आणीबाणी, नृत्य, स्मितालय
मी ओडीसी नृत्यांगना आहे खरी, पण बालपणी आणि तरुणपणी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातून भरपूर लोकनृत्य केली आहेत. माझा जन्म एका पुरोगामी उदारमतवादी आणि मुख्य म्हणजे समाजवादी विचारांच्या कुटुंबात झाला. माझे आईवडील सुधा आणि सदानंद वर्दे, मावशी मृणाल गोरे. या सर्वांची दैवतं म्हणजे साने गुरूजी, एसएम जोशी, जयप्रकाश नारायण आणि अर्थातच गांधीजी.
देशात आणीबाणी लागू झाली तेव्हा मृणालमावशीच्या पुढाकाराने देशातला पहिला आणीबाणीविरोधातला सत्याग्रह मुंबईत घडला. या पहिल्या सत्याग्रहात आम्ही फक्त नऊ बायका होतो! 20-21 वर्षांच्या आम्ही तिघी आणि आमच्यातल्या सर्वांत मोठ्या होत्या 65 वर्षांच्या नऊवारी साडीतल्या परळच्या एक आजी. (आता मी 67 वर्षांची आहे!) आम्हाला वाटलं होतं की आम्ही घोषणा देत रस्त्यावर आलो की लागलीच आम्हाला अटक होईल. पोलीस ठाण्यावर नेऊन नोंदणी करून सोडून देतील. पण आम्ही हुतात्मा चौकात तासभर घोषणा देऊनही अटक सोडा, काहीच झालं नाही. मग आम्ही तिथून चालत चालत, बोंबा मारत चर्चगेट स्टेशनला गेलो. “आणीबाणी हटा दो”, “Down with emergency” वगैरे फलक हातात होते. आम्ही घोषणा देत पत्रकं वाटत अर्धा-पाऊण तास होतो. आमच्या भोवती प्रचंड गर्दी जमा झाली. आम्हा नऊ जणींमध्ये आता खूपच धाडस आणि धिटाई निर्माण झाली. तेव्हा काहीतरी खास मिळवल्याची जाणीव झाली. मी नृत्याद्वारेही समाजवादी चळवळीत जोडली राहिलेच.
स्मितालय. माझी प्रिय मैत्रीण दिवंगत स्मिता पाटील हिच्या स्मरणार्थ 1989 मध्ये सुरू केलेली संस्था. साने गुरुजी आरोग्यमंदिराची नृत्यशाखा. इथं फक्त ओडिसी नृत्य शिकवलं जातं. सुरुवातीला फक्त मुली नृत्य शिकायला यायच्या. आता बरेच पुरुष नर्तक आहेत. आमच्याकडे कुठलाही नृत्याचा प्रकल्प आला की मी तो नाकारायचे नाही. 1996 साली नॅशनल युनियन ऑफ सीफेअर्स ऑफ इंडियाला शंभर वर्ष पूर्ण होत होती. त्यांना त्यांचा पूर्ण इतिहास अर्ध्या तासाच्या नृत्यनाटिकेतून लोकांसमोर आणायचा होता. त्यांच्यातले एक गृहस्थ समाजवादी होते म्हणून त्यांना माझी माहिती होती. मी होकार दिला. घरी सांगितल्यावर नवरा म्हणाला, “अगं, स्मितालयामध्ये तर सर्व मुली, मग तू खलाशी, त्यांची यूनियन, काम व प्रगती कशी दाखवणार?” माझं उत्तर, “होईल रे!”
मी म्हणजे स्मितालय, आणि स्मितालय म्हणजे साने गुरुजी आरोग्य मंदिर, असं आमचं नातं. रोज संध्याकाळी आवारात तरुण मुलं कबड्डी खेळत. त्या सर्वांना झेलमताई आणि ती शास्त्रीय नृत्य शिकवते हेही माहीत होतं. ही मुलं खेळताना “कबड्डी कबड्डी” तालात म्हणायची आणि म्हणताना हलायची. मग यांना तालात शरीर हलवणं मुश्कील नाही. मी नोटीस लावली, “नवीन नृत्यनाट्य बसतंय, मुलगे हवे आहेत, झेलमताईला भेटा.” क्लासमध्ये पहिल्या दिवशी दोन पोरं डोकावली, मग दोन, तीन असं करत चक्क बारा मुलं जमली. खलाशी वाटतील अशीच, मस्त रांगडी दिसणारी आणि साने गुरुजी आरोग्य मंदिराचं सर्वधर्म-जातसमभाव दर्शवणारी पोरं. रोहन डहाळे, हॅरिसन लोबो, मोहम्मद अफजल, दीपक नानाचे, यशवंत पाटील इत्यादी. सुरुवातीला अगदी दबकत दबकत आणि नंतर दिलखुलास सर्वांनी झोकून दिलं. मी आणि पोरांनी भरपूर मेहनत घेतली. तालमीदरम्यान बऱ्याच गंमती झाल्या. दोनच सांगते. तालमी सुरू होऊन तीन-चार दिवस झाले असतील. एक छाकटं पोरगं क्लासमध्ये डोकावलं. मी त्याला आत बोलावलं, तेवढ्यात अफजलने त्याला जाण्याची खूण केली. “भाई मुझे ना बोलता!” तो होता अफझलचा धाकटा भाऊ अख्तर! आम्ही रोज संध्याकाळी तीन तास आणि रविवारी दहा-बारा तास एकत्र असायचो. सर्वजण डबे आणायचो आणि एकत्र बसून जेवायचो. एकदा काय झालं हॅरीने (तो ख्रिस्ती) पोर्क म्हणजे डुकराचं मटण आणलं होतं आणि तो मुद्दाम अफझलच्या शेजारी जाऊन बसला. अफझल मुसलमान डुक्कर न खाणारा. दोघांची जुंपली. मग दोघांना दोन कोपऱ्यात बसवलं आणि आम्ही मधे बसून जेवलो! अशा गंमती. पोरांची आणि माझी मेहनत फळाला आली. अतिशय सुंदर नृत्यनाटिका बसली आणि एनयुएसआयचा शंभर वर्षांचा इतिहास अगदी चपखलपणे अर्ध्या तासात दाखवू शकलो. समुद्र, जहाज, वादळ सर्व काही यथासांग दृश्य रुपात आणू शकलो.
या मुलांनी मला खूप आनंद दिला, समाधान दिलं. सृजनशीलतेची उत्कट अभिव्यक्ती करता आली.
– झेलम परांजपे

Leave a Reply