कहाणी आधुनिक देवकी- यशोदेची
बाळासाठी आईचं दूध म्हणजे अमृतासमान’ हे वाक्य आपण कित्येकदा ऐकतो. खरंच आहे, सर्व पोषणमूल्यांनी परिपूर्ण असं मातेचं दूध, हे बाळाच्या भविष्यकालीन उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली असते. पण प्रत्येक बाळ इतकं सुदैवी असतंच असं नाही. काही वेळेला कुपोषित आई, आईच्या प्रकृतीच्या समस्या, आईला पुरेसं दूध न येणं अथवा आईचा अकाली मृत्यू या कारणाने नवजात बालक मातेच्या दुधापासून वंचित राहू शकतं. काही मोठ्या शहरांमध्ये आजकाल अश्या समस्यांसाठी ‘ह्यूमन मिल्क बँक’ उघडण्यात आलेल्या आहेत, पण छोट्या गावात अशी समस्या उद्भवल्यास गोष्टी जास्त अवघड होतात.
अशीच एक घटना घडली मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यात. भिलखेडा गावातील रजनीताई गर्भार होत्या. त्यांचं वजन कमी असल्याने त्यांची प्रसूती जोखमीची होती. त्यांना योग्य पोषण मिळावं, त्यांची प्रसूती उत्तम व्हांवी यासाठी मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता नागले यांच्यासह आरोग्य सेविका- हीना सौदागर, प्रविणा धाकडे, आशा सेविका भुरय तोटे या सर्वांनी अगदी मनापासून प्रयत्न केले आणि उत्तम आरोग्य सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या.
गेल्या वर्षी ११ मे रोजी रजनीताईंनी एका गोंडस लेकीला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर अशी काही वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली की रजनीताई आपल्या बाळाला स्वत:चं दूध देऊ शकत नव्हत्या. खरंतर जन्मानंतरच्या पहिल्याच तासात बाळाला आईचे दूध मिळणे आणि नंतर बाळ किमान सहा महिन्यांचे होईपर्यंत बाळाला केवळ स्तनपान हाच आहार देणं, हे बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी, बाळाच्या उत्तम प्रतिकारक्षमतेसाठी आवश्यक असतं, हे तिथल्या सर्व डॉक्टर्स आणि आशा सेविकांना कळत होतंच. पण एकीकडे रजनीताईंचे दूध मिळणं शक्य नव्हतं आणि दुसरीकडे आईचं दूध न मिळाल्यानं बाळ निस्तेज दिसायला लागलं होतं.
मेळघाटमधील रजनीताई- सरलाताई आणि सोबत मोथा उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी
घरच्यांनी या बाळाला काही दिवस गायीच्या दुधावर जगवलं, पण त्या चिमुकलीला गायीचे दूधदखील पचत नसल्याने त्रास उलट वाढलाच होता. इकडे मेळघाटच्या मोथा उपकेंद्रातले डॉक्टर आणि कर्मचारी या चिमुकलीसाठी एखादी नुकतीच प्रसूत झालेली माता दूध देऊ शकते का, या शोधात होते. त्याचवेळी त्यांना माहिती मिळाली- रजनीताईंच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या सरलाताईंची. या सरलाताईंची सुद्धा नुकतीच प्रसूती झाली होती आणि अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांचं बाळ जन्मल्यानंतर सात दिवसांतच दगावलं होतं. सरलाताईंसाठी अतिशय कसोटीचा काळ होता तो!
अश्यातच मोथा उपकेंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी सरलाताईंची भेट घेतली, आधी त्यांचे सांत्वन केले आणि तुम्ही रजनीताईंच्या बाळाची मदत करू शकाल का, अशी विनंती केली. त्यात आणखी एक माहिती अशी मिळाली की सरलाताई या रजनीताईंच्या दूरच्या नातेवाईक निघाल्या. चिमुकलीच्या जीवाला असलेला धोका बघून सरलाताईंनी आपलं दु:ख बाजूला ठेवलं आणि रजनीताईंच्या चिमुकलीला दूध देण्याचं कबूल केलं.
सरलाताईंनी चिमुकलीची ‘यशोदामाता’ बनत तिला गरज लागेल तेव्हा आपलं दूध दिलं. योग्य वेळेला मातेचं दूध मिळाल्याने बाळाची तब्येत झपाट्याने सुधारायला लागली. गेल्यावर्षी मरणाच्या दारात उभी असलेली रजनीताईंची चिमुकली आज दीड वर्षांची झाली असून, तिची उंची- वजन उत्तम आहे. भिलखेडा गावातले लोक रजनी आणि सरलाच्या गोष्टीला, देवकी यशोदेची गोष्ट म्हणून नावाजत आहेतच. शिवाय त्याचसोबत मोथा उपकेंद्रातील डॉक्टरांनी आधी रजनीताईंच्या जोखमीच्या प्रसुतीकाळात त्यांची घेतलेली काळजी आणि नंतर तिच्या बाळासाठी धडपड करून आईचं दूध मिळवून देणं, याही गोष्टीचं लोक फार कौतुक करत आहेत. कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मेळघाटमधील आरोग्यकेंद्राचे आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांचे हे काम अतिशय कौतुकास्पद आहे.
लेखन- जयंत सोनोने, अमरावती

Leave a Reply