला शुद्ध रक्त आईच्या रक्तवाहिनीतून मिळत असते. ही रक्तवाहिनी म्हणजे आईची युटेराईन आर्टरी असते. त्यातून येणाऱ्या रक्तात 80 टक्केच ऑक्सिजन असतो. हा कमी ऑक्सिजन मुलाच्या सर्व अवयवांना पुरवण्यासाठी मुलाचे हिमोग्लोबिन वेगळ्या प्रकारचे असते. त्यात बीटाऐवजी डेल्टा साखळ्या असतात. त्याला HbF असे म्हणतात. ऑक्सिजन कमी असल्यामुळे रक्तात हिमोग्लोबिनची पातळी जास्त असते. तसेच तांबड्या पेशीही जास्त असतात.
मूल जन्माला येते तेव्हा पहिला श्वास घेते त्या क्षणी त्याची फुप्फुसे काम करू लागतात. त्याची नाळ कापल्यावर त्याला आईकडून होणारा रक्तपुरवठा बंद होतो. त्याच्यात ऍडल्ट प्रकारचे हिमोग्लोबिन HbA1 तयार होऊ लागते. त्यामुळे HbF असलेल्या तांबड्या पेशी नष्ट होऊ लागतात. जन्मतःच बाळाचं हिमोग्लोबिन 17 ते 20 ग्राम इतकं असते. ते हळूहळू कमी होऊ लागतं. काहीच दिवसांत ते 12 ग्राम पर्यंत कमी होते. हिमोग्लोबिन जेव्हा ब्रेक डाऊन होते तेव्हा त्यातील ग्लोबिन ह्या भागापासून बिलिरुबिन बनते. हे बिलिरुबिन पाण्यात विरघळत नाही. लिव्हरमध्ये त्याचे पाण्यात विरघळणाऱ्या बिलिरुबिनमध्ये रूपांतर होते. ते युरिन वाटे बाहेर टाकले जाते. काही भाग स्टूलमधून बाहेर टाकला जातो.
खूप जास्त प्रमाणात बिलिरुबिन तयार झाल्यामुळे त्याची रक्तातील पातळी वाढते. ह्यालाच आपण कावीळ म्हणतो.
बाळाचे लिव्हर हळूहळू काम करायला लागते व हे सर्व बिलिरुबिन 3 आठवड्यांत बाहेर टाकले जाते.
पाण्यात न विरघळणारे हिमोग्लोबिन खूप धोकादायक असते कारण ते मेंदूमध्ये जाऊन पॅरालिसिस घडवून आणू शकते. पहिल्याच दिवशी बाळाला कावीळ झाल्यास हे होण्याची शक्यता वाढते. म्हणून त्याला फोटोथेरपी देतात. ह्यात मुलाला काचेच्या पेटीत ठेवून निळा आणि हिरव्या रंगाचे प्रकाशकिरण त्याला देतात. ह्यामुळे बिलिरुबिनवर रासायनिक अभिक्रिया होऊन त्याचे वेगळ्या रसायनांत रूपांतर होते आणि बिलिरुबिनची पातळी कमी होते.
मात्र कावीळ तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास बाळाचे लिव्हर कमजोर आहे का ते बघावे लागते. ह्यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट करतात. ह्यात SGOT, SGPT, टोटल प्रोटीन, अलब्युमीन, ग्लोब्युलीन वगैरे टेस्ट येतात. लिव्हर खराब असल्याचे निष्पन्न झाले तर हेपटायटीस B, C वगैरे व्हायरसच्या टेस्ट किंवा काही जेनेटिक आजारांसाठी टेस्टस कराव्या लागतात. पण अश्या केसेस खूप कमी असतात. ही नवजात मुलाची कावीळ काही दिवसांत बरी होते.
मात्र हे सगळे निसर्ग किती अचूकपणे करतो हे समजल्यावर आपण थक्क होतो. शरीरातील गुंतागुंतीच्या क्रिया हे अद्भुत आश्चर्य आहे आणि त्या शोधून काढणारे शास्त्रज्ञ खरे आपल्या आदरास पात्र आहेत असं मला वाटतं.
– डॉ.मंजिरी मणेरीकर

Leave a Reply