मराठवाडा आणि दुष्काळ हे समीकरण इतकं फिट्ट झालं आहे की इथं कुठं जंगल असेल यावर मराठवाड्याबाहेरच्या लोकांचा तर विश्वासच बसत नाही. पण याच मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यात अत्यंत मौल्यवान वनसंपदा आहे. सोबतचे फोटो पहा, भुरळ पडणारच, हे नक्की ! विशेष म्हणजे सर्व प्रकारचा वन्य अधिवास इथं आहे.
जिल्ह्यातल्या १६०३ गावांपैकी ४१० गावं वनक्षेत्र असलेली. नांदेड वन विभागाचे क्षेत्र १,३०,०७६.५०२ हेक्टर. त्याच्या व्यवस्थापनासाठी माहूर, किनवट, मांडवी, बोधडी, ईस्लापूर, अप्पारावपेठ, हदगांव, हिमायतनगर, नांदेड, भोकर, मुखेड आणि देगलूर अशी १२ वनपरिक्षेत्र. इथलं वन मिश्र शुष्क पानझडीचं. साग, सप्तपर्णी, बांबु खैर, हिवर, हळद, बेल, महारुख, कृष्णा, शिरस, चिचावा, किन्ही, धावडा, रक्त, पळस, कवट, पिंपळी, वड, उंबर, पिंपळ, घोगर, शिवण, कड, अंजन, रुषी, मोई, सुबांबुळ, मोहा, केसरी, खिरणी, बाकन, बाकुली, कळंब, शेवगा, तिवस, शिडी, आवळा, बिजा, करंज असे वृक्ष. जिल्हयाच्या दक्षिण भागात अत्यंत विरळ झाडोरा किंवा पडीत वनक्षेत्राची व्याप्ती अधिक. नीलगाय, चितळ, अस्वल, बिबट, हरीण, सांबर, कोल्हा, तळस, रानडुक्कर, काळवीट, सायाळ, ससा, लांडगा या प्राण्यांसोबत वाघाचं
भ्रमणही
आढळलं आहे.
पक्षी तर असंख्य प्रकारचे. देगलूरच्या केरूर गवताळ माळरानात यंदाच्या थंडीत ४० ते ५० प्रकारचे पक्षी दाखल झाल्याचं सहायक वन संरक्षक श्रीनिवास लखमवाड सांगतात. स्थलांतरित पक्षांपैकीच एक द पॅलिड हॅरियर. लखमवाड सर आणि वन्यजीव रक्षक अतिंद्र कट्टी यांनी या पक्षाविषयी माहिती दिली. आपले अन्न आणि भक्ष्य असलेल्या परिसराभोवती सतत घिरट्या मारतो, म्हणून त्याला भोवत्या म्हणतात. प्रामुख्यानं पूर्व युरोप आणि दक्षिण मध्य आशिया इथं आढळणारा हा पक्षी. युरोपमध्ये हिमवृष्टी सुरू झाली की हा पक्षी भारत आणि आग्नेय आशियाकडे मार्गक्रमण करतो. व्ही आकारात पंख उडवत दुसऱ्या पक्षाला खाणारे म्हणून ही हाॅरियर प्रसिद्ध. छोट्या पक्षांसोबत, पाल, किडे, नाकतोडे, उंदीरही तो खातो. नराचा रंग वरून राखाडी तर खालून पांढरा. मादी वरून
तपकिरी तर खालून पांढऱ्या रंगाची.
कुरण विकास, गवत रोपवन, मिश्र रोपवन, रोपवाटिका आणि रोपवनाची कामं दरवर्षी घेऊन वनसंवर्धन केलं जात असल्याचं लखमवाड सर सांगतात. ”कुठल्याही जंगलाच्या ऱ्हासाला मुख्य कारणीभूत होणाऱ्या बाबी म्हणजे अतिक्रमण आणि अवैध वृक्षतोड. त्यामुळे सतत गस्त, तपासणी नाके याद्वारे अवैध वृक्षतोड आणि अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवतो.इथं एकूण १९ वनउपज नाके. पाच वर्षात एकुण १४२ वाहनं अवैध वाहतूक करताना पकडण्यात आली. त्यातील ७६ वाहने सरकारजमा करण्यात आली. ६५ वाहनांचा लिलाव करून प्राप्त रक्कम महसूल जमा करण्यात आला. गेल्यावर्षी जून अखेरपर्यंत २०८.७७ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आलं. दरवर्षी वन्यप्राण्यांची गणना. वनसंवर्धनात गावकऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभतं. ”
-शरद काटकर, नांदेड