चोखामेळा
आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे. सगळ्यांची वयं, व्यवसाय वेगवेगळे पण सगळ्यांनाच वाचनाची आवड. खरंतर मी या मैत्रिणींइतकी वाचत नाही पण या पोरींमुळे, माफ करा बायकांमुळे मलादेखील सवय जडली. म्हणजे मला वाचायला आवडचं पण मराठी वाचनाची अजिबात सवय नव्हती. हा ग्रुप दर महिन्याला एक मराठी पुस्तक वाचतो हे कळलं आणि लगेचच मी याचा भाग व्हायचं ठरवलं. माझं शिक्षण इंग्रजी माध्यमातलं, त्यामुळे मला मराठी न वाचण्याचं ते एक कारण होतं. पण असो. आमच्या मैत्रिणींच्या पुस्तक वेड्या समूहाचं नाव ‘अनुभूति’. ‘अनुभूति’ने मला मराठी वाचनाची गोडी लावली आणि कदाचित माझी भाषा देखील थोडी समृद्ध केली असेल. तर सांगायचा मुद्दा असा की अनुभूतितलं एक पुस्तक होतं अरुणा ढेरे लिखित ‘महाद्वार’. या पुस्तकात अरुणाताईंनी सुरुवातीला लिहिलं आहे की, “चोखामेळ्याचे अभंग प्रथम जेव्हा वाचले तेव्हा मनावर खूण उरली ती एका भळभळत्या दुःखाची, एक जखमी असे दुःख”. हे पुस्तक हातात घेईपर्यंत मी चोखाबाचा एकही अभंग वाचला नव्हता आणि पुस्तक वाचायला घेतल्यावरही नाही. पण, अरुणाताईंना चोख्याचा अभंग वाचून जसं वाटलं तसं मला ‘हे पुस्तक वाचून वाटलं. किती दुःख त्या चोखामेळ्याने भोगलंय, पण तरीही किती प्रेमात होता तो आपल्या विठूच्या, आपल्या विठ्ठलाच्या! मला नवल वाटलं या चोखोबाचं. इतका छळ, इतका मार… सुरुवातीला सोयरा सुद्धा म्हणते त्याला “काय आहे हो, तुमच्या विठोबात जे की इतकं वेड लावलंय तुम्हाला?” ‘महाद्वार’ वाचून झालं, पण मनातला चोखा जाईना, मनाला शांती मिळेना. मला माझा चोखा, त्याचे हाल आणि त्याचं वेड प्रेम नृत्यातून व्यक्त करायचं होतं, जशी अरुणाताईंना चोख्याची गोष्ट ललित अंगाने व्यक्त करावीशी वाटली.
मग मी चोख्याचे अभंग वाचले. जात-पात, स्पृश्य-अस्पृश्याच्या विळख्यात सापडलेला चोखा म्हणतो
उंबरठ्याशी कैसे शिवू, आम्ही जाती हीन
रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही दीन
पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग
चोखा अशिक्षित महार, हे शब्द कसे आले, कुठून आले? हा एक चमत्कारच आहे. माझ्या नृत्याच्या कथेत मी थोडं सत्य आणि थोडं काल्पनिक केलं आहे. चोखा महार म्हणून त्याला विठोबाच्या देवळात प्रवेश नाही. पण तो सतत देवळाच्या आजूबाजूला राहून अप्रतिम अभंग पूर्ण भक्तिरसात गात राहतो. संतापाने ब्राह्मण त्याची प्रचंड मारहाण करतात. इथंपर्यंत सत्य मग काल्पनिक. प्रचंड मारलेल्या अवस्थेत त्याला मरायला नदीत टाकतात. पण चोखा कसाबसा पोहत दुसऱ्या काठावर जातो. दुरून देऊळ पाहण्याचा प्रयत्न करतो. थोड्यावेळाने त्याला झोप लागते. जाग येते ती कोणीतरी आपल्याला हाक मारतंय, त्याच्या लक्षात येतं आपला विठू आपल्याला बोलवतोय! त्या तीरी पोहून जाण्याचा त्याच्यात त्राण नसतो, पण चमत्कार घडतो. नदीचं पाणी बाजूला होऊन त्याला वाट करून देतं. देवळासमोर पोहोचतो तो आणखी एक चमत्कार – महाद्वार खुले असते. चोखा आत जातो आणि आपल्या विठूचं दर्शन त्याला लाभतं. त्याचे डोळे दिपतात तो विठ्ठलाच्या पायाला मिठी मारतो!
ही प्रस्तुती करताना मी पूर्णपणे चोखामय होते- नव्हे- चोखोबाचं होते! मला मारहाण होते, मी नदीतून पाहून कशीबशी बाहेर पडते, विठ्ठलाने हाक मारल्यावर छातीत धडधडतं, त्याचं दर्शन लाभल्यावर डोळे दिपतात आणि त्याच्या पायांना आलिंगन केल्यावर रडू कोसळतं! दोन वेळा तर काहीतरी चमत्कारच झाला. भुवनेश्वरला जेव्हा मी म्हणजे चोखा विठ्ठलाच्या पायाशी पडला तेव्हा रंगमंचावरची मोठी समय अचानक विझली! आणि गोव्यात ही प्रस्तुती एका जुन्या चर्च बाहेर केली, नाचत असताना मला थेट येशू दिसत होता. त्याच्या डोळ्यातून काहीतरी तेज माझ्यापर्यंत पोहोचल्यासारखं वाटलं आणि काही क्षण मी त्या रंगमंचावर किंवा पृथ्वीवर नाही असा काहीतरी अद्भुत अनुभव मला आला. नास्तिक कुटुंबात जन्मलेली मी – आयुष्यात चोखा आल्यामुळे अस्तिकतेकडे वळते आहे की काय असे वाटू लागले…!
– झेलम परांजपे

Leave a Reply